बुधवार, २५ मार्च, २००९

आनंदाचे कण


(छायाचित्र सौजन्य आसावरी)
.
.
हास्याने सांडले तुझ्या
आनंदाचे कण
लख्ख लख्ख उजळले
सगळेच क्षण
.
घरभर पसरले
डोळ्यातले तेज
हर्ष मावेनाच झाले
आभाळ लहान
.
एका क्षणी झाला सर्व
ऋतूंचा सोहळा
तू सूर्याची उब तूच 
चंद्राचं चांदणं
.
मोहरल्या बावरल्या
शब्दांच्या पाकळ्या
निखळ हसणे झाले
पहाट किरण
.
कण कण मी वेचतो
मनाच्या कुपीत
आठवावे जातायेता
नेहमी म्हणून
.
.
तुषार जोशी, नागपूर

सोमवार, १६ मार्च, २००९

हासली तू

(छायाचित्र सौजन्य मिताली)
.
हासली तू
.

हासली तू की मनाला
चांदण्यांचा स्पर्ष झाला.
की फुलांना उमलतांना?
गंधवेडा हर्ष झाला.
.
हासली तू मंद वारे
वाहतांना स्तब्ध झाले
आसमंती चंद्र तारे
लाजले भयमुग्ध झाले
.
हासली तू आणि माझा
पाहण्याचे गीत झाले
शब्द भारावून गेले
भाव सारे प्रीत झाले
.
.
तुषार जोशी, नागपूर
.
.

रविवार, १५ मार्च, २००९

कुठे पाहते ग पोरी

(छायाचित्र सौजन्य शिवानी)
.
.
.
कुठे पाहते ग पोरी
डोळे तिरके करून
मनातले कळेचना
तुझा चेहरा बघून
.
गालावर पसरले
किती हसणे रेखीव
आज बिचा~या कुणाचा
कुठे जाणार का जीव
.
डोळ्यांमध्ये साठलेले
आहे कौतुक कुणाचे?
आहे रहस्य कसले 
तुझी कली खुलण्याचे?
.
नको सांगू नको सांगू
ठेव गोष्ट लपलेली
तुझे डोळे कधी तरी
करतीलच चुगली
.
.
तुषार जोशी, नागपूर