मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

स्वर्ग

(छायाचित्र सौजन्य: श्वेता )
.
.
मोती सांडतात तुझ्या
गोड हसण्या मधून
शीण थकवा मनाचा
जातो हळूच पळून

पाणीदार डोळ्यांमधे
दिसे आभाळाची माया
शांत चांदणं जशी ती
तुझी सावळी गं काया

खिडकित वारा वेडा
येई घेण्या तुझा गंध
तुझ्या रेशमी केंसांशी
खेळण्याचा त्याला छंद

तुला पाहताना वाटे
किती जगणे सुंदर
तुझ्या असण्याने होई
जणू स्वर्ग सारे घर

तुझी सुरेख आकृती
हृदयात कोरल्याने
सुंगंधाने भारलेले
माझे अवघे जगणे

~तुष्की
नागपूर, १५ फेब्रयवारी २०१३, २२:२०

गझल

(छायाचित्र सौजन्य: अपेक्षा )
.
.
सोज्वळ सावळ्या रंगात नटलेली
तू एक गझल आहेस
वाचताक्षणीच मनात पोचलेली
तू एक गझल आहेस

प्रसन्न विचारांसारखे केस आहेत मुक्त
हासिले गझल असे ते ओठ स्मित युक्त

हवी होतीस अगदी तेव्हा भेटलेली
तू एक गझल आहेस
अर्थांचे अनेक पदर नेसलेली
तू एक गझल आहेस

डोळ्यात तुझ्या चमक आहे आत्मविश्वासाची
वृत्तीत तुझ्या लकब आहे जग जिंकायाची

मराठमोळा बाज असलेली
तू एक गझल आहेस
कितेक युगांनी 'त्याला' सुचलेली
तू एक गझल आहेस

~ तुष्की
नागपूर, १६ फेब्रुवारी २०१३, १२:३०

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

म्हणायचे नाही

(छायाचित्र सौजन्य: प्रज्ञा )
.
.
असे सकाळी सकाळी
न्हाऊन यायचे
वातावरण फ्रेश करून
गॅलरीत हॅंगिंग खुर्चीत बसून
ओठात मिश्किल हसायचे
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही

जुन्या आठवणींनी भरलेला
तो ड्रेस आणि
त्यावर जाकिट घालायचे
मला आठवतेय का बघत
डोळ्यात भाव आणून
मला रोखून बघायचे
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही

केसात डावा हात घालून
केसांची बट खेळायची
आपली जादू अजूनही चालते का
ती आजमावून पाहायची
मधेच बेसावध क्षणी
हातांनी आळस द्यायचा
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही


~ तुष्की
नागपूर, १७ फेब्रुवारी २०१३, १०:३०

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

घायाळ

( छायाचित्र सौजन्य: श्वेता )
.
.
तुझे सौंदर्य घुसते
हृदयात जसा बाण
एक नजर पडता
मोहरतो कण कण

तुझे केस करतात
सूर्यकिरणांशी खेळ
एकटक बघण्याने
झाले आयुष्य घायाळ

ओठातले मंद हसू
मनी रूते आरपार
उनसावली वाढवी
तुझ्या रूपातली धार

किती सोसायाची कुणी
तुझ्या तारूण्याची अदा
किती कितीदा व्हायचे
तुझ्यावर आम्ही फिदा

~तुष्की
नागपूर, १५ फेब्रुवारी २०१३, २३:००

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

तारूण्य

(छायाचित्र सौजन्य: मोहिनी )
.
.
तू प्रेमाने पाहिलंस
की वाटतं
तुझ्या प्रेमाच्या शक्तीचे
कवच परसते आहे अंगावर
ही-मॅन ने आय एम दं पावर म्हणावे
तसेच ओरडून सांगावेसे वाटते जगाला
की आता मी काहीही करू शकतो.

तुझी एकच फुंकर
सर्व जखमा बऱ्या करते
तुझा स्पर्ष फुलवतो
माझ्या रोमा रोमात एक नंदनवन
मोकळे केस सोडून गोड हसतेस
तेव्हा वाटतं
बास…
हा चंद्र पाहिल्यावर
या चांदण्यात धुंद भिजल्यावर
आता कोणतेच सुख उरले नाही आयुष्यात
आयुष्य इथेच थांबले तरीही चालेल.

तू माझ्या आयुष्याला मिळालेलं
तारूण्य आहेस
आता मी कधीच म्हातारा होणार नाही.

तुष्की
नागपूर, १० फेब्रुवारी २०१३, १२:००