सोमवार, १४ मे, २००७

संगत


stage setting 1, originally uploaded by mayuresh tendulkar.

.
.
पेटी तबला सोबत संगत
जुळून आली म्हणजे रमते
मैफिल वेड्या सुरतालाची
नाद स्वरांची खासच जमते

मैफिलीत या कुणी न छोटा
सगळे घेऊन येती उत्तम
वेगवेगळे गूण मिळोनी
स्वर जागर घडतो सर्वोत्तम

व्यक्ती अपुले गुण सर्वोत्तम
कामामध्ये देता झाला
तर शिखरावर घेऊन जाउ
आपण अपुल्या या देशाला

तुषार जोशी, नागपूर

शनिवार, १२ मे, २००७

आंब्याची पोळी

(Image courtesy tamadhanaval)

.
ताटात सजवून ठेवलेल्या
रसाळ आंब्याच्या फोडी
मनमुग्ध करणारी त्यांची
जगावेगळी गोडी

त्यानंतर आंब्याचा रस
त्यावर भरपूर तूप
जेवण होईपर्यंत
सगले एकदम चूप

नंतर आंब्याची पोळी
तिची वेगळीच मजा
वाळण्या आधीच पाडायचा
आम्ही तिचा फज्जा

अचूक लक्षात ठेऊन
माझी आंब्याची आवड
याला सगले मिळाले पाहिजे
म्हणून तुझी धडपड

आंबा बघतांना पण आई
तुझे प्रेम जाणवते
त्याची गोडी माझ्या
जगण्याचे बळ वाढवते

तुषार जोशी, नागपूर

गुरुवार, १० मे, २००७

श्रेय


.
दवबिंदू
तुझे पानावर असून
स्वतंत्र असण्याचे
मला कौतुक वाटायचे

हेच जगणे,
काय ते सौंदर्य!
सर्वात राहूनही
वेगळेपण गाठायचे

कमलदला
नंतर कळले मला
दवाच्या सौंदर्यात
अधिक श्रेय तुझे

तुझ्या आधाराने
फुलत गेले आहे
आकर्षक अस्तित्व
दवबिंदूचे

बाबा
आज मी स्वतंत्र आहे
दवबिंदू सारखा
सुंदर आणि सफल

बाबा
आज कळते आहे
माझ्या अस्तित्वा साठी
तू आहेस कमलदल

तुषार जोशी, नागपूर

रविवार, ६ मे, २००७

किती रंग

.
.
किती रंग राहून गेलेत
अजुनही घालायचे
किती छंद राहून गेलेत
अजुन जोपासायचे

किती पुस्तके किती कविता
वाचू कसे आणि कधी
भांडार जणू सागर विशाल
थेंबाइतका दिलाय अवधी

सगळे करणे शक्यच नाही
स्वीकारतो शांत होतो
जवळचा पहिला रंग घेतो
पुन्हा प्रवास सुरू करतो

तुषार जोशी, नागपूर

शुक्रवार, ४ मे, २००७

चायनीज नुडल्स


petpuja....., originally uploaded by sonal chitnis.

.
.
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स
पोळी भाजी भाताचे घ्या
एकत्रच सगळे रस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

तो चिनी बाबा आला तर
वाटीत जीव द्यायचा
पंजाबी मसाल्यांचा वास
त्याचा नाकात इतका जायचा
आपली परंपरा नेहमी
आहार असावा सकस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

दोन काड्या सोडून आपण
घेतला हातात काटा
कोणत्याही देशाचे पदार्थ असो
आमचा असतोच वाटा
खायच्या बाबतीत सगळ्यांचे स्वागत
कुणाचाही नाही आकस
चायनीज नुडल्स आ हा हा
चायनीज नुडल्स

तुषार जोशी, नागपूर

गुरुवार, ३ मे, २००७

दोरी


bondage !!, originally uploaded by arkoprovo.

.
.
एक मुलगी होती मनाने खूप चांगली
पण नशिबाने तिच्याशी क्रूर थट्ट मांडली

तिने ज्याच्यात पाहिले भविष्याचे चित्र
तो म्हणाला आपण राहू नुसते मित्र

मग तिला वाटले जगणे आता संपले
वाढण्या आधिच आनंदाचे रोप माझे खुंटले

मग तिला लागला एकटे राहण्याचा छंद
आपल्याच कोषात तिने केले स्वतःला बंद

एकदा एक मित्र तिला अडवून म्हणाला
काय हरवले? का बांधलेस का असे स्वतःला?

तू गमावलास व्यक्ती ज्याचे प्रेम तुझ्यावर नव्हते
त्याने गमावले प्रेम तुझे जीवापाड जे होते

हे ऐकताच ती हसली, विचार करत बसली
स्वतःच घातलेल्या बंधनांची दोरी हळूच सुटली

तुषार जोशी, नागपूर

खिडकी


DSC08064, originally uploaded by mayuresh tendulkar.

अपुल्या डोळ्यांची खिडकी
फारच छोटी असते
आयुष्याची खोली
अफाट मोठी असते

जे दिसतं ते सत्याच्या
अंशा इतकं असतं
जे असतं ते बहुसंख्य
पदर घेउनी असतं

इतरांचे मग आपण
मोल कसे ठरवावे?
कोण कसे आहे का
निर्णय असले घ्यावे

तुषार जोशी, नागपुर