शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

वाट पाहते

(छायाचित्र सौजन्य: प्रांजल)
.
.
स्वतःला आरशात पहावे मीच किती
वाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी

सुर्य होऊन येना तळप माझ्या नभी
डोळ्यांची आरती मी घेऊन आहे उभी
साक्षात होऊन ये स्वप्ना मधली प्रीती
वाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी

केसांना फिरणाऱ्या हातांची ओढ आहे
ओठात दाटलेले अमृत गोड आहे
येता विचार तुझा लाली गालावरती
वाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी

तुझ्यासाठी जपले सजले रूप माझे
रूपास टिपताना पाहूदे डोळे तुझे
हातांना विणू दे रे जन्मोजन्मीची नाती
वाट पाहते तुझी येना रे भेटीसाठी

तुषार जोशी, नागपूर
.
.

स्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
.
तिला पाहते आरशाच्या पल्याडं
तिचे रूप आहे किती देखणे
खुले केस मोहून जाती मनाला
सुगंधी जसे की फुले वेचणे

असे रोज होते किती वेळ जातो
किती आरशाच्या पुढे नाचणे
स्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे
खुळ्यासारखे चालणे वागणे

तिच्या स्वप्निचा तो कुणी राजबिंडा
तिचे रूप आसावले पाहण्या
पहावे तयाने भुलावे तयाने
तिने बद्ध व्हाने उगा लाजण्या

कधी स्वप्न वाटे कधी लाज वाटे
किती मोहरावे मनाने असे
किती प्रेम द्यावे, स्वतःला हरावे
हसावे कळीने फुलावे जसे

बघावे स्वतःला स्मरावे कुणाला
कुठे दूर आहे सखा साजणं
जरी दूर आहे किती घोर आहे
तिला होतसे रात्रीचं जागणं

तुषार जोशी, नागपूर
१२ मे २०११, २२:५०

हनुचा तीळ

(छायाचित्र सौजन्य: मनाली)
.
.
केसांच्या ढगातून चेहऱ्याचा चंद्र दिसे
चांदणे रूपाचे गं हृदयावरती ठसे

स्वप्नाळू खोल डोळे अधिर ओठ किती
हनुचा तीळ काळा नजरेची नाही भीती

नाकाची चाफेकळी सजली ऐटी मधे
सावळी गोड कांती अनोखी लाखा मधे

उत्सव सौंदर्याचा तुझ्या रूपात चाले
साठवू कुठे किती दोनच माझे डोळे

तुषार जोशी, नागपूर
.
.

तुला पाहता

(छायाचित्र सौजन्य: अदिती )
.
.
तुला पाहता जीव वेडावतो गं तुला पाहता
सुखाचा झरा का उरी वाहतो गं तुला पाहता?

तुझे केस सोडून ते मोकळे तू मला भेटता
उन्हाळ्यातही गारवा भासतो गं तुला पाहता

तुझा सावळा रंग आहे तुझा देखणा दागिना
मधाचा मधू गोडवा लाजतो गं तुला पाहता

तुझे हासणे ओतते धूंद तारूण्य चोहीकडे
पहा मंद वारा कसा नाचतो गं तुला पाहता

तुझे ओठ सांगून जाती मुक्याने हवे ते मला
जिवाचा शहारा पुरा पेटतो गं तुला पाहता

तुझे रूप वेधून घेते मनाला खुळ्या सारखे
तुझी साथ लाभो सदा मागतो गं तुला पाहता

तुषार जोशी, नागपूर
.
.

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

भूल भुल्लैया

(छायाचित्र सौजन्य: मनिषा कोरडे)
.
.
तुझ्या सोनेरी केसांची मनमोही हालचाल
तुझे हसणे मिळेल ज्याला तोच 'मालामाल'

तुझ्या डोळ्यांच्या तळ्यात 'भूल भुल्लैया' गहिरी
अजूनही चिंब तुला जरी बघितले काल

आता सगळे सांगती राम्या शाम्या गंप्या 'बिल्लू'
तुझ्या कटाक्षाने होती कसे हृदयाचे हाल

तुषार जोशी, नागपूर 
.
.

तुझ्या मंद हसण्याने

(छायाचित्र सौजन्य: मनिषा कोरडे)
.
.
हसलिस हलक्याने
जिव झाला कासाविस
असे वाटले जवळ
नेहमिच तू हवीस

तुझ्या सावळ्या रंगाची
ओढ होतीच मनाला
तुझ्या मंद हसण्याने
वेड लागले जिवाला

हसतच तू रहावे
आनंदाचे गावे गाणे
मान्य आहे कण कण
माझा त्यासाठी झिजणे

तुषार जोशी, नागपूर
.
.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

माझी सावळी मैत्रीण

(छायाचित्र सौजन्य: नीलम नायक)
.
.
माझी सावळी मैत्रीण
रोज मला विचारते
गोरा तू मी सावळी रे
कशी तुला आवडते?

तिला सांगतो मी वेडे
करतेस काय अशी
तुझ्या सावळ्या रंगात
ओढ हवीशी हवीशी

तुझ्या असण्याने होते
माझे जगणे मंगल
तू नसता जग आहे
नको नकोसे जंगल

कस्तुरीला सुगंधाचे
जसे स्रोत नाही ज्ञात
तुझ्या सावळ्या रंगाचे
तुला मूल्य नाही ज्ञात

ईतकेच ठेव ध्यानी
तुझे सावळे असणे
माझ्यासाठी ठरते गं
जग मोहक देखणे

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.
.

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

चंगो

(छायाचित्र सौजन्य: चंद्रशेखर गोखले)
.
.
.

ऐन आमच्या तारूण्यात तो
थेट आमच्या हृदयात आला
आमच्या कितेक भावनांना
त्याने हळवा शब्द दिला

त्याच्या शब्दांवर प्रेम जडलं
त्याच्या शब्दांनीच प्रेम फुललं
त्याच्या शब्दांनी तिच्या मनातलं
कितीदा तरी गुपित कळलं

त्या चारोळ्या तिला ऐकवून
हेच मला वाटतं म्हणायचं
त्याच्या शब्दांचं फूल असं
तिच्या मनात हळूच खोवायचं

त्याच्या प्रत्येक शब्दात आम्हाला
खोल जगणे सापडत जाते
आमच्या रसिक हृदयामध्ये
त्याची आठवण तेवत रहाते

तुषार जोशी, नागपूर