रविवार, २९ मे, २०१६

दिशा मुग्ध व्हाव्या अशी सावळी

(छायाचित्र सौजन्य: पूजा )
.
.
तिच्या पावलांना जरी खूप छाले
तरी थांबलेना तिचे चालणे
फुलोनी जगाला फुले गंध देती
तसे गंधवेडे तिचे हासणे
.
तिला लाभलेले जरी लाख काटे
फुले वाटते ती जगाला तरी
तिचे शब्द होतात फुंकर जगाला
जणू तप्त मातीत याव्या सरी
.
तिचे चित्र लावण्य साधेपणाचे
दिशा मुग्ध व्हाव्या अशी सावळी
जरी टाळले तू तरी प्रेम माझे
म्हणे जिंदगीला अशी ती खुळी
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २९ मे २०१६, १०:००
9822220365

मंगळवार, २४ मे, २०१६

दोन्ही प्रियकर माझे

(छायाचित्र सौजन्य: प्रियंका )
.
.
सर्वदूर व्यापुनही उरती थोडे माझ्यासाठी
मनात भरती सदैव असती दोघे माझ्या पाठी
आकांक्षांचे सुखस्वप्नांचे नाते अथांगतेचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
सगळ्यांसाठी अखंड लाटा उधळून तो देणारा
सूर्य दिव्याने अनेक वाटा उजळून हा घेणारा
भरती ओहटी ऊन सरींचे नाते मोहरण्याचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
उदास असता मी, हसवी ओठांवर घेऊन लाली 
भरती होतो कधी गुदगुल्या करतो पाया खाली
साक्षी होऊन करती सांत्वन माझ्या सुखदुःखाचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २४ मे २०१६, ०९:००

सोमवार, २३ मे, २०१६

तुझ्या सावळ्या सौंदर्याचा

(छायाचित्र सौजन्य: प्रियंका )
.
.
तुझ्या सावळ्या सौंदर्याचा डंख जिवाला जाळी
तरी पहावे वाटत असते तुलाच वेळोवेळी
अता कळाले कसा पतंगा पेट जीवाने घेतो
विणून घेतो ज्योती साठी जाळ स्वतःच्या भाळी
.
तुझे हासणे म्हणजे झुळझुळ धुंद नदीची गाणी
हनुवटीवर खळी जणू की असे सायीवर लोणी
बघता बघता जीव लागतो वितळत वितळत जातो
चेहरा कसला सावळ रंगी जणू कोरली लेणी
.
खट्याळ कथ्थई डोळ्यांमधुनी प्रकाश घरभर पसरे
तुझ्या चाहुली घेऊन येती सौख्याचे क्षण हसरे
तू बोलावे ऐकत जावे विसरून जग उरलेले
तूच उरावे मनात आणिक असो न काही दुसरे
.
तुझे मोकळे केस जणू वेड्या वळणांचा घाट
तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्राजक्ताहुन दाट
शब्दांमध्ये तुला बांधूनी जरी उत्सव मी करतो
निशब्दाचा सागर तू तर गहिरा गूढ अफाट
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २३ मी २०१६,२०:००