गुरुवार, २९ मे, २०१४

तूच सांग

(छायाचित्र सौजन्य: प्रसन्न )
.
.
प्रत्येकाची चांगली बाजू शोधून काढतोस
खुसखुशित शब्दात सर्वांसमोर मांडतोस
समजून घेतोस न लिहिलेल्याही भावना
उत्साहाची बरसात करून देतोस चालना
दाद देण्याची संधी तुझ्याने हुकणार नाही
सांग तुझ्यावर प्रेम कसे जडणार नाही?
.
आवर्जून वाचतोस तू सर्वांच्या कविता
भरभरून लिहितोही त्यावर येता जाता
लिहितोस छान सहज मनातून आलेले
टिपतोस कवितेतले मोती विखूरलेले
कविता तुझ्या अभिप्रायांची वाट पाही
सांग तुझ्यावर प्रेम कसे जडणार नाही?
.
मनापासून दाद देतोस शब्दरूपाला
टिंगल करून कधी हसून घेतोस स्वतःला
सर्वांच्या मनाचा तू करतोस सांभाळ
स्तुतीमध्ये मुक्तहस्ते वाटतोस आभाळ
तुझ्याइतका रसिक कुणीच असणार नाही
सांग तुझ्यावर प्रेम कसे जडणार नाही?
.
मस्त रांगडा चेहरा तुझा हसतोस गोड
त्यावर नम्रतेची शालीनतेची जोड
कवितांना तू अर्थ देतोस नभा एवढा
तुझ्यासारखा तूच असावास मनकवडा
नम्रतातर तुला बघूनही शिकता येई
सांग तुझ्यावर प्रेम कसे जडणार नाही?
.
~ तुष्की
नागपूर, २९ मे २०१४, २३:००

नशा

(छायाचित्र सौजन्य: पूजा )
.
.
कळेना कुणाची नशा जास्त आहे
तुझी की सुरेची नशा जास्त आहे?

किती सावळे रंग पाहून झाले
तुझ्या सावळ्याची नशा जास्त आहे

तुला वाचणे भान हरपून जाणे
तरी ऐकण्याची नशा जास्त आहे

तुला पाहणे सोहळा जाणीवांचा
तुझ्या पाहण्याची नशा जास्त आहे

तुझा चंद्र व्यापून जातो जीवाला
तुझ्या चांदण्याची नशा जास्त आहे

तुझे बोलणे बोलणे अमृताचे
तुझ्या हासण्याची नशा जास्त आहे

तुझे धीट होणे हवेसे हवेसे
तुझ्या लाजण्याची नशा जास्त आहे

फसे मोगरा केस तू सोडताना
तुझ्या मोगऱ्याची नशा जास्त आहे

तुझ्या आठवांनी जरी चिंब 'तुष्की'
तुला भेटण्याची नशा जास्त आहे

~ तुष्की
नागपूर, २९ मे २०१४, १३:००