बुधवार, १५ जुलै, २०१५

किल्ला

(छायाचित्र सौजन्य: मनाली )
.
.
किती जहरी तुझं गं हासणं
माझ्याकडं बघुन मगापासनं
आधिच सावळ्या रंगाची भूरळं
त्यात मोकळ्या केसांनी जाचणं

तुला पाहिल्या पासुन बये गं
दुनिया ऑऊटॉ फोकसं झाली
किती छटा मी टिपल्या तरीही
तुझ्या अदेची सर ना आली

रूप तुझे केवढे गनीमी
सांभाळता आले ना स्वतःला
गुंतलो रायगडाची शपथ
तुझा झाला हा हृदयाचा किल्ला

तुष्की नागपुरी
नागपूर, १५ जुलै २०१५, ०८:००

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रूप बिलोरी

(छायाचित्र सौजन्य: अनुराधा)
.
.
उफ्फ तुझे हे रूप बिलोरी
चित्त पाखरू फसले गं
कुठं जाईना काही खाईना
बावरल्यागत बसले गं

बट माथ्यावर, सळसळणारे
नाग मनाला डसले गं
जीव बघूनच विरघळलेला
भान तयाला कसले गं

नजर रोखूनी तुझे पहाणे
बाण दिलावर धसले गं
तू हसल्यावर घाव बिथरुनी
खोल गोड ठसठसले गं

तुला पाहता नशीब माझे
धुंद होऊनी हसले गं
ओवाळावा जीव मनातून
विचार असले तसले गं

तुष्की नागपुरी
नागपूर, १४ जुलाई २०१५, ०१:००