बुधवार, ९ मे, २०१२

खंत

(छायाचित्र सौजन्य: रिद्धी )
.
.
किती तुझ्याशी खेळलो
लपाछुपी घर घर
दिवाळीतल्या किल्याला
तुझीच कलाकुसर

कधी दुष्टपणा मधे
भांडलो विना कारण
तरी तुझे दादा दादा
माझ्याभोवती रिंगण

राखी बांधून देताना
तुझा उजळे चेहरा
निरागस मनोहर
आनंदाचा माझा झरा

तुझे प्रत्येकच गोष्ट
मला येऊन सांगणे
आठवते माझ्यासाठी
तुझे काळजी करणे

कशी समाजाची रीत
तुझे होईल लगीन
खंतावते माझे मन
उरे भांडायाला कोण

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
०८ मे २०१२, २२:२२
.
.

प्रार्थना

(छायाचित्र सौजन्य: गौरी )
.
.
ती हसते आणिक
पसरवते आनंद चारी दिशांना
ती दरवळते अन्
गंधित करते कोमेजल्या मनांना

ती फूलून येते
पाहुन तिजला ताजे परिसर होती
बघता बघता पक्षी
मंजुळ मंजुळ गाणे गाती

ती खाण सुखाची
फुलवत जाते हास्यरसाच्या बागा
दुःखाला वा
वेदनेला उरतच नाही जागा

पण डोळ्यांच्या
कडांमधे का पाणी भरले आहे
ती काय सोसते
काय तिच्या नशिवात दडले आहे

लवपून व्रणांना
वाटत फिरते मखमाली दिलासे
वाटेस येऊदे
तिच्याही (देवा) सुखस्वप्नांस जरासे

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
०९ मे २०१२, ००:३०


शनिवार, ५ मे, २०१२

तुझे हासणे

(छायाचित्र सौजन्य: किशोर )
.
.
तुझे हासणे जीव मोहून गेले
कधी ना कळे भान ओढून नेले

किती काळजाला बजावून होते
नको प्रीत त्याने खुळे चित्त होते
तुझे रांगडे रूप दृष्टीत आले

तुला पाहण्याचा लळा लागला रे
कशाला असे पाहतो सांग ना रे
कटाक्षात तू प्रीत घायाळ केले

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
०५ मे २०१२
.
.

बुधवार, २ मे, २०१२

आठवण


.
.
तुझ्या खरखरीत दाढीची
रोमांचवेडी आठवण
स्पर्षताच मोहरणारा
माझा कण अन कण

तुझे कपाळावर रूळणारे
केस बिनधास्त
फुंकर मारताच उडून जागेवर
याचचेच मस्त

तुझे डोळे लपवणारा
तो दुष्मन गॉगल
तरीही तो आवडायचा
मीच पागल

तुझ्या मिश्किल ओठांवर
आलेलं माझं नाव
त्या मनोहर अणुभवाने
दाटून आलेले भाव

तुला आठवायला लागलं
की सगळंच आठवतं
तुझं जवळ नसण्याचं शल्य
खोलवर जाणवतं

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
०१ मे २०१२
.
.