शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

रोमांचांचे गाणे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
एक निराळी सौंदर्याची आभा
छोट्या छोट्या गोष्टींनाही येते
कुणी सावळी राजस हसते जेव्हा
जगण्याचीही तेव्हा कविता होते

जरा थांबतो वारा थबकुन जातो
गंधभारल्या श्वासांना लय येते
केस मोकळे सोडुन कोणी जेव्हा
बांधायाचे अगदिच विसरून जाते

नकोच पाहुस खोल एकटक वेडे
अनवट नाते मनभर विणल्या जाते
डोळ्यांमध्ये घेऊन सागर पाणी
बघणाऱ्याला अलगद हरवुन नेते

चित्र तुझे साठवतो हृदयामध्ये
रोमांचांचे क्षण क्षण गाणे होते
खुळा बावरा भास तुझा होताना
डोळे मिटुनी भिजून जाणे होते

तुष्की नागपुरी
नागपूर, १ फेब्रुवारी २०१८, २२:३०

मयूरपंखी

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
मयूरपंखी रंग लाभले
क्षण मोहरले जगणे सजले
तू हसल्यावर हृदयापाशी
गोड वेदना जरा जराशी
.
अल्लड वारा करतो खोडी
श्वासांना मग येते गोडी
तू डोळ्यांनी कौतुक होता
रोमांचांची होते कविता
.
केस मोकळे हलती भुरभुर
मनात माझ्या भरती काहुर
सागर संयम वरवर केवळ
आत जणू धगधगते वादळ
.
ऊन सावली जरी ललाटी
तू तर आशा जगण्यासाठी
तू असल्याची जाणिव केवळ
ठरते माझे जगण्याचे बळ
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १५ जानेवारी २०१८, २१:३०