बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

गेय कविता

(छायाचित्र सौजन्य: शिल्पा, छायाचित्रकार: तुषार)
.
.
ती सावळी मुलगी माझे
काळिज घेऊन गेलेली
जगतो आहे तालामध्ये
जगण्याला लय आलेली ।। ध्रु ।।

ती म्हणाली ज्या क्षणी
की सवय झाली तुझी
चोहीकडे संगीत वाजू लागले
माझ्या सगळ्या चिंता
माझी सगळी शल्ये
सगळी पळून गेलेली ।। १ ।।

भाव जागू लागले
शब्द नाचू लागले
कवितेत माझ्या अर्थ दाटू लागले
साधासा धडा होतो
आता माझ्या जगण्याची
गेय कविता झालेली ।। २ ।।

टेकते छातीवरी
चेहरा विश्वासुनी
वाटे मी राजा विश्व माझे जाहले
जगही जिंकेन मी
काहीही करेन मी
शक्ती अशी मिळालेली ।। ३ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.
.