.
.
थोडीशी घाबरते
सायकल वर बसताना
तरीही बसते कारण
बाबा तू आहे ना
वेगाने धावणार
हे जगणे जगताना
पडले तर उचलाया
बाबा तू आहे ना
द बेस्ट माझा बाबा
सांगणार सगळ्यांना
कारण माझा द बेस्ट
बाबा तू आहे ना
तुषार जोशी, नागपूर
'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.
गुरुवार, २६ एप्रिल, २००७
बाबा तू आहे ना
बुधवार, २५ एप्रिल, २००७
चेहरा
.
.
सकाळी सकाळी
तुझा मोहक चेहरा पाहून
वाटणारा आनंद
शब्दांत सांगण्या पलीकडे
सकाळी सकाळी
तुझा मोहक चेहरा पाहून
दरवळणारा सुगंध
मी वाटतो चोहीकडे
सकाळी सकाळी
तुझा मोहक चेहरा पाहून
दिवसाला सुरवात केली
की वाटत नाही कामाचा ताप
सकाळी सकाळी
तुझा मोहक चेहरा पाहून
माझ्या मनाची कळी
फुलत राहते आपोआप
तुषार जोशी, नागपूर
तुझे घारे डोळे
.
.
तुझे घारे डोळे
व्याकुळली मूर्ती
मला दिसते
मनाच्या चेनल वर
आणि एक्सलेटर वर
पाय आणिच दाबल्या जातो
माझी वाट बघत
तुझी होणारी तगमग
पोचते वाऱ्याबरोबर
माझ्या श्वासा श्वासात
आणि माझाही जीव
धडधडतो कासावीस होतो
आपले प्राण
आपण घरीच ठेवून आलोय
आणि कसे तरी तगलोय
याचा रोज घरी जातांना
मला असाच प्रत्यय येतो
तुषार जोशी, नागपूर
मंगळवार, २४ एप्रिल, २००७
बसू नकोस
.
.
वादळ वारा येईल
समजून खचू नकोस
पंख उघडून उडू लाग
बसू नकोस
बसणाऱ्याला आकाश
मुळीच मिळत नसतं
उडल्याशिवाय आपलं किती
कळत नसतं
तुषार जोशी, नागपूर
डोळ्यात थेट माझ्या
डोळ्यात थेट माझ्या स्वप्न कोरलेले
ध्येय प्राप्ती साठी चित्त भारलेले
माझ्या समोर माझे ध्येय फक्त आता
अन्य सर्व काही केव्हाच सोडलेले
यशाकडेच माझा नेम साधलेला
नेत्र बाण माझे तिक्ष्ण रोखलेले
तुषार जोशी, नागपूर
सोमवार, २३ एप्रिल, २००७
तू चित्र मुग्ध ऐकतेस
.
.
तू चित्र मुग्ध ऐकतेस
वाटतं बोलणं थाबवून
नुसतच बघावं
किंवा
बोलत रहावं
दिवस रात्र आणि
तुला डोळ्यांनी साठवावं
तू चित्र मुग्ध ऐकतेस
वाटतं पटकन
फोटो काढावा
जवळ पास कुणी नसतांना
तोच काढून
समोर लावावा
तू चित्र मुग्ध ऐकतेस
बोलण्याचं ही
अगदी होतं सार्थक
शब्दांना नवे अर्थ
प्राप्त होतात
कधी जरी असले निरर्थक
तू चित्र मुग्ध ऐकतेस
तुझी ही
पद्धत निराळी
तुला नेमकं ठाऊक आहे
कशी फुलवायची
कोमेजली कळी
तुषार जोशी, नागपूर
सिलेबस
.
.
आयुष्याचा सिलेबस
आधीच का नाही दिला
खूप अभ्यास करून
मोकळा झालो असतो
मैत्री नाती व्यवसाय
सगळ्यांमध्ये
पैकी च्या पैकी गुण
घेऊन आलो असतो
आयुष्याचा सिलेबस
आधीच का नाही दिला
कुठे गड्डा आहे
आधिच कळले असते
काही विषयात
आमची शोभा होणे
अगदीच शुन्य मिळणे
तरी टळले असते
तुषार जोशी, नागपूर
तुझे डोळे
.
.
तुझे डोळे
प्रकाशतात
माझ्या अंधःकारात
आणि मला माझी
वाट सापडते
तुझे डोळे
अखंड अविरत
तेवत राहतात हृदयात
आणि मला हे जगणे
खूप आवडते
तुझे डोळे
सूर्य होतात
माझ्या पाना पानांसाठी
आणि माझे अस्तित्व
हिरवे होते
तुषार जोशी, नागपूर
रविवार, २२ एप्रिल, २००७
आज आठवू
रोज रोज भांडणे आज आठवू
रात्र रात्र जागणे आज आठवू
देत घेत खायचा शाळेचा डबा
शाळेचे चांदणे आज आठवू
दादला तुला कसा मला कसा हवा
स्वप्नांचे पाहणे आज आठवू
फिरून आज घालूया हात साखळी
तळव्यांवर नाचणे आज आठवू
तुषार जोशी, नागपूर
वायोलीनच्या तारांवर
वायोलीनच्या तारांवर
संगीत कोरतो आहेस
हृदयामध्ये आर्त रूपाने
तूच पोचतो आहेस
नाद तुझ्या तारांचे करती
मन्त्र मुग्ध मनाला
जगणे सुंदर आहे प्रत्यय
येतो क्षणाला क्षणाला
तुषार जोशी, नागपूर
शनिवार, २१ एप्रिल, २००७
शिंपला
आज रोहन ने मला
एक शिंपला दिला
आणि मी त्याला
माझा खाऊ
रोहन वेडाच आहे
पाहून चालत नाही
मग झाला ना
हाताला केव्हढा बाऊ
ए तू माझ्याशी
खेळायला येशील
आपण गम्मत
करायला जाऊ
मी तुला माझा
शिंपला दाखवीन
आपण मस्त
शिंपला पाहू
तुषार जोशी, नागपूर
खाली बघणे
हृषिकेश, मित्रा मोबाईल छायाचित्रकारीता अशी शाखाच काढायला हवी आता तुझ्या मोबाईल छायाचित्रांकडे पाहून. एक रसिक म्हणून मी जेव्हा या छायाचित्राकडे बघतो तेव्हा माझ्या मनात जे भाव येतात ते इथे मांडतो आहे. कदाचित ते मुळात असणाऱ्या मूड सारखे नसतीलही, पण मला हे छायाचित्र जसे भेटले तसेच मी मांडणे महत्वाचे, ही घे एका रसिकाची शब्दचित्र भेट
तुझं नेहेमीचंच आहे
उत्तर द्यायचे नसले
म्हणजे..
बोटांशी खेळत ..
खाली बघणे.
मग हळूच वर बघत ..
गोड हसणे,
आणि म्हणणे..
जाउदे रे! चल दुसरे काही बोलू.
पण आज
तुझ्या रेशमी,
केसांची शपथ..
आज मी
तुझे दोन्ही हात,
हातात घेऊन..
खाली बसुन,
तुला विचारणार आहे.
म्हणजे तुला ..
खाली बघितल्यावर ही,
मीच दिसणार.
मग म्हणून दाखव,
जाऊदे रे! चल दुसरे काही बोलू.
तुषार जोशी, नागपूर
शुक्रवार, २० एप्रिल, २००७
खुन्नस
हृषिकेश, खूपच झकास टिपली आहेस रे खुन्नस. मी माझा एक अर्थ ठेवतो त्या क्षणावर. हे वाचून पुन्हा बघ ते छायाचित्र. कसे वाटले?
रे आयुष्या किती कष्ट देशील मला रे
बघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे
टाक टाक अडचणी टाक तू हव्या तश्या
मी समजेन त्या सगळ्यांना पायऱ्या जश्या
त्याच पायऱ्यांनी चढेन पुढचा मजला रे
बघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे
आता पुन्हा तुझ्याशी खुन्नस आहे माझी
मी झटकली कमकुवत विचारांची ओझी
आता सगळा माझ्यासाठी मार्ग खुला रे
बघ तू निश्चय मी ही पुरून उरेन तुला रे
तुषार जोशी, नागपूर
गुरुवार, १९ एप्रिल, २००७
किती टक लावून बघशील?
हृषिकेश, मित्रा तुला पाहून खूप romantic mood झाला रे बाबा. मग मला काही शब्द लिहावेच लागले. तू पण वाच आणि आवडले तर कळव.
किती टक लावून बघशील?
मला लाज वाटते ना
आज काय डोळ्यांनीच
खाऊन टाकायचेय का?
आता तुला विचारायची
गरजच उरली नाही
कशी दिसतेय तुझे डोळेच
सांगताहेत सगळे काही
किती टक लावून बघशील?
सगळ्यांना कळेल ना
आपली गम्मत आताच
सांगून टाकायचीय का?
जा बाई मीच जाते
सगळ्यांना नाहीतर दिसणार
गालावरच्या लालीचे
काय कारण सागणार?
तुषार जोशी, नागपूर
बुधवार, १८ एप्रिल, २००७
पदचिन्हे
ही पदचिन्हे पाहून कितीतरी विचार मनात येतात. त्यातले हे तीन विचार त्यात प्रखर आहेत. छायाचित्रकाराने आपले नाव wings-of-phoenix त्या छायाचित्रकाराचे अभिनंदन.
ही पदचिन्हे शिकवतात मज काही
या जगतामध्ये मीच एकटा नाही
इथे कुणी आले अन चालत गेले
हा विचार निव्वळ आहे आशादायी
एक सही तर मीही ठेऊन जाईन
घेऊन माझ्या पदचिन्हांची शाई
तुषार जोशी, नागपूर
गान समाधी
मयुरेष ने जो क्षण इथे टिपलाय त्याला माझा सलाम. पाहतांना माझे क्षण संगितमय झाले. त्याच्या छायाचित्राला माझा हा शब्दचित्र सलाम...
आलाप असा की नव चैतन्य जागे
तृप्त मनाने गान समाधी लागे
एकेक सूर उजळतो आयुष्याला
आनंद सुरांच्या धावे मागे मागे
मज कुणी नको साथ कराया आता
माझे जगणे तर फक्त सुरांनी भागे
आयुष्याचा रत्न जडित हा शेला
विणतो मी घेऊन सुरांचे धागे
तुषार जोशी, नागपूर
सागर गहिरे डोळे
सोनल ने टिपले, निखळ सौदर्य. बघता बघता लगेच म्हणावेसे वाटते की तुझ्या हासऱ्या चेहऱ्या मध्ये शुभ्र गोडवा इतका होता, दुःखही माझे विसरून गेलो, तुझ्या कडे मी बघता बघता. सोनल तुझ्या या छायाचित्रासाठी तुला एक चंद्र, आणि एक स्वप्नांचे गाव बक्षिस दिले गं.
हे सागर गहिरे डोळे, हसणे मंद
ही कुंतल नक्षी करतो वारा धुंद
मी बघता बघता उरलो नाही माझा
लागला मला तुजला बघण्याचा छंद
हे सागर गहिरे डोळे, हसणे मंद
ही कुंतल नक्षी करतो वारा धुंद
अत्तरे निकामी सगळ्या या शब्दांची
तू बघण्याने ही पसरवतेस सुगंध
मी बघता बघता उरलो नाही माझा
लागला मला तुजला बघण्याचा छंद
तुषार जोशी, नागपूर
मी वेचीत चालले
अदिती, अगं काय वेचते आहेस कोण जाणे. मी मात्र शब्दवेणी विणली ग बाई. बघ आवडले का!
मी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला
मी छेडीत चालले सुरात आयुष्याला
मी सांगितले नाही जीवहा जडला माझा
तो सरळ सगळे सांगून मोकळा झाला
मी छेडीत चालले सुरात आयुष्याला
मी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला
मी छेडीत चालले सुरात आयुष्याला
मी टोपली भरून आनंद घेऊन आले
घे पांघर मला, चल विसर तुझ्या दुःखाला
मी छेडीत चालले सुरात आयुष्याला
मी वेचीत चालले दिसेल त्या स्वप्नाला
मी छेडीत चालले सुरात आयुष्याला
तुषार जोशी, नागपूर
मंगळवार, १७ एप्रिल, २००७
या तारांवर
मी वाजवतो मन गाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर
ऐक जरा रे मित्रा बस बाजूला
आयुष्याचे उखाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर
घे अशी तान तू मिसळ जीव सुरात
सोडून पुन्हा गाऱ्हाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर
संगीत भीनले इतके, झोकून देतो
आयुष्याचे चार आणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर
तुषार आता नाद फुलांचे झेला
आनंदाचे तराणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर
तुषार जोशी, नागपूर
स्वप्नाळू डोळे
किती स्वप्नाळू हे डोळे? यांना पडणारी स्वप्नेच भाग्यवान म्हणायची, हो ना?
या स्वप्नाळू डोळ्यांचे
होण्यास सदा झुरतात
तू जवळ करावे म्हणून
स्वप्न इथे फिरतात
तुला तुझ्या स्वप्नात
गुंग होतांना बघणे
म्हणजे माझ्यासाठी
विलक्षण अनुभव जगणे
तुषार जोशी, नागपूर
हास्याचे किटाणू
आता या मुलींना काय म्हणावे? निखळ हास्याचे किती कण यांनी हवेत सोडावे? मुलींनो हे घ्या तुमच्या हसण्यावर माझी दाद.
ती सकाळी सकाळी येते
हवेत प्रसन्न हास्याचे किटाणू
सोडून जाते
दिवस भर मी पछाडलेला
मधेच हसत असतो
तिचे स्मीत आठवत आठवत
हसणे पसरवत बसतो
प्रभाव संपत नाही
तो ती परत येते
माझ्याशी बोलता बोलता
गोड हसून घेते
हवेत प्रसन्न हास्याचे किटाणू
सोडून जाते
तुषार जोशी, नागपूर
सोमवार, १६ एप्रिल, २००७
तुझे हसणेच गोड
सोनल ने काढलेली छायाचित्रे आधी मला फक्त आवडायची, पण आता मला त्यांनी झपाटल्यासारखे झालेय. हे छायाचित्र खूप निरागस आहे, आणि बघणाऱ्याच्या ही ओठांवर अवचित हास्य आणणारे आहे. बहोत खूब, सोनल. माझी ही एक भेट या छायाचित्राला...
तुझे हसणेच गोड
जशी कच्ची पेरूची फोड
तुझे हसणेच गोड
कुणी किती निखळ हसावं?
आणि किती निरागस दिसावं?
ज्याला कुठेच नाही तोड
तुझे हसणेच गोड
काजळलेल्या हृदयालाही
हळूच बहरून टाकायची
तुझी नेहमीचीच खोड
तुझे हसणेच गोड
तुषार जोशी, नागपूर
स्वच्छ हासणे
स्वच्छ हासणे
तुझे कमाल गं
काळजामधे
घडे धमाल गं
श्वास चालणे
मधेच थांबतो
हृदयाचे किती
हाल हाल गं
केस मोकळे
हाय ही अदा
हाय घातकी
तुझी चाल ग
स्वच्छ हासणे
तुझे कमाल गं
काळजामधे
घडे धमाल गं
तुषार जोशी, नागपूर
तुझ्याशी फोनवर बोलतांना

लख्ख प्रकाश
हृषिकेश च्या छायाचित्र संचावर आज हे छायाचित्र सापडले. चेहरा उजळला आहे की प्रकाश असे वाटावे इतके जिवंत चित्र आहे. हृषिकेश ही घे माझी शब्ददाद.
या दिव्यात
मंद रूप दर्वळे
मोहरले
स्मीतहास्य कोवळे
हा प्रकाश
आज वाटतो नवा
लख्ख पेटला
हृदयाचा दीवा
घडले तुला
दिव्यात पाहणे
फिटले डोळ्यांचे
आज पारणे
तुषार जोशी, नागपूर
किती बोलका हा चेहरा?
सोनल हे तुझ्या या फोटोसाठी. तुझा हा फोटो बऱ्याच लोकांच्या हृदयात chemical reaction केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सारख्या शब्द चित्रकाराची दाद या शब्दात घे:
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
पापणीत काय
काय साठले?
दृष्ट काढूया
लगेच वाटले
पाहूनी तुला
सांग सांगू का?
जीव विरघळे
आज सारखा
रूप गोजिरे
वेड लावते
पाहताच हाय
दाद मागते
लाजलीस का?
सांग सांगू का?
चेहरा तुझा
किती गं बोलका
तुषार जोशी, नागपूर
बुधवार, ४ एप्रिल, २००७
जालपत्र चर्चा
आज जालपत्र चर्चा च्या माध्यामातून तो योग आला. आता या यात्रेत आणिक लेखकांना घेउन ही चर्चा खुसखुशीत करायचा प्रयत्न करणार.
तुषार जोशी, नागपूर