शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

माझा आवडता छंद

(छायाचित्र सौजन्य: प्रज्ञा )
.
.
तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिले
माझे तुझ्या सोबत आयुष्य
त्या क्षणापासूनच सुरू झाले
त्या क्षणापासून जी तुझी नशा झालीय
तो प्रभाव कायमच नाही तर
वर्षोंवर्षे तुझी नशा वाढतच चाललीय
तुझ्यासोबत घालवलेला
प्रत्येक क्षण
आठवणींच्या दागिन्यातला
एकेक हिरा आहे
तुझे अस्तित्व प्रीतीचा
शुद्ध आनंद झरा आहे
तुझ्या रूपाचे अनेक पैलू पाहणे
माझ्यासाठी रम्य उत्सव आहे
तुझ्या सोबत हे आयुष्य जगणे
मोहक उत्कट अनुभव आहे
प्रत्येक वर्षी विचार करतो की
आपले नेमक्या वेळी त्याच जागी जाणे
योगायोग नव्हता
एकमेकांना पाहून वेड्यासारखे भारावणे
योगायोग नव्हता
मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठीच जगात होतीस
प्रथम दर्शनी मी तुझा होणे
योगायोग नव्हता
तुझा होऊन जगणे म्हणजे
माझा आवडता छंद आहे
तू माझी असताना जगणे
म्हणजे अपार आनंद आहे

तुषार जोशी, नागपूर
२३ डिसेंबर २०११, ०९:००
.
.
(प्रिय प्रज्ञा आणि मंदार, तुम्हाला लग्नाच्या १४व्या वाढदिवसासाठी अनंत शुभेच्छा)

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

कविता

(छायाचित्र सौजन्य: प्रांजल )
.
.
टपोरे गहिरे डोळे
डोळ्यात कोरिव काजळ
घनदाट काळे केस
चाफेकळीसे नाक
अल्लड लोभस गाल
ओठात मिश्किल हसू
मोत्यासारखे दात
गोऱ्या त्वचेवर खुलणारा काळा गोफ
मोहक काळा ड्रेस
कपाळावर नाजुकशी टिकली
हनुवर छोट्टासा तीळ
मानेवर रूळणाऱ्या अवखळ बटा
किरणांची उनसावली छटा
हे सगळे एकाच वेळी
एकत्र आलेली कविता पाहून
.
धडधडणारे हृदय
देहभान हरवलेला
मंतरलेला एक वेडा जीव
कविता लिहू लागेल
यात नवल काय?

तुषार जोशी, नागपूर
२१ डिसेंबर २०११, २४:४५

.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

तिचे हासणे जीव घेऊन गेले

(छायाचित्र सौजन्य: वैदेही )
.
.
तिचे हासणे जीव घेऊन गेले
तिने टाळणे जीव घेऊन गेले

खुले केस सोडून लाडीक होणे
तिचे वागणे जीव घेऊन गेले

स्वप्नामधे हात हाती धरूनी
तिचे चालणे जीव घेऊन गेले

डोळ्यातली प्रीत सांगू कशी मी
इथे भाळणे जीव घेऊन गेले

मला वाटते मित्र माझा खरा तू
तिचे सांगणे जीव घेऊन गेले

तुषार जोशी, नागपूर
.
.

शनिवार, १० डिसेंबर, २०११

असे वाटते

(छायाचित्र सौजन्य: नम्रता )
.
.
तू माझ्या आयुष्यात आलीस
सौंदर्याची लाट होऊन
तू माझी प्रेरणा झालीस
सोनेरी पहाट होऊन

तुझा सावळा रंग झाला
माझा आवडता रंग
तुला भेटणे सहजच झाला
गोड अविस्मरणीय प्रसंग

तू सांगितलेस सर्व तुझे
काही सुखं काही वेदना
तू कधीच आणला नाहीस
आनंदाचा आव उसना

तू नितळ पाण्यासारखी
नेहमी समोर येत गेलीस
तुझ्या खरेपणामुळेच तू
माझी सखी होत गेलीस

काठोकाठ डोळा भरून
तू हसतेस म्हणूनच पण
असे वाटते तुझ्यावरून
ओवाळावा प्रत्येक क्षण

तुषार जोशी, नागपूर

.