मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

झोळी

(छायाचित्र सौजन्य: दीपा )
.
.
(चाल: शाम रंग रंगा रे)

शाम रंगाची माझी,
सखी सोज्वळ भोळी
भरलेली हिच्यामुळे,
माझी आनंदाची झोळी || धृ ||

डोळे गहिरे नाक साजरे
ओठ हासरे
डोळाभर बघताना किती
स्नेह पाझरे

हिच्या प्रेमाच्या अनेक तऱ्हा
सांगू मी किती
ठेवून जाते सोबत माझ्या
मायेची दिठी

अधुरा होतो हिच्या येण्याने
जाहलो पुरा
घेऊन आली माझ्यासाठी ही
स्वप्नांचा झरा

~ तुष्की
नागपूर, १७ सप्टेंबर २०१३, २२:००

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

पौर्णिमा

(छायाचित्र सौजन्य: करूणा )
.
.
तुझा चेहरा पाहुन कळले
चंद्र हाच आहे
आकाशीजो चमचम करतो
फक्त भास आहे

तुझे चांदणे पडता येतो
उत्साहात ऋतू
तू असण्याचा दरवळ पसरे 
सुगंध उत्कट तू

तीळ हनुचा मनात भरतो
क्षणोक्षणी उरतो
तू हसल्यावर अंकुर अंकुर
वसंत मोहरतो

टपोर डोळे गाल फुलांचे
ओठ पाकळ्यांचे
डोळ्यातच बुडताना होते
सार्थक बुडण्याचे

भास म्हणालो त्या चंद्राला
खास तूच चंद्रमा
गोड हासली लाजुन झाली
जन्माची पौर्णिमा

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, २२:४०

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

हरखुन जाते

(छायाचित्र सौजन्य: मनू
.
.
निरखुन फोटो, हरखुन जाते
पाहत राहते मी
फोन आल्यावर, साठवलेले
विसरून जाते मी

विचारती ते, आठव येते
दिवस जातो का?
तुम्हाला आठवतो क्षण क्षण
हृदयाचा ठोका

हळव्या त्या तुमच्या भेटीचे
होती भास अजुन
हृदयी स्वप्ने गाली लाली
येते हळुच सजुन

तुमच्या मध्ये दिसतो मजला
स्वप्नांचा राजा
आता सलते मधले अंतर
जीव घेई माझा

तुमच्या साठी अधिर माझा
जन्म किती झाला
लवकर याहो घेऊन जाहो
तुमच्या राधेला

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, २१:५०

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

खळी तुझी

(छायाचित्र सौजन्य: अश्विनी )
.
.
सावळ्या गालात
तुझ्या हसण्यात
बसते ऐटीत
खळी तुझी

गोंडस दिसते
मनात ठसते
रोज जीव घेते
खळी तुझी

टप्पोऱ्या डोळ्यांची
कुरळ बटांची
शान चेहऱ्याची
खळी तुझी

तुझ्या स्मितावर
नक्षी मनोहर
दुधात साखर
खळी तुझी

नजर हटेना
ओढ लावी मना
अद्भुत दागिना
खळी तुझी

निराशा मिटावी
एकदा बघावी
आनंदाची चावी
खळी तुझी

~ तुष्की
नागपूर, ०८ सप्टेंबर २०१३, ०९:२०

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

चोर

(छायाचित्र सौजन्य: स्वप्ना )
.
.
तुझा विचार मनात
चोर पावलांनी येतो
कुठेही असले तरी
मला दूर दूर नेतो

विसरते जग सारे
हरवते मी तुझ्यात
स्मरणांचा खेळ रंगे
हृदयाच्या अंगणात

तुझे शब्द आठवून
ओठांवर हसू येई
सख्या म्हणती कप्पाळ
पुन्हा हरवली बाई

शोध घ्या रे त्या चोराचा
भलताच व्दाड दिसे
सखी हिरावली बघा
कुठेही उगाच हसे

~ तुष्की
नागपूर, ०७ सप्टेंबर २०१३, २३:२०

खळी

(छायाचित्र सौजन्य: स्वप्ना
.
.
खळी
निरागस हसू
केस घनदाट
सावळा रंग
तिला
पाहुनी कुणी
जीव हरखुनी
जाहला दंग

कसे
रुप रेखिले
रंग योजले
चित्रकाराने
किती
बरे छळतात
केस हलतात
तिचे वाऱ्याने

पुन्हा
पुन्हा आठवू
किती साठवू
रूप डोळ्यात
जिणे
जणू हासले
बहरली फुले
हिच्या प्रेमात

~ तुष्की
नागपूर, ०७ सप्टेंबर २०१३, २२:१५