बुधवार १७ जून २००९

संधी


(छायाचित्र सौजन्य मंदार)
.
तो तत्वज्ञान बोलतो
कवितेतून त्याच्या
पण मला दीपवून जातो
प्रकाश चेहऱ्याचा

शब्द बघ शब्द बघ
आग्रह त्याचा नेहमी
पण डोळ्यांच्या रोख कसा
सोडवायचा आम्ही

कविता ऐकायला माझी
ना नसतेच कधी
डोळे भरून चेहऱ्याकडे
बघण्याची तिच संधी

कवितेतून मनावर
चालतंच त्याच राज्य
गोड हसून काबीज ठेवतो तो
हृदयाचेही साम्राज्य

तुषार जोशी, नागपूर
१७ जून २००९, १८:००

.




मंगळवार १२ मे २००९

हारवलेलं हसू

.
.
कुणाचं हसू हारवलेलं दिसलं
की आपल हसणं थोड पेरावं
दिल्याने वाढतोय हा खजिना
देता देता श्रीमंत व्हावं
.
तुमच्यासाठी सोप्पं असेल
सहज गोड हसायचं इतकच
कुणाला जगणं शिकायला
हवं असेल कदाचित तितकच 
.
हसल्याने आयुष्य वाढतयं
हसावं आणि सुंदर दिसावं
दिल्याने वाढतोय हा खजिना
देता देता श्रीमंत व्हावं
.
.
तुषार जोशी, नागपूर
११ मे २००९, २२:००
.
.

बुधवार २५ मार्च २००९

आनंदाचे कण

(छायाचित्र सौजन्य आसावरी)
.
.
हास्याने सांडले तुझ्या
आनंदाचे कण
लख्ख लख्ख उजळले
सगळेच क्षण
.
घरभर पसरले
डोळ्यातले तेज
हर्ष मावेनाच झाले
आभाळ लहान
.
एका क्षणी झाला सर्व
ऋतूंचा सोहळा
तू सूर्याची उब तूच 
चंद्राचं चांदणं
.
मोहरल्या बावरल्या
शब्दांच्या पाकळ्या
निखळ हसणे झाले
पहाट किरण
.
कण कण मी वेचतो
मनाच्या कुपीत
आठवावे जातायेता
नेहमी म्हणून
.
.
तुषार जोशी, नागपूर

सोमवार १६ मार्च २००९

हासली तू

(छायाचित्र सौजन्य मिताली)
.
हासली तू
.

हासली तू की मनाला
चांदण्यांचा स्पर्ष झाला.
की फुलांना उमलतांना?
गंधवेडा हर्ष झाला.
.
हासली तू मंद वारे
वाहतांना स्तब्ध झाले
आसमंती चंद्र तारे
लाजले भयमुग्ध झाले
.
हासली तू आणि माझा
पाहण्याचे गीत झाले
शब्द भारावून गेले
भाव सारे प्रीत झाले
.
.
तुषार जोशी, नागपूर
.
.

रविवार १५ मार्च २००९

कुठे पाहते ग पोरी

(छायाचित्र सौजन्य शिवानी)
.
.
.
कुठे पाहते ग पोरी
डोळे तिरके करून
मनातले कळेचना
तुझा चेहरा बघून
.
गालावर पसरले
किती हसणे रेखीव
आज बिचा~या कुणाचा
कुठे जाणार का जीव
.
डोळ्यांमध्ये साठलेले
आहे कौतुक कुणाचे?
आहे रहस्य कसले 
तुझी कली खुलण्याचे?
.
नको सांगू नको सांगू
ठेव गोष्ट लपलेली
तुझे डोळे कधी तरी
करतीलच चुगली
.
.
तुषार जोशी, नागपूर

शुक्रवार १२ डिसेंबर २००८

प्रतिबिंब

(छायाचित्र सौजन्य योषिता)

तू कविता ऐकतेस ना
तेव्हा तूच कविता होतेस
डोळे बंद करतेस ना
तेव्हा तर जीवच घेतेस

मी थोर कवीची कविता
बघताना हरवून जातो
माझी कविता मेणबत्ती
तू सूर्य होऊन जातेस

तुलाच लिहितो नंतर
मी शब्दा शब्दां मध्ये
शब्दांच्या तळ्यात मग तू
प्रतिबिंब होऊनी खुलतेस

तुषार जोशी, नागपूर

गुरुवार २३ ऑक्टोबर २००८

एक मुलगी

(छायाचित्र सौजन्य सुप्रिया)


आलेल्या दुःखाला
हसुन साजरे करते
एक मुलगी जगण्याचे
सुमधुर गाणे करते

वास्तव जगताना हो
स्वप्ने पण बघते ती
क्षण हरवले त्यांना
अधुन मधुन स्मरते ती

ही मुलगी आसपास
आहे तुमच्या बरका 
जाणवेल अचानक
कधी आनंदाचा झोका

तीव्र तिच्या दुःखाने
रात्र ही होते आहे
हळुच तिच्या स्वप्नांची
पहाट जन्मते आहे

सापडली जर ही कधी
तिला सांगणार आहे
तुझ्या मुळे दुःखातही
सुख नांदणार आहे

तू अशीच प्राणपणे
दुःखाला जगत रहा
हसणे पसरून जगणे
मंगलमय करत रहा

मंगळवार १७ जून २००८

मी चालत राहीन

(छायाचित्र, गौरी यांच्या सौजन्याने)

मी चालत राहीन मी चालत राहीन
मी चालत राहीन मी चालत राहीन

माझा माझ्यावरती विश्वास माझा प्रवास होईल खास
येईल दुःख येईल सुख निर्भय स्वीकारीत जाईन
मी चालत राहीन मी चालत राहीन
मी चालत राहीन मी चालत राहीन

मी जेव्हा जेव्हा मंगल कामासाठी माझे हात दिले
तेव्हा तेव्हा सगळीकडून मदतीला मित्र धावत आले
मी मित्रवान मी भाग्यवान मी स्वाभिमानी मी शक्तिवान
सगळ्या कामा मध्ये माझा मी एक ठसा ठेवीन जाईन
मी चालत राहीन मी चालत राहीन
मी चालत राहीन मी चालत राहीन

स्वप्ने असतील माझी मोठी शिखरांना जाऊन भीडणारी
ठरवीन ध्येय गाठेन ध्येय प्रसन्नता पसरविणारी
वीवेकवान मी धैर्यवान मी जागरूक मी प्राणवान
जाईन तिथे मी शक्ती कण उधळीत जाईन पसरीत जाईन
मी चालत राहिन मी चालत राहीन
मी चालत राहीन मी चालत राहीन

तुषार जोशी, नागपूर

शुक्रवार १३ जून २००८

खारूताई

(छायाचित्र के श्रीश यांच्या सौजन्याने)

छोटीशी खारूताई
दगडावर बसली होती
निरागस गोजिरवाण्या
दिसण्याने नटली होती
.
इवल्याश्या अस्तित्वाने
हृदयाचा पीळ गळाला
आडून तिला बघण्याचा
माझा गं उत्सव झाला
.
तुषार जोशी, नागपूर

शुक्रवार ३० मे २००८

संवेदनेच्या बायनाकुलर ने

(छायाचित्र गौरव यांच्या सौजन्याने)

.
.
संवेदनेच्या बायनाकुलर ने
दूरचे बघायचा प्रयत्न करतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
वा नवे मित्र आहेत
जुने पण टीकून आहेत
तीव्र इच्छा अंतरमनात
तीव्रतेने पोहचवतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
पैशापुढे शिक्षणाला
मी नेहमीच महान मानलंय
फार श्रिमंती दिसत नाही
नावापुढे डॉक्टर लागलेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
दोन पिलं आहेत जवळ
ममतेची डोळ्यात तृप्ती
माझ्या स्वप्नांचे आयुष्यावर
प्रक्षेपण करून बघतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
.
तुषार जोशी, नागपूर
.
.