मंगळवार, ३ मार्च, २०१५

हिरो

(छायाचित्र सौजन्य: निलेश )
.
.
जरा फसले तुझ्या त्या
घनदाट मिशी ला रे
थोडा थोडा हात होता
आपल्या त्या विशी चा रे
.
कसे हसता खेळता
दोन नव्हे एक झालो
तुझ्याशिवाय जगणे
कधी नकोच म्हणालो
.
किती तरी पावसाळे
चाललो आयुष्यवाट
तुझी मिशी पाहिलीकी
आठवते सुरवात
.
तुझी अनेक रूपे मी
पाहिल्या रे किती अदा
तरीही अजून मन
तुझ्या मिशीवर फिदा
.
तुझा पहिला प्रभाव
नव्हे कधी सरायचा
घनदाट मिशीवाला
हिरो तूच आयुष्याचा
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०३ मार्च २०१५, ००:००

झुळुक

(छायाचित्र सौजन्य: छाया )
.
.
तू दुर्मिळ नरगिस फूल
निनावी भूल, जगाच्या साठी
तू अनवटशी चाहूल
हवासा पूल, मनाच्या काठी
.
तू सळसळणारे नाग
किती अनुराग, मुक्त केसांचा
तू पहाटभोळी जाग
अनावर राग, धुंद श्वासांचा
.
तू मंद झुळुक आगळी
कळी पाकळी, खुलाया लागे
तू गूढ ओढ सावळी
वेड वादळी, जिवाच्या मागे
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०३ मार्च २०१५, ०८:००