शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

सखे

(छायाचित्र सौजन्य: रिधिमा - निशिधा )
.
.
तुझ्या माझ्यातले
सख्य सांगू कसे
शब्द पडती अपुरे सखे
सुख तुला पाहुनी
पास रेंगाळते
दुःख होते मधासारखे

विश्व माझे तुझे
सागरासारखे
वाद होती कधी वादळी
फक्त डोळ्यातुनी
गूज समजायचे
बोलण्याची कला वेगळी

मीच समजायच्या
तुझ्या खाणाखुणा
खुट्ट झाले तरी जाणवे
वेदना पण कशी
वाटली जिंकली
जाणती आपली आसवे

वेगळा कोपरा
आत हृदयामधे
तुझ्यासाठी असे राखला
या इथे त्या तिथे
पोचले मी कुठे
साथ ठेवीन गं मी तुला

तुषार जोशी, नागपूर

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

अलामांडा

(छायाचित्र सौजन्य: सोनल)
.
.
घंटेची पिवळी फुले पाहिली होती
कधी लक्षात राहिली नव्हती
पण तू त्या दिवशी
एक फुल खोवलेस केसात
तेव्हापासून ते फूल विसरू शकलेलो नाही.
आता जिव हळवा होतो
घंटेची फुले पाहिल्यानेही.
आता घंटेची फुले
माझ्या अनुभव विश्वाचा
गोड भाग झालीयेत.
प्रत्येक वेळा
घंटेची फुले पाहता
ती तुझ्या आठवणींची
मनोहर झुळुक घेऊन आलियेत.
माझ्या आयुष्यात तू त्या फुलांना
वेगळे अस्तित्व दिलेस
ते फुल केसात खोवून
तू सौंदर्याचे दालन उघडे केलेस.
त्या फुलाला नवे अस्तित्व
आणि मला डोळाभर धन दिलेस.

(हो हो 'फुले पक्षी ती आणि मी' ही मंगेश पाडगावकरांची कविता मला माहित आहे, या कवितेची कल्पना त्या कवितेशी बरीच मिळते तरीही या कवितेतले अनुभव व भाव माझे आहेत)

तुषार जोशी, नागपूर
.
.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

सावळी ती परी

(छायाचित्र सौजन्य: सोनल काळबांडे)
.
.
स्वप्नात ती दिसावी मिटताच डोळे
दिवसा तिचेच व्हावे आभास भोळे
दिवसा तिचेच व्हावे आभास भोळे
एक सावळी ती परी, मनमोहिनी सावरी
मनमोहिनी सावरी, एक सावळी ती परी ।। ध्रु ।।

रंगास तोड नाही, रूपास तोड नाही
शब्दच अपुरे पडती, पडती अपुरे
सागर तिच्या रूपाने, माझ्या समोर येई
सगळे किनारे भिजती, भिजती किनारे
हसताच ती प्रभेने दिपतात डोळे
विणतो सुगंध अंगी रोमांच जाळे
विणतो सुगंध अंगी रोमांच जाळे
एक सावळी ती परी, मनमोहिनी सावरी
मनमोहिनी सावरी, एक सावळी ती परी ।। १ ।।

कुरळ्या तिच्या बटांना, देता ती एक झटका
अडतो तिथेच श्वास, अडतोच श्वास
बघते ती ज्या कुणाला, त्याची असे दिवाळी
खासच जातो दिन तो, जातोच खास
बुडतो सहज कुणीही गहिरे ते डोळे
स्मरणात तिचिया जगणे जगणे निराळे
स्मरणात तिचिया जगणे जगणे निराळे
एक सावळी ती परी, मनमोहिनी सावरी
मनमोहिनी सावरी, एक सावळी ती परी ।। २ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.
.