शुक्रवार, २७ मे, २०११

गुलकंद

(छायाचित्र सौजन्य: त्रिशाला)
.
..

तुझा विचार सुगंध
तुझा चेहरा आनंद
तुला पाहणे गुलाब
तुझे स्मीत गुलकंद

तुझे असणे रोमांच
नसता ये आठवण
माझ्या दाट काळोखात
तुझ्या रुपाचं चांदणं
तुझे नाव मोरपीस
आठवता शब्द धुंद

तुला पाहणे गुलाब
तुझे स्मीत गुलकंद

तुझा प्रभाव लपेना
जादू पानापानावर

तुझ्या सहजपणाचे
तेज माझ्या मनावर

तुला पाहत राहणे
उरे एकलाच छंद
तुला पाहणे गुलाब
तुझे स्मीत गुलकंद

तुषार जोशी, नागपूर

२७ मे २०११, २०:००
.

गुरुवार, १९ मे, २०११

टेडी

(छायाचित्र सौजन्य: साँची)
.
.
तुला सगळंच ठाऊक आहे रे
माझं ते हसणं माझं रूसणं
कधी तुझ्याजवळ रडत वसणं
धावत येउन बिलगण्याची जागा
माझ्या सुख दुःखातला धागा
तू आहेस

माझ्याकडे पाहून हसतोस ना
क्षणभर हलकं हलकं वाटतं
तुला घेउन नाचावसं वाटतं
गोलू मोलू मखमली मस्त
माझ्या लहानपणाचा हट्ट
तू आहेस

माझे छकुले बाळ होतोस
अन माझ्यात ममतेचा झरा
तू खेळवत ठेवतोस खरा
प्रीतीचा साधक निव्वळ
माझ्यातले प्रीतीचे बळ
तू आहेस

तुषार जोशी, नागपूर
.

शनिवार, १४ मे, २०११

रसिकांचा प्रेषित

(छायाचित्र सौजन्य: ज्ञानेश वाकुडकर)
.
.
जे लिहितो तू रक्ताने
संदर्भ तुझ्या वचनांचे
विश्वाला व्यापुन उरते
ते मोल तुझ्या शब्दांचे

कधी भावुक कधी मनमौजी
कधी वेडा घोषित होतो
कधी लिहितो असले काही
रसिकांचा प्रेषित होतो

प्रेमाचा कवि होताना
गुण गातो आर्त सखीचे
दुःखाचा सागर होतो
मन जाणतोस नदीचे

शब्दा शब्दातून देतो
तू रसिकांना आनंद
हृदयांना काबिज करणे
जाणतो तुझा मी छंद

तुषार जोशी, नागपूर
१४ मे २०११, २१:००

कित्ती कौतुक

(छायाचित्र सौजन्य: पूजा)
.
.
कित्ती कौतुक
कित्ती कोतुक तुझ्या डोळ्यात
भरून वाहते गं
हळवं भावुक
कित्ती कौतुक

माझी भरारी
पाहुन तुला मिळालेलं सुख
कणाकणातुन ओसंडताना दिसते ना
धन्य होतो मी
डोळा पाणवे आपसुक
कित्ती कौतुक

किती साधा ना
सर्वांसारखाच एक
तू ईतकं महत्व देऊन मला
सशक्त करतेस
मोठ्ठं करतेस खूप
कित्ती कौतुक

हेच कौतुक
टिकवण्यासाठी
कदाचित काहीही करून जाईन
कळेलच तुला
मग पाहिन गुपचुप
कित्ती कौतुक

तुषार जोशी, नागपूर
१४ मे २०११, १८:३०
.

शनिवार, ७ मे, २०११

ईतकं मनमोकळं हसलीस

(छायाचित्र सौजन्य: शुभांगी दळवी)
.
.
ईतकं मनमोकळ हसलीस
क्षणभर श्वास घेणंच विसरलो
रम्य निसर्ग होता सभोवती
मी तिकडे बघणंच विसरलो

तुझ्याबरोबर जगलो मी ते
दोन क्षण अमूल्य होते
ईतकं निखळ सौंदर्य बघणारा
मी एक पुण्यवंत ठरलो

अजून आठवता तुझा चेहरा
प्रकाशतात माझे गाभारे
त्या अनंदाचे ढग झेलतात
जरी दुःखाने मी कोसळलो

ईतकं मनमोकळ हसलीस
क्षणभर भानावर येणंच विसरलो
तुला पाहणेच झाला सोहळा
धन्य झालो मी मोहरलो

तुषार जोशी, नागपूर
०७ मे २०११, २०:००