रविवार, १५ जुलै, २०१२

तू परी स्वप्नांची

(छायाचित्र सौजन्य: स्तुती )
.
.
डोळे ते टप्पोरे
भुवयांचे कंगोरे
लाघवी लाघवी पाहणे
नथनीचे झगमगणे
केसांचे भिरभिरणे
गंधीत झाले गं जगणे
स्वप्नांची तू परी
तू परी स्वप्नांची

दातांचे जणु मोती
आतुरले दव ओठी
भाषा ही नजरेची
सगळे ओळखण्याची
केसांचे मानेवर
ते वळसे जीवघेणे
किरणांचे गालांवर
लोचटसे बागडणे

डोळे ते टप्पोरे
भुवयांचे कंगोरे
लाघवी लाघवी पाहणे
नथनीचे झगमगणे
केसांचे भिरभिरणे
गंधीत झाले गं जगणे
स्वप्नांची तू परी
तू परी स्वप्नांची

स्वप्नांच्या झोख्यावर
आकाशाची चक्कर
डोळ्यांच्या ज्योतींनी
झगमगले सगळे घर
जिद्दीचे हट्टाचे
चेहऱ्यावर सापडणे
तू दिसता हृदयाचे
धडधडधड धडधडणे

डोळे ते टप्पोरे
भुवयांचे कंगोरे
लाघवी लाघवी पाहणे
नथनीचे झगमगणे
केसांचे भिरभिरणे
गंधीत झाले गं जगणे
स्वप्नांची तू परी
तू परी स्वप्नांची

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१५ जुलै २०१२, १७:२० 

तुझ्या चांदण्याने

(छायाचित्र सौजन्य: स्तुती
.
.
तू हसतेस आणि भरतेस
घराला तुझ्या चांदण्याने
तू उरतेस स्मरण होऊन
क्षणाक्षणाने कणाकणाने

तू बघतेस तुझ्या टपोऱ्या डोळ्यानी
चष्म्याच्या पारदर्षक काचांतून
माझ्यासाठी कवच ठरतेस सोडवतेस
मला जगाच्या खोचक जाचांतून
तुझे असणेच आश्वासन ठरते
जगण्याचे औषधा प्रमाणे

तू बसतेस जिथे टेकवतेस डोके
त्या जागा होतात माझे देव्हारे
तू नसतानाही त्या जागा असतात
माझे विसावण्याचे शांत किनारे
तुझ्या केसांचा गंध भेटतो
मला सुखाच्या अत्तराप्रमाणे

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१५ जुलै २०१२, १२:५०

बुधवार, ११ जुलै, २०१२

धून

(छायाचित्र सौजन्य: सीमा जोशी)
.
.
एक वाऱ्याची झुळूक येते, केसांना उडवून देते
तुझे रूप खुलवून जाते
केसांच्या जाळी मधून, मन हे तुला पाहताना
धुंद होते.

पाऊस येणार आहे, रोमांच देणार आहे
दवबिंदूंचा पानोपानी श्रृंगार होणार आहे
अश्या भारलेल्या क्षणांना तुझी साथ लाभून जगणे
सुखाने खरे धन्य होते

बघणे तुझे प्रीत भोळे, सागर खोलीचे डोळे
ओठांचा मिश्कील छंद, सावली उन्हाचे जाळे
धरून ठेऊ कसे मी, तडतडते काळीज माझे
तुझ्या प्रीतीची धून गाते

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
११ जुलै २०१२, २३:३०

मंगळवार, १० जुलै, २०१२

बोलके डोळे

(छायाचित्र सौजन्य: शाकल शुक्ल )
.
.
तिचे स्मितं हास्य तिचे बोलके डोळे
निरागस सौंदर्याचे मधाळ पोळे
तिचे बोलके डोळे

जिथे जाते लोकांना आपले करते
सर्व नात्यांसाठी आदर्श ठरते
धीट कमालीची जरी हृदय भोळे
तिचे बोलके डोळे

तिच्यासाठी जग तिचे खास लोकांचे
फुलविले हौसेने बगिचे स्वप्नांचे
उंच जाती तिच्या कल्पनांचे हिंदोळे
तिचे बोलके डोळे

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
१० जुलै २०१२, ००:३०