सोमवार, १६ जून, २०१४

श्वास वेडे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
का पाहता तुला मी, विसरून भान जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
कानात तारकांचे, तू डूल घातलेले
गालावरी मधाचे, साठेच ओतलेले
डोळ्यात भाव गहिरा, घेऊन खोल जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
रंगात सावळ्या या, जादू किती असावी
पाहून काळजाची शल्ये ही दूर व्हावी
वेधून काजळाचा कमनीय बाण जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
ओठात अमृताचे, दिसती हजार साठे
केसात गंध घ्याया, वारा अधीर वाटे
प्रत्येक श्वास तुझिया, स्मरणात खास जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
~ तुष्की
नागपूर, १६ जून २०१४, १०:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा