गुरुवार, १६ जून, २०११

येता जाता

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.
.
येता जाता
कितीतरी फोटो डोळ्यासमोर येतात.
टिकतात काही क्षण,
मग पुसटून जातात.
अश्याच अनेक फोटोंच्या नंतर
अचानक एकदा..
तुझा फोटो आला...
त्याच्या प्रभावाने
माझेच अस्तित्वच पुसटायला लागले.
तू फोटोतूनही
अस्तित्व व्यापून टाकलेस माझे
आता आणिक कोणताच फोटो पाहायची
इच्छा राहिली नाही
कदाचित काळालाही
पुढे सरकायची इच्छा राहिली नव्हती
तुझ्या फोटोकडे पाहण्याचा
माझा उत्सव थांबून तो पण पाहत असावा
तुझ्या बोलक्या डोळ्यांनी
तुझ्या मनमोकळ्या हसण्याने
जे दिले होते ते तर मी स्वप्नातही
कधी मागितले नव्हते
मी इतका खुळा तर कधीच नव्हतो
की एका फोटोवर खिळून जाईन
पण मला कळले
तुमच्या आयुष्यात एक फोटो
असा येतो की मग
सगळे आयुष्य त्याच्या भोवती
खिळून जाते.
तुम्ही स्वप्नातही न मागितलेले
अपार धन तुम्हाला मिळून जाते.
तुझा फोटो पाहिला..
मग मी उरलोच नाही.
तुझ्या अस्तित्वाचा सुंगंध
येऊ लागला पानापानातून
मला जगण्याचं
सुंदर कारण मिळालं तुझ्या फोटोमधून

तुषार जोशी, नागपूर

बुधवार, १५ जून, २०११

जगावेगळी किमया

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.
तुझ्या हसण्याचा शुभ्र गोड प्रकाश पडला
वारा वाहताना क्षण तुला बघाया अडला
तुझी खट्याळ टिकली काळजात उतरली
तुझ्या स्वप्नाळू डोळ्यांची भूल पडली मनाला

किती निरागस हसू वागवते तू लिलया
तुझ्या कुरळकेसांची जगावेगळी किमया
तुझ्या सावळ्या रंगात एक अनामिक ओढ
बाणासमान रूतती तुझ्या नाजुक भिवया

कसे सांग ना आताशा सांभाळावे हृदयास
पसरला असण्याचा तुझा मोहक सुवास
तुझा प्रभाव ईतका खोल जाणवतो आता
तुला आठवत होतो दिन रातीचा प्रवास

तुषार जोशी, नागपूर

रेष माझी कुंकवाची

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.
.

तुझ्या केसात सजली
रेष माझी कुंकवाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझे हसणे साजणी
तुझे खट्याळ बघणे
तुझे दुरून ईषारे
माझे दुरून जळणे
ऐक अशी बरी नाही
थट्टा माझी पामराची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझ्या सावळ्या रंगाचा
दंश झाला पानोपानी
त्यात कहर मांडला
तुझ्या कुरळ्या केसांनी
मेघ तुझे रूपघन
हौस माझी पावसाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुषार जोशी, नागपूर
.

तुझा सावळा शृंगार

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.

तुझा सावळा शृंगार
जीव जाहला अंगार
किती रुतते रुतते
तुझ्या नजरेची धार

असे पाहू नको वेडे
जीव वितळतो माझा
तुझी ओढ काळजात
घेऊ लागली आकार

आता पाठीमागे सारे
बोल बोलतील मला
काय जाहले हो याला?
अहो गुणी होता फार

कसे सोसतो सोसतो
तुझ्या असण्याचे तेज
तुटे इतकी नादते
मन कोवळी सतार

घनघोर बरसतो
आता सुखाचा पाऊस
तुझा आठव मल्हार
तुझा विचार मल्हार

तुषार जोशी, नागपूर