मंगळवार, २९ एप्रिल, २०१४

प्रेरणा

(छायाचित्र सौजन्य: ज्योती )
.
.
शब्द अपुरे पडती रूप
तुझे सांगताना
अजूनही विश्वास बसेना
तुला पाहताना
तू गोड इतकी कशी
तू कोण कुठल्या जगाची
तू मंद हासताना
धडधड वाढे हृदयाची
मला येते आहे मजा
जगण्याची

बघणे तुझे दिसणे तुझे
किती बोलके डोळे तुझे
पाहुन मन भरतेच ना
मन मागते असणे तुझे
हे स्वप्न की खरे शोधू कसे
मन नाचते कुणा सांगू कसे
हे भाग्य माझे जणु
ठेव जिवाची
साक्षात देवता तू
सौंदर्याची
मला येते आहे मजा
जगण्याची

तू वेगळी चाफेकळी
थोडीशी तू आहे खुळी
स्मरता तुला छळते मला
गालातली अल्लड खळी
तू आयुष्याची आशा नवी
तुला पाहताच मी झालो कवी
तू ओढ उत्कट किती
वेड्या मनाची
तू प्रेरणा माझ्या नव्या
कवितेची
मला येते आहे मजा
जगण्याची

 ~ तुष्की
नागपूर, २९ एप्रिल २०१४, ०८:३०

२ टिप्पण्या:

  1. तुष्की, तुम्ही फार छान कविता करता. खुप सुंदर लिहीलेली कविता वाचण्याचा हा दुर्मिळ योगच समजावा... धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद विरेन्द्र जी, आपल्याला कविता आवडली याचा मला आनंद आहे.

    उत्तर द्याहटवा