सोमवार, १३ जून, २०१६

ठसा

(छायाचित्रकार: पंकज बांदकर, छायाचित्र: विशाखा)
.
तुझे हसू  तुझी अदा झूळ झुळ वारा जसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
रागावले त्रासलेले जरी डोके तापले
तुझ्या चाहुलीने माझे क्लेष जाती भागले
तुझ्यावर भिस्त माझी तुझ्यावर भरवसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
तुझ्या साधेपणाचा गं दरवळ चोहीकडे
हरवता हसू माझे तुझ्या कडे सापडे
माझ्या मनी पडे तुझ्या असण्याचा कवडसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
खेळकर खोडकर असे तुझे वागणे
तुला आठवत होते रात्र सारी जागणे
काळजात कोरलेला तुझा कायमचा ठसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १३ जून २०१६, १५:००

बुधवार, १ जून, २०१६

दोन गोष्टी

(छायाचित्र सौजन्य: मंजिरी)
.
.
मला दोन गोष्टी खूप आवडतात
अरिजित सिंग चा आवाज
आणि तू
.
मी तासंतास बसू शकतो
ऐकत त्याच्या गाण्यांना
आणि आठवत तुला, तुझ्या हावभावांना
.
तुझे बदामी ओठ
आणि ते चष्म्यातून बघणे
आठवले तरीही
अरिजित चे गाणे मनाच्या चेनल वर
वाजायला लागते
आणि त्याचे गाणे रेडियोवर लागले
की पुन्हा तुझी एक अदा आठवते
.
मला अंतर्बाह्य व्यापून टाकणा-या
जीव उधलून द्याव्यात अश्या
जगात दोनच गोष्टी
अप्रतीम सुंदर आहेत
अरिजित सिंग चा आवाज
आणि तू.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०१ जून २०१६, १०:००