शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

फोन

तुझ्या भेटीचा आनंद
पसरला मनभर
माझ्या सुखाचा प्रकाश
दरवळे घरभर
.
तुझा आवाज ऐकून
मोहरली माझी काया
कान ओंजळ बनले
तुझे शब्द साठवाया
.
आता तासभर तरी
करणार हितगुज
तुला सांगणार सारं
साठलेलं जे कधीचं
.
काळावेळाचे ही भान
आता मला नको बाई
किती वाट पाहुनिया
मग तुझा फोन येई
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २७ सप्टेंबर २०१४, ०८:००

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

पऱ्यांची परी

(छायाचित्र सौजन्य: पूजा )
.
.
मी तुला म्हणणार गं
तू पऱ्यांची परी
कप्पाळावर हासुनी तु
हात मारला तरी
.
गोड बोलतेस तू
लागतो लळा तुझा
त्यातही कहर असा
रंग सावळा तुझा
.
ती मुजोर बट तुझी
केवढी तिची मजल
हासतेस त्याक्षणी
भासतेस तू गझल
.
~ तुष्की नागपुरी,
नागपूर, २२ सप्टेंबर २०१४, २०:३०

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

व्याख्या

(छायाचित्र सौजन्यः सोनम )
.
लाख लोकांनी जरी कित्येकदा लिहिले तुझ्यावर
तू जशी आहेस त्याची धार ना येई कशावर
.
तू जरी उच्चारले नाही तरी त्याला कळाले
बोलले डोळे तुझे अन ओठ फसले हासल्यावर
.
छान दिसण्याच्या किती व्याख्या जुन्याश्या पाडते तू
एकदा टी शर्ट पिवळा जिन्स डेनिम घातल्यावर
.
मन भरेना पाहण्याने उलट लागे ओढ अजुनी
काळजाचे कोण जाणे काय होइल लाजल्यावर
.
पौर्णिमा होई तुझ्या अल्लड पणाने पाहण्याने
मुग्ध होती गात्र सारे त्या सुखाच्या चांदण्यावर
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १७ सप्टेंबर २०१४, १०:००

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

हट्टी

(छायाचित्र सौजन्य: सोनम
.
.
झुळकेसारखे मुलींचे चेहरे
समोरून येतात विरून जातात
पण तुझा चेहरा फारच हट्टी आहे
मनात असा काही जाऊन चिकटलाय
तो मनातून जातच नाहीये
सावळा रंग इतका केमिकल लोचा
करू शकतो हे वाटलेच नव्हते
आणि त्वावर उठून दिसणारी तुझी नथ
माझ्या काळजावर ओरखडे पाडतेय गं
हसतेस काय?
.
हो पण तुझ्या हसण्यानेच
मिटताहेत किती तरी
सुनसान क्षणांचे, एकट्या रात्रींचे दंश
तुझ्या हसण्याच्या प्रकाशाने
भरतोय माझा गाभारा
जग बदलणारा, कमाल आहे
लाघवी तुझा चेहरा
तुझं असं समोर येणं
मी योगायोग कसा मानू?
तू होऊन आली आहेस
आनंदाची, आशेची खूण जणू
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १६ सप्टेंबर २०१४, ११:००