गुरुवार, ७ जून, २००७

साठा


beach view classroom, originally uploaded by amrita b.

.
.
जेव्हा जेव्हा कुणीच नसताना
झाडाखाली तुला भेटायला आलोय
सगळा ताप विसरून नवीन
इच्छा शक्तीचा कारखाना झालोय

तुझ्या केसात बोट फिरवून
पुन्हा तीव्र उर्जा घेतलीय
तुझ्या सुगंधात न्हाऊन नेहमीच
जुनी पुराणी कात टाकलीय

माझ्या जगण्यात असण्यात
तुझा सिंहाचा वाटा आहे
माझ्या प्रेमळ कविते तूच
माझा आशेचा साठा आहे

तुषार जोशी, नागपूर

भीती


stomp, originally uploaded by amrita b.

.
.
अपयश ही एक स्थिती आहे
हे कळले की भीती जाते
अपयशाला वाकुल्या दाखवण्याचे
अंगामधे नवे बळ येते

कितीही विक्राळ दिसला
जरी परिस्थितीचा चेहरा
आपण धरून ठेवायचा असतो
आत्मविश्वासाचा दोरा

अपयश हा एक बागुलबोवा
हे कळणे महत्वाचे
त्यानंतर सारी रात्र
शांत निर्मळ झोप येते

तुषार जोशी, नागपूर

चमत्कार

.
.
चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
माझ्या स्वप्नातला सखा अचानक
मला साक्षात भेटलेला बघतेय

मनापासून तुझी कशी झाले यावर
सहज कुणाचा विश्वास बसेल का?
माझ्यासारखे सोनेरी भाग्य घेऊन
या जगात कुणी तरी असेल का?

तुझ्या विचारात दिवस आणि रात्र
आताशा चिंब चिंब भीजलेली असते
दिवस असे मस्त छान जात आहेत
की मला वेळेचे मुळी भानच नसते

चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
तुझ्या विचारात तुझ्या स्वनात
न्हाऊन अगदी नखशिखांत सजतेय

तुषार जोशी, नागपूर

बुधवार, ६ जून, २००७

तुझ्यात आहे


group effort, originally uploaded by amrita b.

.
.
तुला नक्कीच जमेल
जमवायची शक्ती तुझ्यात आहे
तुला नक्कीच सुचेल
सृजनशील युक्ती तुझ्यात आहे

विकासाचे धडे
आपण पडल्यावरच शिकतो
पडून पुन्हा उठतो
तो नेहमीच टिकतो
तुला यश मिळेल
प्रयत्नशील वृत्ती तुझ्यात आहे

तुला नक्कीच जमेल
जमवायची शक्ती तुझ्यात आहे

जेव्हा जमत नाही
तेव्हा मन जरा खचतं
तुला जमेल विश्वास ठेव
म्हटल्यावरती हसतं
तुझा विश्वास बसेल
सद्विवेक बुद्धी तुझ्यात आहे

तुला नक्कीच जमेल
जमवायची शक्ती तुझ्यात आहे

- तुषार जोशी, नागपूर