शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

ट्रेडीशनल डे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.


ट्रेडीशनल डे ला
तू साडी नेसून आलीस
आणि मला आपण हरीण असल्याची जाणीव झाली
साधेसुधे हरीण नाही
तर कस्तुरी चे हरीण
ज्याच्याजवळ कस्तुरी असते
एक आंतरिक आत्मिक सुगंध
पण ते कळायला
त्याचा जिवच जावा लागतो
आज तर तू माझा जीव घेतलास
तुला इतर वेळा पाहतांना
तू मनात भरत होतीस
आज मनाला आरपार चिरून गेलीस
तुझ्या त्या साडीमुळे फुलून आलेल्या वसंत वळीवाच्या सरींमधे चिंब होतच होतो
की तेवढ्यात तू मला आंधळा करून टाकलेस
तो आंधळा जो देवाला एक डोळा मागतो
आणि त्याला देव दोन डोळे देतो
तुझ्याकडे कितीवेळ एकटक पाहिले तर
'ओके आहे' याचा विचार सुरू असतानाच
म्हणालीस फोटो काढ ना माझे.
तुझ्या परवानगीनेच...
तुझ्याकडे एकटक पाहण्याचा परवाना
घेऊन, सुरू झाला माझा
तुला अनिमिष डोळ्यांनी पाहण्याचा
तुला डोळ्यात साठवण्याचा सोहळा
एक कौतुक भरून आलं डोळ्यात
की ही अदा, हे साडीमधे
चित्तवेधक वावरणे
हे हिला आधीपासूनच येत होते आणि
मोराने पिसारा फुलवल्याप्रमाणे
एकदम ही आपल्या सगळ्या अदा
घेऊन अशी आली आहे
जसा अचानक पहिल्या पावसानंतर
मृदगंधाने आसमंत भरून जावा
आणि जिवाला एक भारावून टाकणारा
रोमांचक अनुभव मिळावा
आता फक्त सेटिंगच करत राहणार आहेस
की क्लीक पण करणार आहेस
तू हटकल्यावर मी भानावर आलो
मग वेगवेगळ्या ऐंगल ने फोटो
काढतांना जाणवत गेलं की तू
एक केलिडोस्कोप आहेस जणू
प्रत्येक नव्या दिशेने
नवा धक्का देणारी
तू आज तुझं हे रूप दाखवून
या दिवान्याला
जे काही दिलस ते
आणि हा ट्रेडिशनल डे
मी कधी विसरणार नाही
तू तुझे हे साडीतले रूप घेऊन
तेवत राहशील मनभर
आठवणींच्या रूपात
.
.
(देवाशिषच्या कविता / तुष्की नागपुरी)
श्रीनगर, २५ डिसेंबर २०१५, १०:००

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

गॉगल

( छायाचित्र सौजन्य : संकेत )
.
.
तुझ्या डोळ्यांवर येता होतो गॉगल देखणा
उठून दिसे अजून रांगडा मराठी बाणा
.
गॉगलच्या पाठीमागे भाबडी आशा राहते
तुझी नजर चोरून माझ्याकडेच पाहते
.
चार चांद लावी असा गॉगलचा हा दागिना
दिसे माचोवानी रूप नजरच हटते ना
.
कितीक गॉगल वाले किती पाहिले गॉगल
तुझ्या डोळ्यांवर येता त्याची होतेया गजल
.
तुझे गॉगल घालणे तुझे जबरी हसणे
किती साहजिक आहे मन वेडे पिसे होणे
.
उन्ह तापले सभोती जरी रण रण खूप
शांत सावली घालते तुझे गॉगलचे रूप
.
तुझ्या गॉगल मधून साजे चमक उन्हाची
तुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २१ डिसेंबर २०१५, १७:००

रविवार, २० डिसेंबर, २०१५

रूप असे की

( छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
रूप असे की जग सगळे हरवुनच  जावे
बघणारा मी आणिक तू ईतकेच उरावे

रूप असे की कणा कणातुन गोड शहारा
अलगद गालांवर फिरणारा मोरपिसारा

रूप असे की श्वासांचे होतात उसासे
मनास सावरण्याला स्वप्नांचेच दिलासे

रूप असे की ऐटीत गागल केस मोकळे
हृदयाची धडधड थांबवू कशी ना कळे

रूप असे की बघता बघता वेडे होणे
खुळ्या सारखे विचारात मग गुंतुन जाणे

तुष्की नागपुरी
नागपूर, १९ डिसेंबर २०१५, २२:००

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

नकोसा भाग

(छायाचित्र सौजन्य: लीन )
.
.
मी पूर्णच आहे.
आखिव रेखीव घडलेला.
काही नकोसा भाग
तासून बाजूला केला;
की दिसायला लागेन,
माझ्या दिव्य रूपात तुम्हाला
आणि मलाही.
हे नकोसे भाग
काढायला, मी सुरवात करतोय
स्वतःवरच घाव घालून.
नको असलेला...
एक एक भाग बाजूला काढतोय.
मला दुखेल..
वेदनेने विव्हळायला होईल..
मी ओरडेनही,
पण त्यानेच मी तळपत जाईन.
जे उरेल ते दिव्य दिसेल.
समाधानाने बहरलेले,
आनंदाचे अस्तित्व असेल.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १५ ऑक्टोबर २०१५, २०:३०

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

सेल्फी

(छायाचित्र सौजन्य: अदिती
.
.
सेल्फी काढताना
तू मोबाईल ला जे जे जवळून निरखू दिलेस
तेच मोबाईल चे डोळे
मला मिळालेत पाहताना.
.
आता...
श्वासांच्या अंतरावर येऊन
तुला बघणे होतेय
सेल्फी मुळे
.
ओढ होती आधी...
सेल्फीमुळे;
वेड लागायला लागले आहे.
आणि इतक्या जवळून पाहताना
अस्तित्व
वितळत चालले आहे
.
कुणाला श्वासाच्या
अंतरावर ओढून
मंद हसणे म्हणजे
वाळलेल्या रानात
ठिणगी लावण्यासारखे आहे
नाही का?

तुष्की नागपुरी
२४ सप्टेंबर २०१५, ०८:००

बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५

खुणा

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
उन्हाचांदण्याची तुझी भूल होते सुखाच्या सरी
पुन्हा मी मरावे पुन्हा जन्म घ्यावे कितीदा तरी

तुझ्या हासण्याने उन्हे गार होती उन्हाळ्यातली
फुलारून रोमांच येतो नवा स्पंदनांच्या वरी

खुले मोकळे केस पाहून जागी किती स्तब्ध मी
नटोनी फुलांनी नशीबात यावे किती भरजरी

तुझा तीळ गोंदून जातो मनाला उभे आडवे
तुझ्या काजळाच्या खुणा कोरल्या काळजाच्या उरी

कितीदा बघावे तरी नाच व्हावे मनासारखे
किती जन्म 'तुष्की' जणू नेत्र माझे रित्या  गागरी

तुष्की नागपुरी
२३ सप्टेंबर २०१५, ०९:००

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

सावळ काया

(छायाचित्र सौजन्य: सुप्रिया
.
.
सजली घन सावळ काया
मन आतुर रोज बघाया
कसली मन मोहन जादू
हरते, हसताच मला तू

नजरेतुन बाण जिव्हारी
हसण्यातुन रोख दुधारी
घन राजस केस नशीले
मन कातर कातर झाले

नथ नाजुक लोभस छोटी
मधु भावसुधा तव ओठी
कळले घडले हलक्याने
भिजले मन प्रीत धुक्याने

तुष्की नागपुरी
२२ सप्टेंबर २०१५, २१:००

(वृत्त: मेघवितान - लल,गाललगालल,गागा)

सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

तू मला मी तुला

(छायाचित्र सौजन्य: दीप्ती
.
.
हास्य ओठांतुनी सांडते केवढे
का गं डोळ्यांमधे दाटलेले झरे?
हास्य वाटे जसे मोहरे केवडा
खोल डोळ्यांमधे खिन्नता का उरे?

साचल्याने कसे व्हायचे सांग तू
वाहुदे शल्य ठेऊ नको बांधुनी
हासणे ना खरे फक्त ओठांवरी
हासणे येऊदे थेट डोळ्यांतुनी

दे तुझे शल्य सारे मला होऊदे
दीप वाटेवरी तू मला मी तुला
वेल झाडास का भार होते कधी?
रोम रोमातुनी हास माझ्या फुला

तुष्की नागपुरी
२१ सप्टेंबर २०१५, १८:३०

सोहळा जाणिवांचा

( छायाचित्र सौजन्य: दीप्ती )
.
.
तुझे शुभ्र लावण्य माझ्या मनाला
सुगंधापरी भारते जीव घेते
तुला आठवोनी असा गुंग होतो
मलाही कळेना कधी भान येते

तुझा सूर्य येताच माझ्या क्षितीजी
पहाटे  परी सोहळा जाणिवांचा
विचारांस झाली तुझी घोर बाधा
मनी मोर वेडा तुझ्या पावसाचा

तुझा छंद आनंद देई असा की
अता कष्ट ते थांबले शोधण्याचे
तुला जाणुनी ध्येय दाटून आले
तुझे नाव जन्मा वरी गोंदण्याचे

तुष्की नागपुरी
२१ सप्टेंबर २०१५, ०८:००

बुधवार, १५ जुलै, २०१५

किल्ला

(छायाचित्र सौजन्य: मनाली )
.
.
किती जहरी तुझं गं हासणं
माझ्याकडं बघुन मगापासनं
आधिच सावळ्या रंगाची भूरळं
त्यात मोकळ्या केसांनी जाचणं

तुला पाहिल्या पासुन बये गं
दुनिया ऑऊटॉ फोकसं झाली
किती छटा मी टिपल्या तरीही
तुझ्या अदेची सर ना आली

रूप तुझे केवढे गनीमी
सांभाळता आले ना स्वतःला
गुंतलो रायगडाची शपथ
तुझा झाला हा हृदयाचा किल्ला

तुष्की नागपुरी
नागपूर, १५ जुलै २०१५, ०८:००

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रूप बिलोरी

(छायाचित्र सौजन्य: अनुराधा)
.
.
उफ्फ तुझे हे रूप बिलोरी
चित्त पाखरू फसले गं
कुठं जाईना काही खाईना
बावरल्यागत बसले गं

बट माथ्यावर, सळसळणारे
नाग मनाला डसले गं
जीव बघूनच विरघळलेला
भान तयाला कसले गं

नजर रोखूनी तुझे पहाणे
बाण दिलावर धसले गं
तू हसल्यावर घाव बिथरुनी
खोल गोड ठसठसले गं

तुला पाहता नशीब माझे
धुंद होऊनी हसले गं
ओवाळावा जीव मनातून
विचार असले तसले गं

तुष्की नागपुरी
नागपूर, १४ जुलाई २०१५, ०१:००

मंगळवार, ३ मार्च, २०१५

हिरो

(छायाचित्र सौजन्य: निलेश )
.
.
जरा फसले तुझ्या त्या
घनदाट मिशी ला रे
थोडा थोडा हात होता
आपल्या त्या विशी चा रे
.
कसे हसता खेळता
दोन नव्हे एक झालो
तुझ्याशिवाय जगणे
कधी नकोच म्हणालो
.
किती तरी पावसाळे
चाललो आयुष्यवाट
तुझी मिशी पाहिलीकी
आठवते सुरवात
.
तुझी अनेक रूपे मी
पाहिल्या रे किती अदा
तरीही अजून मन
तुझ्या मिशीवर फिदा
.
तुझा पहिला प्रभाव
नव्हे कधी सरायचा
घनदाट मिशीवाला
हिरो तूच आयुष्याचा
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०३ मार्च २०१५, ००:००

झुळुक

(छायाचित्र सौजन्य: छाया )
.
.
तू दुर्मिळ नरगिस फूल
निनावी भूल, जगाच्या साठी
तू अनवटशी चाहूल
हवासा पूल, मनाच्या काठी
.
तू सळसळणारे नाग
किती अनुराग, मुक्त केसांचा
तू पहाटभोळी जाग
अनावर राग, धुंद श्वासांचा
.
तू मंद झुळुक आगळी
कळी पाकळी, खुलाया लागे
तू गूढ ओढ सावळी
वेड वादळी, जिवाच्या मागे
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०३ मार्च २०१५, ०८:००

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

खळी

(छायाचित्र सौजन्य: प्रणाली
.
.
कितेक खळ्या पाहिल्यात पण
तुझी खळीच लाजवाब
बाकी साऱ्या सुंदर तरी
अतुलनीय हिचा रूबाब
.
तुझी खळी काळजाला भूल
तुझी खळी निसरडा कडा
नजर पडताच घसरतोच गं
पाहणारा प्रत्येक बापडा
.
टपोर डोळे अवखळ केस
वेड लावते खेळकर अदा
तू हसताच उमलते खळी
जन्मच सगळा होतो फिदा
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २४ फेब्रुवारी २०१५, २०:३०

भुरळ

(छायाचित्र सौजन्य: प्रणाली )
.
.
किती कविता लिहिल्या तरी
पुन्हा नवं सुचतं
तुझं असणं रोजचचं तरी
पुन्हा नवं असतं
 .
मला वाटतं कळलीस मला
तरी नव्याने छळतेस
पुन्हा अनोखी अदा होतेस
रोज नव्याने कळतेस
.
कधी केसांची भुरळ घालतेस
खळीची कधी डोळ्यांची
कधी 'स्टुपिड' म्हणून करतेस
मधुर सुरवात दिवसाची
.
कायमचाच गोंदला गेलाय
तुझा विचार मनात
तुझ्या असण्याचा सुगंध भरलाय
माझ्या क्षणा क्षणात
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २४ फेब्रुवारी २०१५, १०:००

वसंत ऋतू

(छायाचित्र सौजन्य: प्रणाली )
.
.
तू खूप छान दिसतेस
छे छे नाही जमलं
तुझं दिसणं या शब्दात
बांधता येईल कसलं

पार अमर्याद आहे
तुझं दिसणं तुझं असणं
तसा अन्यायच होईल
तुला शब्दात बांधून ठेवणं

तुझी खळी तुझे डोळे
त्यांचे माझ्यावर वार
तू दिसताच हरवून गेलोय
खरंच कुणालाही विचार

जीव वेडा होतो तरी
अशीच हसत रहा तू
माझ्यासाठी कायमचाच
मग असतो वसंत ऋतू

तुष्की नागपुरी
नागपूर, २४ फेब्रुवारी २०१५, ०८:३०