शनिवार, २१ जून, २०१४

मराठमोळे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
मराठमोळे तुझे सावळे रूप किती जरतारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
ओठ पाकळ्या तांबुस गालांवर हा खळीचा भास
केसांचे हे झुळझुळ रेशिम पसरे मंद सुवास
तुला पाहता भक्त विठूचा विसरून गेला वारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
टपोर डोळे पाहून त्यांना हृदयी जादू होता
किती कवींनी केल्या असतील कविता येता जाता
तुला पाहण्या चंद्र सूर्य पण येती तुझिया दारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
~ तुष्की,
नागपूर, २१ जून २०१४, २१:००

शुक्रवार, २० जून, २०१४

यामिनी

(छायाचित्र सौजन्यः यामिनी )
.
.
ही यामिनी
ही खूप छान लिहिते
कधी हळव्या तर कधी कणखर शब्दात
वास्तवाचे भान लिहिते
.
ही कविता म्हणते ना
तो असतो भावनांचा सण
जी ऐकतोय ती पण असते कविता
आणि जी पाहतोय ती पण
.
संवेदनशील इतकी
की देवालाही विचारते जाब
वाचता वाचता काटा आणतो
असा हिच्या मुक्त शब्दांचा रूबाब
.
ही टिपते आसपासचे कारूण्य
मांडत राहते मार्मिक शब्दात
कधी विरहात आर्त होते
तर कधी घणाघाती वज्राघात
.
हिची गरूडभरारी पाहून
अचंभित होतात जेष्ठ श्रेष्ठ कवी
इतकं वळणदार लिहिते की
हिची कवितांची वही बघायलाच हवी
.
~ तुष्की
नागपूर, २० जून २०१४, २१:३०

आयुष्य घडवणाऱ्या मुली

(छायाचित्र सौजन्यः यामिनी )
.
.
हे जे शब्द आहेत ना
फसवे आहेत गं
कोणत्यातरी सिनेमात
कोणत्यातरी नाटकात कादंबरीत
वाचलेल्याच डायलाग मधून
काहीतरी मी बोलत असेन
पण आज एक मनापासून सांगतो
कोणतेही शब्द वापरले ना
तरीही त्यातून व्यक्त होणारे
आज माझे हृदय आहे
मनात तीव्रतेने येते आहे की
आज तुला मनापासून, काही सांगायचे आहे
.
मी आधीही जगतच असेन गं
पण तुला पाहिले ना...
त्या क्षणापासून माझे, खरे जगणे सुरू झाले
सगळं काही तेच तर दिलेय तुला त्याने
अनेक मुलींना दिलेय तसेच
एक गोजिरे नाक
बोलके डोळे
रेशिम केस, मोत्यांसारखे दात
अलवार ओठ
सुडौल बांधा, पण हे सगळे
एकत्र जोडताना त्याने तुझ्यात
जी कमाल टाकलीये ती
त्यालाही पुन्हा कधीच म्हणजे कधीच
जमलेली नाही
तुझ्या बघण्यात तुझ्या असण्यात
जी विलक्षण ओढ आहे
विलक्षण लावण्य आहे
ते पुन्हा तो कुठेच टाकू शकलेला नाही
.
मला वाटायचे मी कोणत्यातरी
मुलीचे हृदय नक्कीच जिंकणार
माझ्यामागे माझे प्रेम पाहून
कोणी तरी नक्की बेहद्द फिदा होणार
पण एका धन्य दिवशी माझ्या जगण्यात
तू आलीस....!
आता मला ..
जगाकडून कोणत्याच अपेक्षा, राहीलेल्या नाहीत !
.
तू असल्याने
तुझ्या दिसण्याने जे मिळालेय
ते इतके आहे
की आता मला तुझ्याकडूनही काही नको
मी नास्तिक होतो गं
पण त्याने तुला घडवून
जे काही दिलेय ना
त्याने मी भक्त झालो आणि
असा भक्त ज्याला काही
मागायचीच गरज उरलेली नाही
मला जे मिळायचं
ते भरभरून मिळालं
आता तुझ्यावर प्रेम करणं
हे श्वास घेणच झालंय
आणि आनंद इतका गहन आहे
की हा आयुष्यभर पुरणार आहे
.
तुझ्या डोळ्यात मला जे दिसलंय ना
ते स्वप्न मीच आहे याची
मला खात्री आहे
तुला कळेल तेव्हा तू धावत येशील
तोपर्यंत इथूनच तुझाच
.
मी
.
~ तुष्की
नागपूर, १९ जून २०१४, २३:३०

बुधवार, १८ जून, २०१४

इतकी सुंदर

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
तू इतकी सुंदर आहेस
चंद्र तुला पहायला थांबत असेल
हिला इतके सुंदर का केले
देवाजवळ गाऱ्हाणे सांगत असेल
.
तू इतकी सुंदर आहेस
की पाहणारा कवी होत असेल
तुझ्या प्रत्येक अदेला टिपण्यासाठी
क्षणाक्षणाला कविता लिहित असेल
.
तू इतकी सुंदर आहेस
प्रत्येक तरूण तुझ्या हृदयात
राहायची स्वप्ने पाहत असणार
आणि लग्न झालेले
सगळे सतत हळहळत असणार
.
तू इतकी सुंदर आहेस
सर्व मुलींना वाटत असेल
अन्याय झाला
इतकं नखशिखांत सौंदर्य
हिलाच कशाला?
.
तू इतकी सुंदर आहेस
की मीच हळवा  होतोय
तू सतत आनंदी रहावेस
म्हणून प्रार्थना गातोय
.
तू इतकी सुंदर आहेस
की मला थांबताच येत नाहीये
कितीही लिहिले तरी वाटते
शब्दात मांडताच येत नाहीये
.
तुष्की
नागपूर, १८ जून २०१४, ०८:३०

मंगळवार, १७ जून, २०१४

ऋण

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
चकवा काय असतो
हे तुला बघून कळावं
आणि झपाटणं काय असतं
हे मला बघून
.
तुझ्या काजळ भरल्या
सागर गहिऱ्या डोळ्यांचा वार
मी कसा झेलू कळे पर्यंत
तू असं काही गोड हसावंस
की माझ्या अस्तित्वातले सगळे
अणू रेणू एकाचवेळेस रोमांचावेत
.
आणि
हे असे मोकळे केस सोडतात का?
आजुबाजूचे सगळे जग
झपाटल्या जातेय
वे डे होतेय याची तुला काही कल्पनाच
नाही ना?
.
ती तुझी नाजुकशी
कपाळावरची काळी बिंदी
तिच्या मुळे होणारी माझ्या
हृदयाची जलद गती...
.
कसे घडवले असेल त्याने
हे अप्रतीम शिल्प?
तुला पाहून त्याने स्वतःलाच टाळी दिली असेल का?
नाचला असेल आनंदाने
.
शब्दच नाहीत गं
तुझं वर्णन करायला
हे विलक्षण लावण्य पाहण्याला
त्याने मला डोळे दिलेत
या एका कारणासाठी
मी त्याचा आजन्म ऋणी आहे
.
~ तुष्की
नागपूर, १७ जून २०१४, २२:३०

सोमवार, १६ जून, २०१४

श्वास वेडे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
का पाहता तुला मी, विसरून भान जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
कानात तारकांचे, तू डूल घातलेले
गालावरी मधाचे, साठेच ओतलेले
डोळ्यात भाव गहिरा, घेऊन खोल जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
रंगात सावळ्या या, जादू किती असावी
पाहून काळजाची शल्ये ही दूर व्हावी
वेधून काजळाचा कमनीय बाण जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
ओठात अमृताचे, दिसती हजार साठे
केसात गंध घ्याया, वारा अधीर वाटे
प्रत्येक श्वास तुझिया, स्मरणात खास जातो
होतात श्वास वेडे, थांबून काळ जातो
.
~ तुष्की
नागपूर, १६ जून २०१४, १०:००

रविवार, १५ जून, २०१४

वेडाबाई

(छायाचित्र सौजन्य: भावेश )
.
.
तुला आठवण्याची
तशी काही गरज नव्हतीच
शाळेपासून एकत्र खेळलेलो आपण
पण..
काल तुला फ्रेंडशीप बॅण्ड घातला ना
तेव्हा पासून सगळेच बदललेय
.
तुझे प्रसन्न हसणे माझ्या
मनातून काही जातच नाहीये
मी तर सगळेच तुला सांगते
हे कसं सांगू
की तुला पाहून आजकाल
धडधड वाढते आणि गाल लाल होतात
.
तू एकदा म्हणालास ना
की काय वेडाबाई
एखादा बायफ्रेंड बनवला की काय?
तो कसा बनवतात
मला माहित नाही बाई
पण आजकाल नावासमोर
तुझे नाव लिहून पाहावेसे वाटते
.
तुझ्या केसातून
एकदातरी हात फिरवायची
इच्छा होतेच आजकाल
आणि तू पण असा आहेस ना
माझ्या डोळ्यातली चमक
बदललेले बघणे तुला कळत नाही का रे?
.
~ तुष्की
नागपूर, १५ जुलाई २०१४, २३:३०

शनिवार, १४ जून, २०१४

ओढ

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
पाकळी खुलाया लागली
आगळी ओढ ही लागली
मी स्वतःच्याच प्रेमामध्ये नाचते गं
चपळ मन उडते गं,
धरले तरी पळते पळते गं

रोज फुलांनी सजते आणिक
काजळ लावते अपुल्या तालात गं
तारूण्याच्या वेशीवरती
पसरते लाली हसता गालात गं
मी मस्त मयुरी होते
पाऊस होऊनी ये तू
तुझी वाट व्याकुळतेने पाहते गं
चपळ मन उडते गं,
धरले तरी पळते पळते गं

शब्दांच्या पंखावर बसुनी
माझी भरारी कवितांच्या गावी
मुक्तछंद मोहतो मनाला
भाव मनातले गुंफाया लावी
मोकळे व्यक्त मी होते
ऐकाया येशील ना तू
आता कवितांच्या गावामध्ये राहते गं
चपळ मन उडते गं,
धरले तरी पळते पळते गं

खुणावते हे जीवन मजला
स्वप्नांची किती शिखरे गाठायची
कुणास ठाऊक कधी कुणावर
जीव जडायचा हृदये भेटायची
मी सरिता खळखळणारी
तू सागर माझा हो ना
मन मीलनाचा गोड क्षण मागते गं
चपळ मन उडते गं,
धरले तरी पळते पळते गं

~ तुष्की
नागपूर, १४ जून २०१४, ०९:३०

गुरुवार, १२ जून, २०१४

तुझ्यात काहीतरी आहे..

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे सांगताच येत नाही
पण हृदयाची धडधड माझी
सर्वांना ऐकू येई
.
तुझ्यात काहीतरी आहे
डोळ्यात खोल दडलेले
कितीतरी स्वप्नांचे पक्षी
उडण्यासाठी अडलेले
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे माझे गणित चुकवते
आधीचे सुंदर दिसण्याचे
सगळे ठोकताळे हुकवते
.
तुझ्यात काहीतरी आहे
ज्यामुळे मीच बदलतोय
तुझ्या नजरेत येण्यासाठी
माझा अणू रेणू उसळतोय
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे फक्त बघत रहावं
या जग विसरण्याच्या
अनुभूतीतच जगणं व्हावं
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे कुणाजवळच नाही
सावळ्या रंगाच्या जादूने
जणू नटलेली काया ही
.
तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे दिशांना प्रभावित करतं
किती क्षणांच्या सोहळ्याचं
मोहरण्याचं कारण ठरतं
.
~ तुष्की,
नागपूर, १२ जून २०१४, २३:००

शुक्रवार, ६ जून, २०१४

पाऊस तुझा

(छायाचित्र सौजन्य: नेहा
.
.
मस्त मोकळे, जगा वेगळे, तुझे हासणे
मन मोहते, वेड लावते, रूप देखणे
.
आवडणारा, तांबुस जरा, रंग सावळा
केस मोगरा, गोड चेहरा, भाव सोवळा
.
पाहता क्षणी, आपच मनी, दाद निघाली
झळ उन्हाची, गार वार्‍याची, झुळुक झाली
.
तुझे असणे, करी जगणे, ताजे तवाने
सुख भरते, चिंब करते, तुझे चांदणे
.
नाही नटणे, तरी दिसणे, जणू अप्सरा
पाऊस तुझा, जन्मच माझा, मोर नाचरा
.
नकोच गडे, कुणाच कडे, आता बघणे
आठव तुझे, विचार तुझे, झाले जगणे
.
~ तुष्की,
नागपूर, ०६ जून २०१४, १७:३०

बुधवार, ४ जून, २०१४

योग

(छायाचित्र सौजन्य: नेहा )
.
.
ऐकताना मुग्ध व्हावी धन्य व्हावी स्पंदने
पाहताना अन् फिटावे डोळियांचे पारणे
छेडता तू तार हरते देह आणिक भान ही
अटळ आता नादवेडे चित्त माझे गुंतणे
.
चेहरा आरक्त हाती शोभते गीतार ती
साधती संगीत दोन्ही हात तन्मय नादती
केस करती नृत्य वाऱ्यावर मनावर राज्य ही
वेड लावी ही अदा धडधड जलद व्हावी किती
.
कोरसी हृदयात झंकारून तारा गीत तू
ऐकता अमृत स्वरांचे बदलतो माझा ऋतू
श्वास धरतो ताल आणिक वेदना होते तरल
नादमय हा जन्म होतो मानसी उरतेस तू
.
गोड हा संभ्रम किती मी ऐकू की पाहू जरा
ना घडे हा योग नेहमी दुग्ध आणिक शर्करा
.
~ तुष्की
नागपूर, ०४ जून २०१४, २०:३०