शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

रहस्य

(छायाचित्र सौजन्य: गौरी )
.
.
अंधारात प्रकाश करेल
आयुष्यात सुवास भरेल
असे तुझे चैतन्य परसवणारे
मनमोकळे हसणे
तुझं मनभरून हसण्याचं
रहस्य जाणण्यासाठी
तुझ्याच जवळ हट्ट करताच
तू मला आश्रमात घेऊन गेलीस
त्या निरागस पिल्लांची ताई होऊन
त्यांच्याशी खेळताना
मला बाजूला बसून बघ म्हणालीस
आणि मला कळले
की तुझे मनमोहक हसू
हे तर चांदणं आहे
तू तुझ्या स्नेहाने फुलवलेल्या
त्या छोट्या छोट्या अनेक
सूर्यांचा प्रकाश परावर्तित होऊन
तुझा चेहऱ्याचा चंद्र
तेच चांदणं सभोवताली पसरवतोय
आणि म्हणूनच
तुझ्यासोबत राहणं म्हणजे
एक आनंददायी अनुभव ठरतोय.

~ तुष्की
नागपूर, १७ आगस्ट २०१३, ११:१५

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

सुंदर मुलगी पाहून

(छायाचित्र सौजन्य: केतकी)
.
.
पाहूनहि मुलगी सुंदर
हे विश्वच जणु मनोहर, वाटते
सृष्टीत जणु अवतरली
ही परीच स्वप्नांमधली, सावळी
जादू ती दिसणे ही पण
सुगंधित झाला कण कण, भोवती
लागले, वेड लागले, काहिना कळे
का खुळा झालो, का मलाच विसरून गेलो, आज मी

ते डोळे गहिरे गहिरे
तेजस्वी मोहक तारे, पाहिले
ही पहाट आयुष्याची
भुपाळी सुखसमयाची, वाटली
अनिमिष पाहत जाणे
काळाचे थांबुन जाणे, होऊ दे
मागणे, एक सांगणे, रत्न देखणे
मला भेटावे, डोळ्यातुन प्रतिबिंबावे, मी हिच्या

भुवयांची नाजुक वळणे
ओठांचे अलगद हसणे, बोलके
चमचम रेशिम केसांचे
भाळी चित्रण टिकलीचे, नेटके
सौंदर्य सर्व जगताचे
अंगात हिच्या भरल्याचे, जाणवे
सावळे, रूप गोजिरे, वार तो ठरे
काळजावरती, प्रेमाची सागर भरती, वादळी

प्रेमात हिच्या भिरभिरती
कित्येक ठिकाणी फिरती, लोक ते
जो असेल हिच्या मनात
तो भाग्यवान जगतात, केवढा
हृदयात आत धडधडले
जे प्रथम दर्शनी जडले, काय ते?
प्रार्थना, तीव्र कामना, की तिच्या मना
मधे मी यावे, प्रीतीत तिने बहरावे, माझिया

~ तुष्की
नागपूर, १५ आगस्ट २०१३, १५:३०

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

वेड

(छायाचित्र सौजन्यः मनाली, छायाचित्रकारः उमेश दौंडकर )
.
.
एका सावळीला गोरं
होण्याचच वेड
तिला कसे सांगू दिसे
सावळेच गोड

सावळ्या खळीची मजा
सावळे ते गाल
काळजात ओढ जागे
केवढीही खोल

सावळ्या रूपास शोभे
केस भोर काळे
पाहणारा फसतोच
असे गूढ जाळे

कथ्थई डोळ्यांत बुडे
जीव खोल पोरी
सावळी आहेस तू गं
तुझी नशा न्यारी

गोरे होण्याचा तू नको
करू आटापिटा
सावळ्या या रंगावर
माझा जीव मोठा

सावळ्या या रंगासाठी
गहाण हा जीव
एक वेडा आतुरला
मनामध्ये ठेव

~ तुष्की
नागपूर, १४ आगस्ट २०१३, १०:००

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

पहाट

(छायाचित्र सौजन्य: वैदेही
.
.
पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्यामधे पहाट

तुझे हसू प्रकाशले
मन लख्ख लख्ख झाले
माझे रूसून गेलेले
हसू परत मिळाले

फांदी फांदीत अकूर
पानापानास झळाळी
आणि बहरून आल्या
माझ्या कवितांचा ओळी

किती सुंदर दिसावे
किती गोड ते हसावे
चिमटा काढून घेतो
की हे स्वप्नच नसावे

~ तुष्की
नागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०

ग्वाही

(छायाचित्र सौजन्य: वैदेही )
.
.
मी ठरवले होते, तुला सांगेन की
तुझ्यावरून जीव ओवाळावा वाटतो
तुला सांगेन की, तुझा साथ मला काशी काबा वाटतो
मी ठरवले होते, सांगायचे तुला
तुझं सौंदर्य वर्णनातीत आहे
सांगायचे की, तुझे असणे जगण्याचे महत्व वाढवीत आहे
मी ठरवले होते, सांगायचे की
अप्सरा कशी दिसते मला माहित नाही
सांगायचे की, अप्सरा कशी दिसते आता समजायची इच्छाही नाही
खूप ठरवले होते, सांगायचेच अगदी
तू आल्यानंतर मी उरलेलोच नाही
हे ही सांगायचे की, तुझ्या हसण्याची पहाट दिवसभर मनात राही
खूप ठरवले होते, तुला विचारायचे
मी न विचारताच मनातले ओळखशील?
माझ्या डोळ्यात, तुझ्याबद्दल काय दाटलेय हे बघशील?
पण…
तू आलीस
कधी नव्हे त्या मनोहर रूपात समोर उभी झालीस
हसलीस..
ते नयनरम्य दृष्य बघून समजले की, आपल्याला सर्व काही मिळाले
काही सांगायची, विचारायची गरजच नाही
तुझ्या त्या मंद हसण्याचा अनुभव
हाच आहे माझे आयुष्य सफल झाल्याची ग्वाही !

~ तुष्की
नागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०