सोमवार, ३० एप्रिल, २०१२

उत्सव

(छायाचित्र सौजन्य: वृंदा )
.
.
मला किनई एकदा तुला
माझ्याशीच फोनवर बोलताना पाहायचंय
'मला तू आत्ता पाहिजे'
हे जसं तू फोनवर म्हणतेस ना
ते कसं दिसतं ते टिपायचंय.

मी जेव्हा म्हणतो की
'तू सुगंधाची कुपी आहेस'
तेव्हा तू लाडिक हसतेस
काय दिसत असशिल गं तेव्हा!
ते दिसणं सुद्धा मला मनात साठवायचंय.

तासनतास माझ्याशी बोलताना
शुन्यात बघत असशील
वारा तुझ्या केसांशी खेळत असेल
देहभान विसरत असशील
ते चित्र एकदातरी हृदयामधे जपायचंय

मी तुला आज
तू दिसशील त्या अंतरावरून
करणार आहे फोन, आणि
तुला बोलताना बघण्याचा
मंत्रमुग्ध उत्सव साजरा करणाराय.

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
३० एप्रिल २०१२, ०८:००
.
.

रविवार, २९ एप्रिल, २०१२

सागर

(छायाचित्र सौजन्य: प्राजक्ती )
.
.
तुझ्या नजरेच्या लाटांमधे
मी चिंब होतो आणि
तुझे ते मंद स्मित करते
काळजाचे माझ्या पाणी

कधी गंभीर चेहरा देतो
वादळाची ही शक्यता
मी अडकतो बुडतो गं
अचानक बघता बघता

या भरती ओहटी मध्ये
किती सोसतेस गं सांग
मी रोज अनुभवतो ना
तू सागर एक अथांग

ही ओढ मनाला कुठली?
वेडा आवेग हा कसला?
मी पणाचा किनारा
अलगद माझा सुटला

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
२९ एप्रिल २०१२, ००:००
.
.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

माझे स्वप्न

(छायाचित्र सौजन्य: प्राजक्ती )
.
.
माझे बालपण जणू
माझ्या घरात रांगले
माझ्या लेकीच्या रूपाने
सुख पदरात आले

आनंदात घर न्हाले
जागा नाही दुःखासाठी
गोड गोड अमृताचे
किती बोल हिच्या ओठी

विसरते सारे काही
हिने आईगं म्हणता
सरे माझा शीण सारा
हिने घट्ट बिलगता

किती लाड करू हिचे
कशी दृष्ट काढू बाई
माझे स्वप्न पुरे झाले
जेव्हा झाले हिची आई

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२७ एप्रिल २०१२, २२:४०
.
.

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

सुखाची फुले

(छायाचित्र सौजन्य: रिधिमा )
.
.
तुला पाहिले मोकळे हासताना
मनातून ते चित्र जाईचना
दिशा धुंद झाल्या ऋतू गुंग झाले
असा थांबला काळ हालेचना

तुझे रूप आहे जगा वेगळाले
मला ठाव होते कधीचे तरी
तुला पाहताना पुन्हा जीव जाई
किती वादळे जन्म घेती उरी

कसे ते कळेना तुला भेटताना
सुटे जाण माझ्या जगाची मला
तुझ्या चांदण्यातून वेचून घेतो
सुखाची फुले रोज माळायला

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२५ एप्रिल २०१२, १०:३०
.
.

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

समाधान

(छायाचित्र सौजन्य: विश्वेश )
.
.
मिळाले तुझे चित्र तो नायगारा
तुझ्या त्या यशाने सुखी जाहले
असे नित्य आनंद वेचीत जावे
सदा तू मनाला पुन्हा वाटले

तुला पाहुनी रोज वाटे मनाला
तुझ्या पास यावे खुळ्या सारखे
तुझे चित्र आहेच हातात माझ्या
तरीही तुझे हासणे पारखे

म्हणावेस तू की निसर्गात राणी
तुझ्यासारखे गोड काहीच ना
कळावे मला हे तुझे प्रेम आहे
तरीही समाधान वाटे मना

तुझ्या बाजुला घट्ट बिलगून द्यावी
अशी पोज चित्रात राहील ती
कितीदा मनाला बळे आवरावे
धरावा अता धीर राजा किती

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२४ एप्रिल २०१२, १०:२०

.