सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

तुझे हसणे

(छायाचित्र सौजन्य: प्रसाद )
.
.
तुझे हसणे सख्या रे, इंद्रधनुष्यासारखे
भरे सातही रंगांनी, माझे आयुष्य हरखे
.
तुझे हसणे निर्मळ, तुझे हसणे आनंद
तुझे हसणे, चोरून, मला पाहण्याचा छंद
.
तुझे हसणे पाहून, क्षण क्षण होई खास
सुखमय होतो मग, दिवसाचा हा प्रवास
.
माझ्या कडे पाहून तू, हसतोस जेव्हा जेव्हा
काळजाचे होते पाणी, तिथे तिथे तेव्हा तेव्हा
.
परिस्थितीचे टोचणे, उन्ह जगाचे जहाल
विसरावे पांघरून, तुझ्या हसण्याची शाल
.
तुझे हसणे भरते, हसू माझ्याही ओठात
दरवळे रोम रोम, दीस सुगंधी होतात
.
आठवत राही सदा, ढब तुझ्या हसण्याची
तुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २७ ऑक्टोबर २०१४, ०८:३०

बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

छाप

(छायाचित्र सौजन्य: पल्लवी )
.
.
सावळा कसा? विचारल्यावर
मी म्हणतो तुझ्या सारखा
भोळा कसा? विचारल्यावर
मी म्हणतो तुझ्या सारखा
.
कुरळे कसे? विचारताच
मी म्हणतो तुझ्या सारखे
हळवे कसे विचारताच
मी म्हणतो तुझ्यासारखे
.
अल्लडपणाच्या व्याख्येतही
मी तुझेच नाव घेतो
वेड लावणाऱ्या लोंकातही
पहिले तुझेच नाव देतो
.
तुला पाहिल्या पासून जगच
तुझ्या पासून सुरू होतयं
सावळ्या रंगाची कुरळ्या केसांची
छाप पाडून जीव घेतय
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०१ ऑक्टोबर २०१४, ०८:५०