शनिवार, १२ जानेवारी, २००८

सीसीडी आणि कॉफी


.


नेहमी असेच सीसीडी मधे
येऊन परतलो असतो
नेमके बोलायची वेळ आल्यावर
गप्पच बसलो असतो

कॉफीचा कपच आला तेव्हा
आपल्यासाठी धावून
क्रीम चा तू बदाम काढलास
माझ्याकडे पाहून

तुझ्याकडे पाहून तेव्हा
मी मनापासून हसले
हात हातात घेऊन
हो म्हणून बसले

सीसीडी आणि कॉफी
एक गोड आठवण
इथेच घट्ट झाली ना रे
आपल्या नात्याची वीण

तुषार जोशी, नागपूर

शुक्रवार, ११ जानेवारी, २००८

झुरळ पुराण


Cocroach, originally uploaded by Vijayaraj.

.

एकदा एका झुरळाला
असह्य झाले झुरळपण
त्याने फुलपाखरू होण्याचा
मनामधे केला पण

विविध रंगांनी आपले
पंख त्याने रंगवले
फुलांवर दिमाखात
तेही मिरवू लागले

फुलपाखरामध्ये फिरला
पाहिल्या विविध छटा
पण थोड्याच वेळात
झाला एकटा एकटा

त्याला समजणारे
तिथे कोणीच नव्हते
फुलपाखरांचे सगले
संदर्भ वेगले होते

ओशाळला बिचारा
परत फिरला माघारी
मित्रांनी केली होती
स्वागताची तैयारी

बगिचा रिटर्न झुरळ
म्हणून मित्रांचे स्वागत
ग्रहण करत बिलगला
सगळ्यांना धावत धावत

मनापासून म्हनाला
मित्रांनो मी चुकलो
आपल्याच वेडात ख-या
झुरळपणाला मुकलो

आता एक चांगले
झुरळ व्हायचे ठरवलेय
स्वतःच्या अस्तित्वाला
आता मी ओळखलय

तुषार जोशी, नागपूर

बुधवार, ९ जानेवारी, २००८

आकाश


Whirling Clouds©, originally uploaded by Confused Shooter.

.

तू आकाश दिलेस मला
मनमुक्त उडण्यासाठी
आणिक एक घर दिलेस
थकून कुशीत शिरण्यासाठी

आता थोडे थोडे सगळ्यांना
आकाश वाटत फिरतोय
ज्यांना घर नाही त्यांना
घर देण्याचे स्वप्न बघतोय

घरी वाट पाहतय कोणी
तू असा दिला विश्वास
मी फिरतोय खिन्न दिव्यात
भरत अता ज्योतींचे श्वास

तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, ८ जानेवारी, २००८

एकटा


last days, originally uploaded by pabloest.

.

एकटा
कोणी नाही सोबतीस
आज हो
कोणी थांबलेना
आसपास हो
मग रडावे तरी
कशाला सांगा कशाला

भागलो
कुणा कुणा साठी
रोज भागलो
किती किती
रात्र रात्र जागलो
गरज संपली जणू
आज कोणी
विचारते ना मला
मग रडावे तरी
कशाला सांगा कशाला

संपले
लाड प्रेम सारे
सारे संपले
माझ्यासाठी
कोणी नाही जागले
काम झाले अता
जो तो आज
पाय काढू लागला
मग रडावे तरी
कशाला सांगा कशाला

तुषार जोशी, नागपूर

सोमवार, ७ जानेवारी, २००८

कळत नाहीये


, originally uploaded by krupali.

.

तुझ्या डोळ्यात किती
निरागस स्वप्नांची भरती आलीये
तुझे स्वप्नाळू डोळे
कसे जपावे हेच कळत नाहीये

चंगळवादाच्या उन्हात
प्रकृती तापून निघालिये
संस्कारांचा सन स्क्रीन
कसा लावू हेच कळत नाहीये

तू विचारशील उद्या
बाबा मी कुणासारखे होऊ
खरं उत्तर द्यायचं तर
कुणाचं नाव घेऊ हेच कळत नाहिये

तुषार जोशी, नागपूर

तन्मय तू


girl mending the fishing net, originally uploaded by ToSStudio.

.

तन्मय तू विणताना
आयुष्याचे धागे
हारवले बघ हसणे
मागे किती मागे

जुळवत बस एकेका
धाग्याला हाताने
एकदाच हास बघू
सुटतिल का हसल्याने?

खूप कष्ट कर की गं
संघर्ष कर ना, कर
चेह-यावर हास्याचा
येऊदे गुलमोहर

तुषार जोशी, नागपूर