गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

आश्चर्याची झालर

(छायाचित्र सौजन्य: मनाली )
.
.
रोज एका नव्या रुपात
समोर येतेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू

रोज नवेच रूप पाहून
मी विचार करतो
तू आहेस अथांग, मलातर
फक्त थेंबच दिसतो
आश्चर्याची झालर असलेली
लाट होतेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू

मी ठरवतो तुला बघून
अचंभित नाही व्हायचे
तुझे कातिल हावभाव
कसले निर्णय टिकायचे
हृदयाच्या आत खोल
घुसत जातेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू

तुषार जोशी, नागपूर
.
.

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

ती हसल्यावर

.
.
ती हसल्यावर वार किती होती
काळजावरती काळजावरती
ती दिसल्यावर तिच्या कडे सगळ्या
नजरा ठरती नजरा ठरती

किमया मादक तरी निरागस
सात्विक तरीही राजस राजस
कसे गुलाबी सुगंध पेरीत येते
आणिक काबिज करून जाते
अवघी धरती अवघी धरती

ती हसल्यावर वार किती होती
काळजावरती काळजावरती

खळी असावी किती मनोरम
केस जणु ते  रेशम रेशम
तरूण बिचारे भान हरपुनी
खुळ्या सारखे रोज
तिच्यावर मरती तिच्यावर मरती

ती हसल्यावर वार किती होती
काळजावरती काळजावरती

तुषार जोशी, नागपूर
.
.

काही चेहेरे

(छायाचित्र सौजन्य: गिरिष)
.
.
काही चेहरे स्नेहाचा संदेश सांगतात
काही चेहरे प्रगल्भतेचे कोष वाटतात
लक्षात राहतात भेटल्यावरती काही चेहरे
काही चेहरे पाहताक्षणीच छाप पाडतात

काही चेहरे दिसले की मन शांत राहते
काही चेहरे हसतील तेव्हा सुख दाटते
हवेच असतात जवळ नेहमी काही चेहरे
काही चेहरे बोलतात तेव्हा धन्य वाटते

काही चेहरे प्रामाणिक प्रशस्त वाटती
काही चेहरे सत्याची देतात पावती
सभोवताली व्यापुन उरती काही चेहरे
काही चेहरे तर डोळ्यांनीच शिस्त लावती

भाग्यवान तो असा चेहरा ज्यास मिळाला
मित्रा तुझा चेहरा म्हणजे एक त्यातला

तुषार जोशी, नागपूर
.
.

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

तुला कोणी सांगितलेय का गं?

(छायाचित्र सौजन्य: मयुरी)
.
.
तुझ्याबद्दल बोलायचे झाले तर

माझे शब्द वेड्यासारखे वागतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

तुला बघुन अप्सरा पण लाजतात.

श्वास थांबतो हृदयाचा ठोका चुकतो

मनामध्ये मोर थुई थुई नाचतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

मेघ तुला बघायलाच दाटतात.

तुला कितीदा पण पहिले तरी
ते क्षण नेहमी कमीच वाटतात

तुला कोणी सांगितलेय का गं?

तू नसतानाचे क्षण किती जाचतात

तुझा विचारही मनात येतो जेव्हा
मनात अत्तराची तळी साठतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

तू येताच चोहिकडे सतारी वाजतात

तू हसतेस, डोळ्यांचे पारणे फिटते

चैतन्याचे वारे वाहू लागतात

तुला कोणी सांगितलेय का गं?
लोक प्रार्थनेत तुझे दिसणे मागतात

तुषार जोशी, नागपूर
.
.

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

काय आवडतं

(छायाचित्र सौजन्य: संहिता)
.
.
तू विचारायचीस
काय आवडतं माझ्यातलं
मी म्हणायचो नाक
ते आहे एक लाखातलं

तेव्हा एक सांगायचं
राहूनच जायचं
तुझ्या डोळ्यांबद्दल बोलायचं
राहूनच जायचं

आणि तुझं मोठ्ठ कपाळ
ते मिश्किल ओठ
आणि ते तुझं माझ्याकडे
त्वेषाने रोखलेलं बोट

काय काय सांगायचं गं
आणि कसं शब्दात बांधायचं
तुझ्यात जे भरून ठेवलय बाप्पाने
काही कवितांत कसं मावायचं

म्हणूनच म्हणायचो नाक
ते आहे एक लाखातलं
माझ्या मैत्रीणी सारखं
कुण्णालाच नाही मिळालेलं

तुषार जोशी, नागपूर
.
.

निराळी दिसते ती

(छायाचित्र सौजन्य: प्रेक्षा )
.
.
निखळ निरागस प्रसन्न हसते ती
सर्वांमधे उठून निराळी दिसते ती

तिला भेटतो तेव्हा निराशा दूर पळे
उडून जाई किती वेळ तो नाही कळे
नेहमी चैतन्याच्या धुंदीत असते ती
सर्वांमधे उठून निराळी दिसते ती

सावळा रंग तिला मोहक छटा देतो
गोडवा गाली तिच्या स्वतःचा अर्थ घेतो
प्रेमळ साधी सोपी नेहमी भासते ती
सर्वांमधे उठून निराळी दिसते ती

स्वप्नांच्या बाबतीत वेडी आहे जराशी
त्यांचे थवेच्या थवे असती तिच्या पाशी
स्वप्नांना सजवित खुशाल बसते ती
सर्वांमधे उठून निराळी दिसते ती

तुषार जोशी, नागपूर
.
.