रविवार, ३१ जुलै, २०११

फेयर अॅड लवली

(छायाचित्र: मोहिनी जोशी)
.
.
.

टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला

जाहिरात दाखवावी लागतेच त्यांना
खोटी स्वप्ने विकायची असतात ज्यांना
गोरे छान काळे घाण म्हणावे लागते
पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावे लागते
जगामध्ये सावळेसे बघ किती लोक
गोरे तर थोडे काळे सावळे अधिक
बदकांच्या सौंदर्याची व्याख्या ही वेगळी
चिमणीने तुलनाच करू नाही मुळी
सावळ्या रंगाची गोड गुणाची देखणी
तू आमुची अलौकिक सावळी चिमणी

सावळ्या रंगाचा पोरी अभिमान ठेव
त्याला आवडते तेच बनवतो देव
रंग गोरा रंग काळा आणिक सावळा
सगळेच त्याने बनवले हो ना बाळा?
सगळेच रंग छान असतात बघ
कुणाचाही करू नये द्वेष किंवा राग
लक्ष देऊ नये जर चिडवले कोणी
आपल्याच तालामध्ये म्हणायची गाणी
कितीतरी लोक पुढे भेटतील तुला
भाळतील बघ तुझ्या सावळ्या रंगाला


(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

.

शनिवार, ३० जुलै, २०११

योजना

(छायाचित्र सौजन्य: रिधिमा कोटेचा)
.
.
तुला पाहिले अन मानायला लागलो
देव आहे! तुला घडवलेय ग त्याने
तुझ्या लावण्यात स्वर्गीय हात आहे
शक्यच नाही घडणे योगायोगाने

योजना केलीय त्याने जाणीवपूर्वक
हासण्यात तुझ्या उत्कट चैतन्य पेरून
त्याचा अंश जगात फिरत ठेवण्याची
शल्ये विरती तुला पाहूनच दूरून

मग माझी योजना का केलीय गं
रूप साठवायला पण कुणी हवे ना
म्हणूनच कदाचित वाटत राहतं
जगूच शकणार नाही तुझ्या विना

तुला पाहिताच मी आस्तिक झालो
मी देवाचा बघ किती लाडका असणार
तुला त्याने माझ्याच काळात घडवले
त्याचे हे उपकार कधी ना विसरणार

माझ्यासाठी तूच त्याचा अंश आहेस
तुझा भक्त झालोय स्वीकार आता
तुझी साथ मोक्ष तुझी साथच स्वर्ग
लागली समाधी तुझेच गीत गाता

तुषार जोशी, नागपूर
.
.

रूप

(छायाचित्र सौजन्य: शर्वरी राणे)
.
.
तुझे सुबक नाक वेडे करते मला
तुला पाहण्याचाही सोहळा होतो
पण तुझ्या सोज्वळ स्वभावाचा
प्रभाव उत्कट जगावेगळा होतो

तुझे हसताना दिसणारे दात ना
मला मोत्यांचा दागिना वाटतो
मनापासून तुझ्या काळजी करण्याने
मनात स्नेहाचा परिमळ दाटतो

तुझे केस वाऱ्यावर उडतात ना
वाटते माझे जगणे ईथेच थांबावे
तू माझ्यासाठी हाताने केलेले
थालीपीठ तुझ्याच हाताने खावे

तुझे डोळे अन त्यातले पाणी
चिंब भिजवते जीव होतो हळवा
तुझ्या आकाशात उडताना दिसतो
माझ्या वचनांचा स्वप्नांचा थवा

सावळ्या रंगाचे काय बोलू गं
काय बोलू आता नाजुक बोटांचे
रूप साठवून ठेवतोय मनात
जणू मिळालेय धन जन्मभराचे

तुषार जोशी, नागपूर


.

शुक्रवार, २९ जुलै, २०११

वेंधळा साजण

(छायाचित्र सौजन्य: रिद्धिमा कोटेचा)
.
.
कधी कधी अशी भीती वाटते की आपण सौंदर्याला शब्दात बांधून आपल्याच शब्दांच्या मर्यादेत त्याला बांधू तर पहात नाही?  सौंदर्य सागरासमान आणि आपले शब्द फक्त थेंब रूप आहेत.  यावेळेस सौंदर्याला बांधून घालायची ईच्छाच होत नाहीये, तर एका खुळ्या वेंधळ्याची कल्पना शक्ती प्रक्षेपित करूनच हौस भागवतोय.

तुला पाहिले साडीत
आणि जागी ठार झालो
तुझ्यासाठी खुळा होतो
आता वेडा पार झालो

थोडे मराठी दागिने
तुला आवडतील का?
साध्या मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

तुझ्या नाकावर नथ
कानी मोत्यांच्या कुड्या
गळ्यामध्ये ठुशी येता
होणे अप्सराही वेड्या

तुझ्या नाजुक गळ्यात
चपलाकंठी शोभेल
तुझी होऊनिया धन्य
मोहनमाळ ठरेल

वाकी पाटल्या मेखला
पायी पैंजणे जोडवी
किती मोहक हवीशी
माझी कल्पना असावी

साजेसा केसात खोपा
भाळी कुंकवाचा टिळा
ईतकेच मागतो हा
तुझा साजण वेंधळा

मराठी त्या दागिण्यांची
शोभा वाढवशिल का
एका मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

तुषार जोशी, नागपूर
.
.

गुरुवार, २८ जुलै, २०११

आविर्भाव

(छायाचित्र सौजन्य: मंदार चितळे)
.
.
तुझ्यावर रागवणे
ठरवूनही जमेना
तुझे चैतन्य असे की
तुझ्याविना करमेना

तुझा मोलाचा दागिना
तुझा मोकळा स्वभाव
अरे मित्रा म्हणताना
स्नेहमयी आविर्भाव

तुझ्यावरती ठेवावा
डोळे मिटून विश्वास
तुझ्या शब्दांमध्ये आहे
मंद आश्वस्त सुवास

तुझी साथ लाभताना
कशाचिच नाही भीती
तुला धाडले मानावे
विधात्याचे ऋण किती

तुषार जोशी, नागपूर
.
.

उपकार

(छायाचित्र सौजन्य: रचना कुलकर्णी)
.
.
त्या रचनाकाराने केवढे ते उपकार केले
तुला सावळा रंग आणि मला डोळे दिले
तुझ्या गालावर खळी मला खळीचे वेड
तुला मिश्किल शैली मला हृदय भोळे दिले

तुला घनदाट केस तुला गहिरे डोळे
मला भावनेत गच्च ओली दिली कविता
तुला आठवताच शब्द सुरेख अर्थ पांघरती
आजकाल मी कविता करतो येता जाता

तुला मिळाली जीवघेणी हसण्याची कला
गोड पापण्यांची भाषा आणि हळुच लाजणे
मला मिळाले ओढ, हुरहुर आणि वेडेपणा
तुझा विचार करत रात्र रात्र जागणे

तुषार जोशी, नागपूर
.
.

नशा पानपानात

(छायाचित्र सौजन्य: शर्वरी राणे)
.
.तुला पाहताना असे वाटलेकी
जसा चंद्र आलाय बागेत माझ्या
तुझे चांदणे पांघरूनी बसावे
नसावे घड्याळास काटेच माझ्या

तुझ्या शूभ्र दातांचि जादू म्हणू की
तुझ्या दाट केसांचि किमया असावी
तुझे हासणे भान हरते असेकी
बघे ज्यास त्यालाच कविता सुचावी

तुला सांगतो मी जरा ऐक पोरी
तुझ्या हासण्यानेच फुलतात गाणी
तुझा स्पर्श होताच मोहरति पाने
निराशा हसे वेदना ही दिवाणी

तुझे श्वास मिळता फुले बाग अवघी
नशा पानपानात हिरव्या सुखाची
तुला फक्त स्मरतो जगाला विसरतो
नसे खंत ना आज पर्वा कुणाची

तुषार जोशी, नागपूर
.
.

बुधवार, २७ जुलै, २०११

लाघवी

(छायाचित्र सौजन्य: शर्वरी राणे)
.
.
तुझा सावळा चेहरा लाघवी
तुझ्या हासण्याची तऱ्हा लाघवी

तुझ्या धुंद केसात गुंतून वाटे
मला आज वारा जरा लाघवी

उन्हाळे जिरावे तुझ्या पावसाने
तुझ्या बोलण्याचा झरा लाघवी

पुरा ठार झालो तरी भान ना
तुझ्या पाहण्याचा सुरा लाघवी

न होवो कधीही तुझे दूर जाणे
तुझा भासही बोचरा लाघवी

तुषार जोशी, नागपूर 
.
.