बुधवार, १५ जून, २०११

तुझा सावळा शृंगार

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.

तुझा सावळा शृंगार
जीव जाहला अंगार
किती रुतते रुतते
तुझ्या नजरेची धार

असे पाहू नको वेडे
जीव वितळतो माझा
तुझी ओढ काळजात
घेऊ लागली आकार

आता पाठीमागे सारे
बोल बोलतील मला
काय जाहले हो याला?
अहो गुणी होता फार

कसे सोसतो सोसतो
तुझ्या असण्याचे तेज
तुटे इतकी नादते
मन कोवळी सतार

घनघोर बरसतो
आता सुखाचा पाऊस
तुझा आठव मल्हार
तुझा विचार मल्हार

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी: