गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

सेल्फी

(छायाचित्र सौजन्य: अदिती
.
.
सेल्फी काढताना
तू मोबाईल ला जे जे जवळून निरखू दिलेस
तेच मोबाईल चे डोळे
मला मिळालेत पाहताना.
.
आता...
श्वासांच्या अंतरावर येऊन
तुला बघणे होतेय
सेल्फी मुळे
.
ओढ होती आधी...
सेल्फीमुळे;
वेड लागायला लागले आहे.
आणि इतक्या जवळून पाहताना
अस्तित्व
वितळत चालले आहे
.
कुणाला श्वासाच्या
अंतरावर ओढून
मंद हसणे म्हणजे
वाळलेल्या रानात
ठिणगी लावण्यासारखे आहे
नाही का?

तुष्की नागपुरी
२४ सप्टेंबर २०१५, ०८:००

बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५

खुणा

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
उन्हाचांदण्याची तुझी भूल होते सुखाच्या सरी
पुन्हा मी मरावे पुन्हा जन्म घ्यावे कितीदा तरी

तुझ्या हासण्याने उन्हे गार होती उन्हाळ्यातली
फुलारून रोमांच येतो नवा स्पंदनांच्या वरी

खुले मोकळे केस पाहून जागी किती स्तब्ध मी
नटोनी फुलांनी नशीबात यावे किती भरजरी

तुझा तीळ गोंदून जातो मनाला उभे आडवे
तुझ्या काजळाच्या खुणा कोरल्या काळजाच्या उरी

कितीदा बघावे तरी नाच व्हावे मनासारखे
किती जन्म 'तुष्की' जणू नेत्र माझे रित्या  गागरी

तुष्की नागपुरी
२३ सप्टेंबर २०१५, ०९:००

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

सावळ काया

(छायाचित्र सौजन्य: सुप्रिया
.
.
सजली घन सावळ काया
मन आतुर रोज बघाया
कसली मन मोहन जादू
हरते, हसताच मला तू

नजरेतुन बाण जिव्हारी
हसण्यातुन रोख दुधारी
घन राजस केस नशीले
मन कातर कातर झाले

नथ नाजुक लोभस छोटी
मधु भावसुधा तव ओठी
कळले घडले हलक्याने
भिजले मन प्रीत धुक्याने

तुष्की नागपुरी
२२ सप्टेंबर २०१५, २१:००

(वृत्त: मेघवितान - लल,गाललगालल,गागा)

सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

तू मला मी तुला

(छायाचित्र सौजन्य: दीप्ती
.
.
हास्य ओठांतुनी सांडते केवढे
का गं डोळ्यांमधे दाटलेले झरे?
हास्य वाटे जसे मोहरे केवडा
खोल डोळ्यांमधे खिन्नता का उरे?

साचल्याने कसे व्हायचे सांग तू
वाहुदे शल्य ठेऊ नको बांधुनी
हासणे ना खरे फक्त ओठांवरी
हासणे येऊदे थेट डोळ्यांतुनी

दे तुझे शल्य सारे मला होऊदे
दीप वाटेवरी तू मला मी तुला
वेल झाडास का भार होते कधी?
रोम रोमातुनी हास माझ्या फुला

तुष्की नागपुरी
२१ सप्टेंबर २०१५, १८:३०

सोहळा जाणिवांचा

( छायाचित्र सौजन्य: दीप्ती )
.
.
तुझे शुभ्र लावण्य माझ्या मनाला
सुगंधापरी भारते जीव घेते
तुला आठवोनी असा गुंग होतो
मलाही कळेना कधी भान येते

तुझा सूर्य येताच माझ्या क्षितीजी
पहाटे  परी सोहळा जाणिवांचा
विचारांस झाली तुझी घोर बाधा
मनी मोर वेडा तुझ्या पावसाचा

तुझा छंद आनंद देई असा की
अता कष्ट ते थांबले शोधण्याचे
तुला जाणुनी ध्येय दाटून आले
तुझे नाव जन्मा वरी गोंदण्याचे

तुष्की नागपुरी
२१ सप्टेंबर २०१५, ०८:००