शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

बिचारा भोळा

(छायाचित्र सौजन्य: श्वेता )
.
.
ती अशी मला बघते की, हृदयाची धडधड वाढे
मन सगळे विसरून म्हणते त्या रम्य स्मृतींचे पाढे
हनुवटी तोलुनी हाती, रोखुन बघण्याचा तोरा
रक्तातून वाढत जातो मग रोमांचाचा पारा

सावळी, गोड ती दिसते, गहिरे टप्पोरे डोळे
ओठांत मंद हसण्याचे, चित्तचोर ते चाळे
केसांची हट्टी बट ती गालावर खेळत फिरते
मज काळाची वेळाची कसलीही शुद्ध न उरते

ती छळते तरीही कळते ते वार मधाहुन गोड
मरताना होई हवीशी या मरण्याचीही ओढ
चेहऱ्यावर मराठमोळे सौंदर्यच अवघे गोळा
भुलणार कसा मग नाही जीव बिचारा भोळा

~ तुष्की
नागपूर, २९ डिसेंबर २०१२, १५:००

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

जाणीव

(छायाचित्र सौजन्य: रिधिमा )
.
.
ती हसते जेव्हा मंद
पाहते धुंद
मोहूनी जाते
मज ओवाळावा जीव
अशी जाणीव
सारखी होते

ती शुभ्र मण्यांची माळ
करी घायाळ
जन्म बावरला
दाटली ओढ केसात
मनाच्या आत
गंध मोहरला

गोडवा कसा गालात
जणू स्वप्नात
अप्सरा येते
हृदयात उडे काहूर
मनाला घोर
लावूनी जाते

~ तुष्की
नागपूर, २८ डिसेंबर २०१२, १०:३०

सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

स्वप्नातली परी

(छायाचित्र सौजन्य: निकिता (कल्याणी) )
.
.
तुला खोटे वाटत असले तरी
मी तुला उगाच नाही म्हणत, स्वप्नातली परी

तू पाणीदार डोळ्यांनी जेव्हा
माझ्याकडे बघतेस, किंचित ओठात, हसतेस तेव्हा

मला माझाच हेवा वाटतो
मंद सुगंधाचा जणू दरवळ, मनात साठतो

इतकं अनुपम सौंदर्य आपण
प्रत्यक्ष अनुभवतोय खरोखर, जगतोय हे क्षण

विश्वास ठेवण्यासाठी एकदाच
चिमटा काढून बघावा वाटते, स्वतः स्वतःलाच

मग तू सूर छेडतेस हळूवार
किबोर्ड वर, अलगद पण तेव्हा, हृदयात होतात वार

हळवी झालीस की जग विसरतेस
कितीतरी वेळ आपल्याच नादात, बोलत बसतेस

तुला बघतच रहावसं वाटतं
अनेक दिवस आनंद वाटेल असं, सुख मनात साठतं

तुला खोटे वाटत असले तरी
मी तुला उगाच नाही म्हणत, स्वप्नातली परी

~ तुष्की
नागपूर, २४ डिसेंबर २०१२, ०६:००

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

सावळी आहे

(छायाचित्र सौजन्य: प्रतिज्ञा)
.
.
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
स्वप्न बघते, सत्य जगते, ती खुळी आहे

कंच हिरवा, रंग खुलतो, शोभतो अंगा
संथ निर्मळ, सौंदर्याची, ही जणू गंगा
त्यात किमया, काय गालावर खळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे

चंद्र टिकली, मुग्ध करते, साधिशी छोटी
पाहतो जो, मात्र अडतो, डोळिया काठी
लाजली पाहून तिजला हर कळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे

तुषार जोशी, नागपूर
हैद्राबाद नागपूर प्रवास, २१:४०
.

सावळ्या रंगाच्या पोरी

(छायाचित्र सौजन्य: अपेक्षा )
.
.
सावळ्या रंगाच्या पोरी
तुझे हसणे जहर
नसानसात भरते
गुंगती माझे प्रहर

सावळ्या रंगाच्या पोरी
तुझ्या डोळ्यात चकवा
कुणी उदास दिसता
तुझा फोटो दाखवावा

सावळ्या रंगाच्या पोरी
तुझा चेहरा लाघवी
तुला पाहता पाहता
किती लोक झाले कवी

सावळ्या रंगाच्या पोरी
तुझे केस घनछाया
फुले मोहरून येती
तुझ्या केसात सजाया

सावळ्या रंगाच्या पोरी
तुझ्या सौदर्याचा डंख
अस्तित्वास लावी माझ्या
आनंदाचे किती पंख

(सावळ्या मुलीची गाणी / तुष्की, नागपूर)
+९१ ९८२२२ २०३६५