सोमवार, १३ जून, २०१६

ठसा

(छायाचित्रकार: पंकज बांदकर, छायाचित्र: विशाखा)
.
तुझे हसू  तुझी अदा झूळ झुळ वारा जसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
रागावले त्रासलेले जरी डोके तापले
तुझ्या चाहुलीने माझे क्लेष जाती भागले
तुझ्यावर भिस्त माझी तुझ्यावर भरवसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
तुझ्या साधेपणाचा गं दरवळ चोहीकडे
हरवता हसू माझे तुझ्या कडे सापडे
माझ्या मनी पडे तुझ्या असण्याचा कवडसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
खेळकर खोडकर असे तुझे वागणे
तुला आठवत होते रात्र सारी जागणे
काळजात कोरलेला तुझा कायमचा ठसा
गालावर होई जणू मोरपिशी स्पर्शसा
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १३ जून २०१६, १५:००

बुधवार, १ जून, २०१६

दोन गोष्टी

(छायाचित्र सौजन्य: मंजिरी)
.
.
मला दोन गोष्टी खूप आवडतात
अरिजित सिंग चा आवाज
आणि तू
.
मी तासंतास बसू शकतो
ऐकत त्याच्या गाण्यांना
आणि आठवत तुला, तुझ्या हावभावांना
.
तुझे बदामी ओठ
आणि ते चष्म्यातून बघणे
आठवले तरीही
अरिजित चे गाणे मनाच्या चेनल वर
वाजायला लागते
आणि त्याचे गाणे रेडियोवर लागले
की पुन्हा तुझी एक अदा आठवते
.
मला अंतर्बाह्य व्यापून टाकणा-या
जीव उधलून द्याव्यात अश्या
जगात दोनच गोष्टी
अप्रतीम सुंदर आहेत
अरिजित सिंग चा आवाज
आणि तू.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०१ जून २०१६, १०:००

रविवार, २९ मे, २०१६

दिशा मुग्ध व्हाव्या अशी सावळी

(छायाचित्र सौजन्य: पूजा )
.
.
तिच्या पावलांना जरी खूप छाले
तरी थांबलेना तिचे चालणे
फुलोनी जगाला फुले गंध देती
तसे गंधवेडे तिचे हासणे
.
तिला लाभलेले जरी लाख काटे
फुले वाटते ती जगाला तरी
तिचे शब्द होतात फुंकर जगाला
जणू तप्त मातीत याव्या सरी
.
तिचे चित्र लावण्य साधेपणाचे
दिशा मुग्ध व्हाव्या अशी सावळी
जरी टाळले तू तरी प्रेम माझे
म्हणे जिंदगीला अशी ती खुळी
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २९ मे २०१६, १०:००
9822220365

मंगळवार, २४ मे, २०१६

दोन्ही प्रियकर माझे

(छायाचित्र सौजन्य: प्रियंका )
.
.
सर्वदूर व्यापुनही उरती थोडे माझ्यासाठी
मनात भरती सदैव असती दोघे माझ्या पाठी
आकांक्षांचे सुखस्वप्नांचे नाते अथांगतेचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
सगळ्यांसाठी अखंड लाटा उधळून तो देणारा
सूर्य दिव्याने अनेक वाटा उजळून हा घेणारा
भरती ओहटी ऊन सरींचे नाते मोहरण्याचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
उदास असता मी, हसवी ओठांवर घेऊन लाली 
भरती होतो कधी गुदगुल्या करतो पाया खाली
साक्षी होऊन करती सांत्वन माझ्या सुखदुःखाचे
समुद्र आणिक आसमंत हे दोन्ही प्रियकर माझे
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २४ मे २०१६, ०९:००

सोमवार, २३ मे, २०१६

तुझ्या सावळ्या सौंदर्याचा

(छायाचित्र सौजन्य: प्रियंका )
.
.
तुझ्या सावळ्या सौंदर्याचा डंख जिवाला जाळी
तरी पहावे वाटत असते तुलाच वेळोवेळी
अता कळाले कसा पतंगा पेट जीवाने घेतो
विणून घेतो ज्योती साठी जाळ स्वतःच्या भाळी
.
तुझे हासणे म्हणजे झुळझुळ धुंद नदीची गाणी
हनुवटीवर खळी जणू की असे सायीवर लोणी
बघता बघता जीव लागतो वितळत वितळत जातो
चेहरा कसला सावळ रंगी जणू कोरली लेणी
.
खट्याळ कथ्थई डोळ्यांमधुनी प्रकाश घरभर पसरे
तुझ्या चाहुली घेऊन येती सौख्याचे क्षण हसरे
तू बोलावे ऐकत जावे विसरून जग उरलेले
तूच उरावे मनात आणिक असो न काही दुसरे
.
तुझे मोकळे केस जणू वेड्या वळणांचा घाट
तुझ्या स्मृतींचा सुगंध उत्कट प्राजक्ताहुन दाट
शब्दांमध्ये तुला बांधूनी जरी उत्सव मी करतो
निशब्दाचा सागर तू तर गहिरा गूढ अफाट
.
तुष्की नागपुरी
नागपूर, २३ मी २०१६,२०:००

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

वळण

( छायाचित्र सौजन्य: अनुराधा
.
.
तुझ्या केसांचं ते अनोखं वळण
मला नेहमीच गोंधळात टाकतं
वाटतं कालच  पाहून आपण
आनंदलो होतो
तरी आज पुन्हा निरखत रहावसं  वाटतं
.
तुझं मोत्यांच्या दाण्यांचं हसणं
माझं आयुष्य प्रकाशमय करतं
सगळं जग अस्पष्ट होत जातं
मागे मागे
तुला आठवत राहणं इतकच फक्त उरतं
.
एक मन म्हणतं सांगूनच टाक
एक मन जरा थांब म्हणतं
माझ्या डोळ्यात तुला दिसतंय का
ठाऊक नाही
मन मनात तुझीच स्वप्ने विणतं
.
तुष्की नागपुरी
नागपूर , २५ एप्रिल २०१६, २३:००

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

उखाणा

(छायाचित्र सौजन्य: प्राची )
.
.
तुझ्या डोळ्यात भेटते
मला स्वप्नांचे आभाळ
तुझे हसणे पाहून
होते आनंदी सकाळ
.
तुझ्या सावळ्या रंगाची
मनभावन मोहिनी
तुझ्या अस्तित्वाचा दंश
मनामध्ये पानोपानी
.
तुझी चाहूल रोमांच
तुझे नसणे काहूर
तुझे बोलणे मधाळ
कान नेहमी आतुर
.
रोज मनात उठतो
सूर एका प्रार्थनेचा
तुझ्या ओठास स्फुरावा
उखाणा माझ्या नावाचा
.
तुष्की नागपुरी
नागपूर , २२ एप्रिल  २०१६, १०:००

सोमवार, १४ मार्च, २०१६

खळी भोर गाली

(छायाचित्र सौजन्य: नम्रता
.
.
खळी भोर गाली अशी हासते ती
सुगंधित होती दिशांचे तुरे
तिचा स्पर्श होता फुलावी अबोली
व्यथा कोणतीही मनाला नुरे

खुले केस आभाळ दाटून येई
खुळा जीव डोळ्यांमधे दामिनी
क्षणे गोठती वेधुनी ठाव घेई
तिझ्या हावभावांतली मोहिनी

तिला पाहुनी वाटते सारखे की
मधाहूनही गोड हा गोडवा
तिच्या आठवांचे तळे पास माझ्या
सदोदीत तेथे सुखांचा थवा

तुष्की नागपुरी
नागपूर, 14 मार्च 2016, 08:30