गुरुवार, २८ एप्रिल, २०११

हसतेस तू

(छायाचित्र सौजन्य: त्रिशाला परूळकर)
.
हसतेस तू
बहरे ऋतू
नुसते बघावे वाटते

बघता तुला
नकळे मला
तू अप्सरा का भासते

जपतो खुणा
वळुनी पुन्हा
तू हासलिस जेव्हा जिथे

स्मरता तुला
कळते मला
मन लागले आता कुठे

हसतेस तू
बहरे ऋतू
नुसते बघावे वाटते

तुषार जोशी, नागपूर
.

तुझे नाव मनात येताच

(छायाचित्र सौजन्य: त्रिशाला परूळकर)
.
तुझे नाव मनात येताच
गालावर माझ्या येते लाली
लोकं मनात म्हणत असतील
बघा किती नटून आली

तुझे हसणे कधी आठवताच
ओठांवर फुटते सहजच मित
लोक म्हणत असतील दिसते
आजकाल ही भलतीच खुशीत

आरशात पाहता माझंच रूप
सांगतं दिसतेस भलतीच स्वीट
म्हणतं माझीच नजर लागेल
कानामागे लाव काळी टीट

तुषार जोशी, नागपूर
.

रविवार, १७ एप्रिल, २०११

साक्षी

(छायाचित्र: सीमा जोशी)
.
तुझ्यातला साधेपणा
तू कधी हरवू नकोस
तू आहेस तशीच रहा
माझ्यासाठी बदलू नकोस
.
तुझ्या रहस्यमय वाटांचा
मी होईन एक प्रवासी
तुझ्या माझ्या दाट प्रेमाचा
दिवा असेल माझ्या पाशी
.
तुझी अनंत स्वरूपे
चंद्र चांदण्यांची नक्षी
तुझ्या प्रत्येक रूपाचा
मी होईन निव्वळ साक्षी
.
तुषार जोशी, नागपूर
.

शनिवार, १६ एप्रिल, २०११

तुझे असणे हेच माझे धन

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
तुझ्यावर लिहिली मी गझल
तुझ्यावर लिहिला मुक्तछंद
तुझ्यावर लिहिली जरी कविता
शब्दात मावेना ईतका आनंद

तुझ्यावर महाकाव्य लिहिले जरी
काहीतरी राहूनच जाईल
माझ्या शब्दांचे सगळे थेंब
तुझा सागर गमतीने पाहिल

तुला लिहिण्याचा सोडलाय नाद
फक्त भिजतो तुझ्या रूपात
तुझी आठवण येताच होते
रिमझिम पावसाची सुरवात

भिजतो रूजतो अंकुरतो मी
तुझे असणे हेच माझे धन
तुला पाहून तुला आठवून
सुगंधती दिवसाचे सारे क्षण


तुषार जोशी, नागपूर

मला हसविते ती

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
मला हसविते ती मला रडविते ती
जगावे कसे ते मला शिकविते ती

तिचे आणि माझे असे खोल नाते
तिला पाहता सूख दाटून येते
निराशा कधी ठाव घेता मनाची
नवे गीत गाऊ मला सुचविते ती

पळे दूर चिंता तिला भेटण्याने
मना ये उभारी तिला सांगण्याने
जगाचे उन्हाळे कधी तीव्र होता
तिच्या पावसाने मला भिजविते ती

तिला दुःख येवो न चिंता कधीही
तुला देवबापा मनी प्रार्थना ही
तिची साथ मिळता खरे स्वप्न होते
कहाणी निराळी अशी घडविते ती

तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

स्वच्छंदी

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
.

ती मनात राहते माझ्या
आरशात बघताच गोड हसते
कौतुकाने डोळेभरून बघते
पुन्हा हसते...
लाजवते मला अगदी.
कधी कधी कानात जाऊन बसते,
म्हणते असं कर; असं करू नकोस
फार कुठे अपेक्षा ठेऊ नकोस
मनास रूचेल तसेच करत जा
जेव्हा जेव्हा गावेसे वाटेल, बिनधास्त गा
नवल वाटतं मला तिचं
किती स्वच्छंदी आहे ती
आणि सगळ्यांचे मन सांभाळण्यात
मुळात अडकून पडलेय मी

तुषार जोशी, नागपूर

पाहिले होते तुला मी

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
सावळ्या रंगास आली काय गोडी रंगताना
मी म्हणालो 'हाय जालिम मार डाला' पाहतांना

खोल झाला वार होता शल्य त्याचे काय सांगू
पाहिले होते तुला मी लाजुनिया हासताना

काय झाले काळजाचा एक ठोका सापडेना
घेतले तू नाव माझे काल जेव्हा बोलताना

मोहिनी केसांमधे काही तुझा गं दोष नाही
गुंततो जो तो सुगंधी केस ते तू माळताना

तू दिसावे तू हसावे तू असावे अतरंगी
मी बघावा रोज माझा जीव वेडा भाळताना

तुषार जोशी, नागपूर
१२ एप्रिल २०११