रविवार, २१ जुलै, २०१३

सुंदर ओळख

(छायाचित्र सौजन्य: अर्चना )
.
.
पाणीदार डोळे
वेधक हसरी नजर
गुलाबपाकळी गाल
शुभ्रमोती दात
अल्लड नवथर ओठ
सरळ सुबक नाक
चैतन्यमयी हसू
धनदाट काळेभोर केस
जीवघेणी हनुवटी
नाजुक सुबक हात
चित्तवेधक बांधा
हे सगळे एकीकडे
आणि ...
सावळा मोहक रंग एकीकडे
ठेवले तरीही ...
सावळ्या रंगाचे पारडे
भारीच भरते आहे !
तुझा सावळा रंगच तुझी
सुंदर ओळख ठरते आहे !!

 ~ तुष्की
नागपूर, २० जुलाई २०१३, १२:१५

शनिवार, २० जुलै, २०१३

हंक

(छायाचित्र सौजन्य: क्षितिज
.
.
दिसावे कुणी 'हंक' मोहून जावे जिवाला पुरे
झरू लागले आटलेले किती काळजाचे झरे
तुला पाहणे रोज व्हावे अता जीव झाला खुळा
मनाला मिळाला तुझा ध्यास जो दुःख चिंता नुरे

तुझे पाहणे व्यापते जीवनाला चहूबाजुने
तुला लाभले रूप 'माचो'परी रांगडे देखणे
मनी आस माझ्या किती जागते पास याया तुझ्या
तुझी वाट पाहू किती रे बरे ना असे वागणे

तुझा भास होता फुलारे अताशा नवी पालवी
तुझा चेहरा स्पर्शण्याची मनीषा मनी जागवी
कधी ऐटीने धीट होऊन येणे तुझे होउदे
तुला संमती दोन डोळ्यात माझ्या कळाया हवी
~ तुष्की
नागपूर, २० जुलाई २०१३, ०९:००

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

तू सावळी आहेस

(छायाचित्र सौजन्य: रूपाली )
.
.
तू सावळी आहेस
हीच जमेची बाजू आहे
तू सावळी आहेस
हीच तर तुझी जादू आहे

तू सावळी आहेस
मला सावळ्या रंगाची ओढ
तू सावळी आहेस
म्हणूनच तर दिसतेस गोड

तू सावळी आहेस
केस रेशमी वेधक डोळे
तू सावळी आहेस
म्हणूनच तरूण वेडे खुळे

तू सावळी आहेस
गुण गाऊ तुझे किती
तू सावळी आहेस
शब्द संपण्याची भीती

तू सावळी आहेस
अजून सांगू काय वेगळं
तू सावळी आहेस
यातच आलं की गं सगळं

~ तुष्की
नागपूर, १९ जुलाई २०१३, ०९:००

गुरुवार, १८ जुलै, २०१३

पखरण

(छायाचित्र सौजन्य: अनुराधा )
.
.
जिवापाड जपावा
असा क्षण तू आहेस
जग सुंदर आहे
ते कारण तू आहेस

सतत सोबत असणारी
आठवण तू आहेस
हृदयात धडधडणारी
धडकन तू आहेस

निरागस अल्लड
बालपण तू आहेस
तारूण्याने वेडावणारा
कण कण तू आहेस

केसांचे गंधित
मधुवन तू आहेस
चंद्राची चांदण
पखरण तू आहेस

सुमधुर हास्याची
छनछन तू आहेस
भाग्यानेच मिळते
असे धन तू आहेस

~ तुष्की
नागपूर, १८ जुलाई २०१३, ०८:४०