रविवार, ३१ जुलै, २०११

फेयर अॅड लवली

(छायाचित्र: मोहिनी जोशी)
.
.
.

टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला

जाहिरात दाखवावी लागतेच त्यांना
खोटी स्वप्ने विकायची असतात ज्यांना
गोरे छान काळे घाण म्हणावे लागते
पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावे लागते
जगामध्ये सावळेसे बघ किती लोक
गोरे तर थोडे काळे सावळे अधिक
बदकांच्या सौंदर्याची व्याख्या ही वेगळी
चिमणीने तुलनाच करू नाही मुळी
सावळ्या रंगाची गोड गुणाची देखणी
तू आमुची अलौकिक सावळी चिमणी

सावळ्या रंगाचा पोरी अभिमान ठेव
त्याला आवडते तेच बनवतो देव
रंग गोरा रंग काळा आणिक सावळा
सगळेच त्याने बनवले हो ना बाळा?
सगळेच रंग छान असतात बघ
कुणाचाही करू नये द्वेष किंवा राग
लक्ष देऊ नये जर चिडवले कोणी
आपल्याच तालामध्ये म्हणायची गाणी
कितीतरी लोक पुढे भेटतील तुला
भाळतील बघ तुझ्या सावळ्या रंगाला


(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

.

३ टिप्पण्या:

  1. Lovely...Mohini is very beautiful...
    After reading this poem I feel you can write poem for every thought...amazing..
    Lovely way of explaining her things...she must b very proud of her father....

    उत्तर द्याहटवा
  2. Thanks for the appreciation Ridhima. Thanks for visiting this blog even when the post was not published on Facebook.

    I have to write so many words to make some difference, you just have to smile :) and its done.

    Thanks again.

    with regards
    Tushar

    उत्तर द्याहटवा
  3. seriously superb one....ya and mohini is very charming and beautiful....सावळा रंग असण्याचा inferity complex असतोच सावल्या लोकांना (मला पण आहे ), पण एक बाबा आपल्या मुलीची समजूत किती छान प्रकारे ह्या शब्दात सांगताहेत....हे आत्मसाद करण्यासारखं आहे ... अप्रतिम असे हे composition.....खरच म्हणतात ना, मुली बाबांच्या जास्त लाडक्या असतात :)

    उत्तर द्याहटवा