शुक्रवार, ३० मे, २००८

संवेदनेच्या बायनाकुलर ने

(छायाचित्र गौरव यांच्या सौजन्याने)

.
.
संवेदनेच्या बायनाकुलर ने
दूरचे बघायचा प्रयत्न करतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
वा नवे मित्र आहेत
जुने पण टीकून आहेत
तीव्र इच्छा अंतरमनात
तीव्रतेने पोहचवतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
पैशापुढे शिक्षणाला
मी नेहमीच महान मानलंय
फार श्रिमंती दिसत नाही
नावापुढे डॉक्टर लागलेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
दोन पिलं आहेत जवळ
ममतेची डोळ्यात तृप्ती
माझ्या स्वप्नांचे आयुष्यावर
प्रक्षेपण करून बघतेय
दहा पंधरा वर्षांनंतर
बघूया मी कशी दिसतेय
.
.
तुषार जोशी, नागपूर
.
.

बुधवार, २८ मे, २००८

आनंद वाटतो तुझा हासरा चेहरा

(छायाचित्र सहयोग: अवंती)

आनंद वाटतो तुझा हासरा चेहरा
मनात राहतो तुझा हासरा चेहरा

कुणीतरी आहे हृदयात लपलेले
गुपित सांगतो तुझा हासरा चेहरा

दुःख विसरावे ओठात हसू यावे
इतके मागतो तुझा हासरा चेहरा

डोळे बंद केले तरी समोरच येतो
खट्याळ वागतो तुझा हासरा चेहरा

एकांताची बाधा मनास कधी झाली
प्रकाश पेरतो तुझा हासरा चेहरा

तुषार जोशी, नागपूर

सोमवार, २६ मे, २००८

तुझं ते बघणं...

(छायाचित्र सहयोग: दीपा)

हातावर हनुवटी ठेवून
तुझं ते बघणं.. मी आठवतो
दूर असताना.
त्या आठवणीत भिजतो
रूजतो...
मोहरतो...
आणि...
नव्या उमेदीने.. पुन्हा
शब्दात उतरतो...
तुझ्यासाठी.

धावत येतो
तुला ऐकवण्यासाठी
बळेच समोर बसवून
हमखास हक्क गाजवतो
आधी ऐक म्हणून
कविता आवेशात
सादर करून दाखवतो

तुला सगळं कळतं
तुझ्या डोळ्यात दिसतं
जसं काही तुला म्हणायचंय
तुला कसं रे हे सुचतं
तू हमखास दाद देतेस
कधी खरच..
कधी मन राखण्या साठी.

काहिही असो..
मला मिळतं बक्षिस
एका कौतुकाने भरलेल्या..
टपोऱ्या डोळ्यांच्या ..
मुलीचे चित्र.
डोळ्यात साठवण्यासाठी.

तुषार जोशी, नागपूर

सोमवार, ५ मे, २००८

केसांची नागिण

(छायाचित्र, सामिया च्या सौजन्याने)

सांभाळावं किती जीव गेला नादावून
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

काळ्याभोर केसांचे गं अल्लड वळणे
दातात दाबणे ओठ सहज हासणे
कपाळाची बट जशी रूपाला तोरण
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

विसरलो स्वेटर ते घ्यायला मी आलो
तुझ्या अंगावर तेच पाहता खिळलो
केव्हढा तो मोठा माझ्या स्वेटरचा मान
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

मानेवर दिसे हनुवटीची सावली
बघतांना होतो जीव माझा वर खाली
मनी सदा वाजे तुझ्या रूपाची पैजण
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

तुषार जोशी, नागपूर

खळखळून मग हसलो

(छायाचित्र - सोनल चिटणीस यांच्या सौजन्याने)

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

मित्रांच्या येण्याला मी स्वर्ग मानले नेहमी
टाळी देऊन घेऊन आयुष्य वाढले नेहमी
मैत्रीच्या नात्याचे सार्थक हो पुन्हा झाले
मैत्रीचा उत्सव झालो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

निर्व्याज असे हसताना सातही मजल्यां वरती
आकाशाला भीडते अपुल्या असण्याची मस्ती
रटाळ आयुष्याची राख ही झटकुन अपुली
विस्तव होऊन आलो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

कोटीचा अचूक माझ्या अर्थ यांना कळतो
इतके जाणूनच मजला आनंद अमाप मिळतो
काढून जुनी ती घटना डोळ्यांना डोळे भीडले
बहोत खूब म्हणालो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

तुषार जोशी, नागपूर