सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

सौख्यमय सावली

(छायाचित्र सौजन्य: मनाली)
.
.
किनाऱ्यावरूनी किती पाहती सागराच्या लिला
झुगारून सीमेस पोहायचा ध्यास वेडा तिला
.
कळालीच आता असे वाटते त्याक्षणी नेहमी
नवे एक नक्षत्र शोधूनिया बांधते ती झुला
.
तिचे रूप पाहून शब्दांमधे बांधतो नेहमी
नवे रूप घेऊन हमखास ती साद देते मला
.
तिचे केस घनदाट वृक्षापरी सौख्यमय सावली
तिचे ध्येय दुर्दम्य जाणायला सूर्यही थांबला
.
तिला पाहुनी वाटते अंतरी, तुष्किला सारखे
तिचा सावळा रंग वेड्यापरी गोड करतो तिला
.
.
तुष्की नागपुरी
बंगळूर, ०९ आक्टोबर २०१७, ०८:३०

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

निमित्त

(छायाचित्र: केतकी
.
.
आपण भेटतो
तेव्हा मी नेहमी
स्वतःला खूप सावरून
ठेवलेले असते
ओठांना बजावून ठेवलेले असते
पण तू हसतेस आणि
हलकेच डोळे बंद करतेस
माझा उत्कटतेचा सागर
हिंदकळायला
इतके निमित्त नेहमीच पुरते

तुष्की नागपुरी
नागपूर, १७ जुलै २०१७, १९:३०

शनिवार, १३ मे, २०१७

अनुबंध

(छायाचित्र सौजन्य: प्रणाली )
.
.
मनाच्या कानाकोपऱ्यात
दरवळणारा सुगंध तू
सावळ्या रूपाचा हृदयाशी
घडलेला अनुबंध तू
.
आखीव रेखीव कोरलेला
सौंदर्याचा प्रबंध तू
उत्कट ओढीचा काव्यमय 
ओघवता मुक्तछंद तू
.
आशेच्या सुमनांतुन द्रवलेला
मधुर मकरंद तू
जगण्याचे भान विसरून
उरलेला आनंद तू
.
तुष्की नागपुरी
बिलासपुर-नागपुर प्रवास, १२ मे २०१७, २२:३०