मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

सांगू कसे तुला मी


(छायाचित्र सौजन्य: प्रतिज्ञा)
.
.
ए सावळ्या मुली गं
सांगू कसे तुला मी
माझाच मी न उरलो
झालो पुरा तुझा मी ।। ध्रु ।।

स्वप्नात मी तुझ्याशी
गोष्टी कितीक करतो
येता तुझ्या समोरी
पुन्हा मुकाच ठरतो
ही ओढ जीवघेणी
झुरतो तुझ्या विना मी ।। १ ।।

जादू तुझ्या छटांची
घायाळ रोज करते
मी टाळतो तरीही
मन आठवांत फिरते
आता तुझ्याच साठी
वेडापिसा खुळा मी ।। २ ।।

स्वप्नात पाहिलेले
सत्यातही घडावे
जगणे तुझे नि माझे
बघ एकरूप व्हावे
जगणे तुझ्या विना गं
जगणे न मानतो मी ।। ३ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.
.

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

अनवट माया


(छायाचित्र सौजन्य: पल्लवी)
.

काळ्या सावळ्या मुलीची
आहे अनवट माया
काळ्या रेशमी केसांची
कशी घनदाट छाया ।। ध्रु ।।

शुभ्र मोगऱ्याच्या मुळे
केसामध्ये फुले,
सुगंधी उत्सव
कानामध्ये मोती डुले
किती मोहमयी,
असावे वास्तव
तिला भेटण्या आधीचा
सारा जन्म गेला वाया ।। १ ।।

स्मित हळुवार धुंद
कसा चहुकडे,
प्रकाश पसरे
चंद्रबिंदी बघताना
बघणारा भान,
सगळे विसरे
फक्त आठवाने तिच्या
माझी रोमांचित काया ।। २ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर )

.