गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

सावळा आनंद

(छायाचित्र सौजन्य: रूपाली
.
.
तुझे रोखून बघणे
मनडोह ढवळते
तुझ्या डोळ्यातून तुझे
मन सगळे कळते

केस कुरळे मोकळे
त्यात अडखळे वारा
तुझा विचार करता
श्वास होतोय मोगरा

रंग सावळा आनंद
ओठातले हसू गोड
तुझ्या स्वच्छंदी मोकळ्या
स्वभावास नाही तोड

तुझा अल्लड वावर
जसा अवखळ झरा
तुझा विचार येताच
होतो दिवस साजरा

~ तुष्की
नागपूर, १० ऑक्टोबर २०१३, १०:५०

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

झोळी

(छायाचित्र सौजन्य: दीपा )
.
.
(चाल: शाम रंग रंगा रे)

शाम रंगाची माझी,
सखी सोज्वळ भोळी
भरलेली हिच्यामुळे,
माझी आनंदाची झोळी || धृ ||

डोळे गहिरे नाक साजरे
ओठ हासरे
डोळाभर बघताना किती
स्नेह पाझरे

हिच्या प्रेमाच्या अनेक तऱ्हा
सांगू मी किती
ठेवून जाते सोबत माझ्या
मायेची दिठी

अधुरा होतो हिच्या येण्याने
जाहलो पुरा
घेऊन आली माझ्यासाठी ही
स्वप्नांचा झरा

~ तुष्की
नागपूर, १७ सप्टेंबर २०१३, २२:००

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

पौर्णिमा

(छायाचित्र सौजन्य: करूणा )
.
.
तुझा चेहरा पाहुन कळले
चंद्र हाच आहे
आकाशीजो चमचम करतो
फक्त भास आहे

तुझे चांदणे पडता येतो
उत्साहात ऋतू
तू असण्याचा दरवळ पसरे 
सुगंध उत्कट तू

तीळ हनुचा मनात भरतो
क्षणोक्षणी उरतो
तू हसल्यावर अंकुर अंकुर
वसंत मोहरतो

टपोर डोळे गाल फुलांचे
ओठ पाकळ्यांचे
डोळ्यातच बुडताना होते
सार्थक बुडण्याचे

भास म्हणालो त्या चंद्राला
खास तूच चंद्रमा
गोड हासली लाजुन झाली
जन्माची पौर्णिमा

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, २२:४०

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

हरखुन जाते

(छायाचित्र सौजन्य: मनू
.
.
निरखुन फोटो, हरखुन जाते
पाहत राहते मी
फोन आल्यावर, साठवलेले
विसरून जाते मी

विचारती ते, आठव येते
दिवस जातो का?
तुम्हाला आठवतो क्षण क्षण
हृदयाचा ठोका

हळव्या त्या तुमच्या भेटीचे
होती भास अजुन
हृदयी स्वप्ने गाली लाली
येते हळुच सजुन

तुमच्या मध्ये दिसतो मजला
स्वप्नांचा राजा
आता सलते मधले अंतर
जीव घेई माझा

तुमच्या साठी अधिर माझा
जन्म किती झाला
लवकर याहो घेऊन जाहो
तुमच्या राधेला

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, २१:५०

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

खळी तुझी

(छायाचित्र सौजन्य: अश्विनी )
.
.
सावळ्या गालात
तुझ्या हसण्यात
बसते ऐटीत
खळी तुझी

गोंडस दिसते
मनात ठसते
रोज जीव घेते
खळी तुझी

टप्पोऱ्या डोळ्यांची
कुरळ बटांची
शान चेहऱ्याची
खळी तुझी

तुझ्या स्मितावर
नक्षी मनोहर
दुधात साखर
खळी तुझी

नजर हटेना
ओढ लावी मना
अद्भुत दागिना
खळी तुझी

निराशा मिटावी
एकदा बघावी
आनंदाची चावी
खळी तुझी

~ तुष्की
नागपूर, ०८ सप्टेंबर २०१३, ०९:२०

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

चोर

(छायाचित्र सौजन्य: स्वप्ना )
.
.
तुझा विचार मनात
चोर पावलांनी येतो
कुठेही असले तरी
मला दूर दूर नेतो

विसरते जग सारे
हरवते मी तुझ्यात
स्मरणांचा खेळ रंगे
हृदयाच्या अंगणात

तुझे शब्द आठवून
ओठांवर हसू येई
सख्या म्हणती कप्पाळ
पुन्हा हरवली बाई

शोध घ्या रे त्या चोराचा
भलताच व्दाड दिसे
सखी हिरावली बघा
कुठेही उगाच हसे

~ तुष्की
नागपूर, ०७ सप्टेंबर २०१३, २३:२०

खळी

(छायाचित्र सौजन्य: स्वप्ना
.
.
खळी
निरागस हसू
केस घनदाट
सावळा रंग
तिला
पाहुनी कुणी
जीव हरखुनी
जाहला दंग

कसे
रुप रेखिले
रंग योजले
चित्रकाराने
किती
बरे छळतात
केस हलतात
तिचे वाऱ्याने

पुन्हा
पुन्हा आठवू
किती साठवू
रूप डोळ्यात
जिणे
जणू हासले
बहरली फुले
हिच्या प्रेमात

~ तुष्की
नागपूर, ०७ सप्टेंबर २०१३, २२:१५

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

रहस्य

(छायाचित्र सौजन्य: गौरी )
.
.
अंधारात प्रकाश करेल
आयुष्यात सुवास भरेल
असे तुझे चैतन्य परसवणारे
मनमोकळे हसणे
तुझं मनभरून हसण्याचं
रहस्य जाणण्यासाठी
तुझ्याच जवळ हट्ट करताच
तू मला आश्रमात घेऊन गेलीस
त्या निरागस पिल्लांची ताई होऊन
त्यांच्याशी खेळताना
मला बाजूला बसून बघ म्हणालीस
आणि मला कळले
की तुझे मनमोहक हसू
हे तर चांदणं आहे
तू तुझ्या स्नेहाने फुलवलेल्या
त्या छोट्या छोट्या अनेक
सूर्यांचा प्रकाश परावर्तित होऊन
तुझा चेहऱ्याचा चंद्र
तेच चांदणं सभोवताली पसरवतोय
आणि म्हणूनच
तुझ्यासोबत राहणं म्हणजे
एक आनंददायी अनुभव ठरतोय.

~ तुष्की
नागपूर, १७ आगस्ट २०१३, ११:१५

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

सुंदर मुलगी पाहून

(छायाचित्र सौजन्य: केतकी)
.
.
पाहूनहि मुलगी सुंदर
हे विश्वच जणु मनोहर, वाटते
सृष्टीत जणु अवतरली
ही परीच स्वप्नांमधली, सावळी
जादू ती दिसणे ही पण
सुगंधित झाला कण कण, भोवती
लागले, वेड लागले, काहिना कळे
का खुळा झालो, का मलाच विसरून गेलो, आज मी

ते डोळे गहिरे गहिरे
तेजस्वी मोहक तारे, पाहिले
ही पहाट आयुष्याची
भुपाळी सुखसमयाची, वाटली
अनिमिष पाहत जाणे
काळाचे थांबुन जाणे, होऊ दे
मागणे, एक सांगणे, रत्न देखणे
मला भेटावे, डोळ्यातुन प्रतिबिंबावे, मी हिच्या

भुवयांची नाजुक वळणे
ओठांचे अलगद हसणे, बोलके
चमचम रेशिम केसांचे
भाळी चित्रण टिकलीचे, नेटके
सौंदर्य सर्व जगताचे
अंगात हिच्या भरल्याचे, जाणवे
सावळे, रूप गोजिरे, वार तो ठरे
काळजावरती, प्रेमाची सागर भरती, वादळी

प्रेमात हिच्या भिरभिरती
कित्येक ठिकाणी फिरती, लोक ते
जो असेल हिच्या मनात
तो भाग्यवान जगतात, केवढा
हृदयात आत धडधडले
जे प्रथम दर्शनी जडले, काय ते?
प्रार्थना, तीव्र कामना, की तिच्या मना
मधे मी यावे, प्रीतीत तिने बहरावे, माझिया

~ तुष्की
नागपूर, १५ आगस्ट २०१३, १५:३०

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

वेड

(छायाचित्र सौजन्यः मनाली, छायाचित्रकारः उमेश दौंडकर )
.
.
एका सावळीला गोरं
होण्याचच वेड
तिला कसे सांगू दिसे
सावळेच गोड

सावळ्या खळीची मजा
सावळे ते गाल
काळजात ओढ जागे
केवढीही खोल

सावळ्या रूपास शोभे
केस भोर काळे
पाहणारा फसतोच
असे गूढ जाळे

कथ्थई डोळ्यांत बुडे
जीव खोल पोरी
सावळी आहेस तू गं
तुझी नशा न्यारी

गोरे होण्याचा तू नको
करू आटापिटा
सावळ्या या रंगावर
माझा जीव मोठा

सावळ्या या रंगासाठी
गहाण हा जीव
एक वेडा आतुरला
मनामध्ये ठेव

~ तुष्की
नागपूर, १४ आगस्ट २०१३, १०:००

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

पहाट

(छायाचित्र सौजन्य: वैदेही
.
.
पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्यामधे पहाट

तुझे हसू प्रकाशले
मन लख्ख लख्ख झाले
माझे रूसून गेलेले
हसू परत मिळाले

फांदी फांदीत अकूर
पानापानास झळाळी
आणि बहरून आल्या
माझ्या कवितांचा ओळी

किती सुंदर दिसावे
किती गोड ते हसावे
चिमटा काढून घेतो
की हे स्वप्नच नसावे

~ तुष्की
नागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०

ग्वाही

(छायाचित्र सौजन्य: वैदेही )
.
.
मी ठरवले होते, तुला सांगेन की
तुझ्यावरून जीव ओवाळावा वाटतो
तुला सांगेन की, तुझा साथ मला काशी काबा वाटतो
मी ठरवले होते, सांगायचे तुला
तुझं सौंदर्य वर्णनातीत आहे
सांगायचे की, तुझे असणे जगण्याचे महत्व वाढवीत आहे
मी ठरवले होते, सांगायचे की
अप्सरा कशी दिसते मला माहित नाही
सांगायचे की, अप्सरा कशी दिसते आता समजायची इच्छाही नाही
खूप ठरवले होते, सांगायचेच अगदी
तू आल्यानंतर मी उरलेलोच नाही
हे ही सांगायचे की, तुझ्या हसण्याची पहाट दिवसभर मनात राही
खूप ठरवले होते, तुला विचारायचे
मी न विचारताच मनातले ओळखशील?
माझ्या डोळ्यात, तुझ्याबद्दल काय दाटलेय हे बघशील?
पण…
तू आलीस
कधी नव्हे त्या मनोहर रूपात समोर उभी झालीस
हसलीस..
ते नयनरम्य दृष्य बघून समजले की, आपल्याला सर्व काही मिळाले
काही सांगायची, विचारायची गरजच नाही
तुझ्या त्या मंद हसण्याचा अनुभव
हाच आहे माझे आयुष्य सफल झाल्याची ग्वाही !

~ तुष्की
नागपूर, ०४ आगस्ट २०१३, १६:३०

रविवार, २१ जुलै, २०१३

सुंदर ओळख

(छायाचित्र सौजन्य: अर्चना )
.
.
पाणीदार डोळे
वेधक हसरी नजर
गुलाबपाकळी गाल
शुभ्रमोती दात
अल्लड नवथर ओठ
सरळ सुबक नाक
चैतन्यमयी हसू
धनदाट काळेभोर केस
जीवघेणी हनुवटी
नाजुक सुबक हात
चित्तवेधक बांधा
हे सगळे एकीकडे
आणि ...
सावळा मोहक रंग एकीकडे
ठेवले तरीही ...
सावळ्या रंगाचे पारडे
भारीच भरते आहे !
तुझा सावळा रंगच तुझी
सुंदर ओळख ठरते आहे !!

 ~ तुष्की
नागपूर, २० जुलाई २०१३, १२:१५

शनिवार, २० जुलै, २०१३

हंक

(छायाचित्र सौजन्य: क्षितिज
.
.
दिसावे कुणी 'हंक' मोहून जावे जिवाला पुरे
झरू लागले आटलेले किती काळजाचे झरे
तुला पाहणे रोज व्हावे अता जीव झाला खुळा
मनाला मिळाला तुझा ध्यास जो दुःख चिंता नुरे

तुझे पाहणे व्यापते जीवनाला चहूबाजुने
तुला लाभले रूप 'माचो'परी रांगडे देखणे
मनी आस माझ्या किती जागते पास याया तुझ्या
तुझी वाट पाहू किती रे बरे ना असे वागणे

तुझा भास होता फुलारे अताशा नवी पालवी
तुझा चेहरा स्पर्शण्याची मनीषा मनी जागवी
कधी ऐटीने धीट होऊन येणे तुझे होउदे
तुला संमती दोन डोळ्यात माझ्या कळाया हवी
~ तुष्की
नागपूर, २० जुलाई २०१३, ०९:००

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

तू सावळी आहेस

(छायाचित्र सौजन्य: रूपाली )
.
.
तू सावळी आहेस
हीच जमेची बाजू आहे
तू सावळी आहेस
हीच तर तुझी जादू आहे

तू सावळी आहेस
मला सावळ्या रंगाची ओढ
तू सावळी आहेस
म्हणूनच तर दिसतेस गोड

तू सावळी आहेस
केस रेशमी वेधक डोळे
तू सावळी आहेस
म्हणूनच तरूण वेडे खुळे

तू सावळी आहेस
गुण गाऊ तुझे किती
तू सावळी आहेस
शब्द संपण्याची भीती

तू सावळी आहेस
अजून सांगू काय वेगळं
तू सावळी आहेस
यातच आलं की गं सगळं

~ तुष्की
नागपूर, १९ जुलाई २०१३, ०९:००

गुरुवार, १८ जुलै, २०१३

पखरण

(छायाचित्र सौजन्य: अनुराधा )
.
.
जिवापाड जपावा
असा क्षण तू आहेस
जग सुंदर आहे
ते कारण तू आहेस

सतत सोबत असणारी
आठवण तू आहेस
हृदयात धडधडणारी
धडकन तू आहेस

निरागस अल्लड
बालपण तू आहेस
तारूण्याने वेडावणारा
कण कण तू आहेस

केसांचे गंधित
मधुवन तू आहेस
चंद्राची चांदण
पखरण तू आहेस

सुमधुर हास्याची
छनछन तू आहेस
भाग्यानेच मिळते
असे धन तू आहेस

~ तुष्की
नागपूर, १८ जुलाई २०१३, ०८:४०

रविवार, २ जून, २०१३

आलेख

(छायाचित्र सौजन्य: आलेख )
.
.
तू रूप रांगडा यक्ष
हटेना लक्ष कुठेही आता
वाटले मिळाला प्राण
कधी पासून हरवला होता

ती मोहक गॉगल ऐट
बाधते थेट मनी हुरहुरते
पाहून तुला रे गाल
जाहले लाल हृदय बावरते

तू लाखांमध्ये एक
असा आलेख लिहीला त्याने
लाभून तुझे सौभाग्य
फुलावे भाग्य लाखमोलाने

~ तुष्की
नागपूर, १ जून २०१३, ११:५४

शुक्रवार, ३१ मे, २०१३

अदा

(छायाचित्र सौजन्य: सारिका )
.
.
अदा अदा म्हणतात ती ही आहे
की काहीच करायचं नाही आणि पाहणारा ठार
तुझ्या हसण्यातून सावरत नाही तर
तुझ्या सावळ्या रंगाचा वार नाजुक वळणांचा वार

मानेवरून वळणारे केस आणि
बोलक्या डोळ्यांचा छेद हृदयाच्या आर पार
तुला पाहणे थांबवून जाणे महाकठीण,
मन नाहीच अगदी नाहीच तयार

तुला सांगणारच नव्हतो मी
मनात राहू द्यावे पण डोळेच चोंबडे फार
कधी काळ थांबला कळलेच नाही
झिणझिणतेय सतत नादतेय मनाची सतार

~ तुष्की
नागपूर, ३१ मे २०१३, २२:३०

मंगळवार, ७ मे, २०१३

स्वप्न

(छायाचित्र सौजन्य: बागेश्री )
.
.
मी म्हणायचो
तुझ्या डोळ्यात मला एक टप्पोरं स्वप्न दिसतं.
तू म्हणायचीस छे
तुला तर कशातही काव्यच सुचतं.

मी म्हणायचो
बघ मनापासून केलेली इच्छा ही प्रार्थना असते
तू म्हणायचीस कशी रे
चिमुरडीतही तुला झाशीची राणीच दिसते

मी म्हणायचो
ती हसायची आणि गुणगुणायची आपल्याच नादात गाणी
आज यशाचे
मेडल घेऊन आली आणि डोळ्यात माझ्या आनंदाचे पाणी

~ तुष्की
नागपूर, ०७ मे २०१३, ००:००

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

स्वर्ग

(छायाचित्र सौजन्य: श्वेता )
.
.
मोती सांडतात तुझ्या
गोड हसण्या मधून
शीण थकवा मनाचा
जातो हळूच पळून

पाणीदार डोळ्यांमधे
दिसे आभाळाची माया
शांत चांदणं जशी ती
तुझी सावळी गं काया

खिडकित वारा वेडा
येई घेण्या तुझा गंध
तुझ्या रेशमी केंसांशी
खेळण्याचा त्याला छंद

तुला पाहताना वाटे
किती जगणे सुंदर
तुझ्या असण्याने होई
जणू स्वर्ग सारे घर

तुझी सुरेख आकृती
हृदयात कोरल्याने
सुंगंधाने भारलेले
माझे अवघे जगणे

~तुष्की
नागपूर, १५ फेब्रयवारी २०१३, २२:२०

गझल

(छायाचित्र सौजन्य: अपेक्षा )
.
.
सोज्वळ सावळ्या रंगात नटलेली
तू एक गझल आहेस
वाचताक्षणीच मनात पोचलेली
तू एक गझल आहेस

प्रसन्न विचारांसारखे केस आहेत मुक्त
हासिले गझल असे ते ओठ स्मित युक्त

हवी होतीस अगदी तेव्हा भेटलेली
तू एक गझल आहेस
अर्थांचे अनेक पदर नेसलेली
तू एक गझल आहेस

डोळ्यात तुझ्या चमक आहे आत्मविश्वासाची
वृत्तीत तुझ्या लकब आहे जग जिंकायाची

मराठमोळा बाज असलेली
तू एक गझल आहेस
कितेक युगांनी 'त्याला' सुचलेली
तू एक गझल आहेस

~ तुष्की
नागपूर, १६ फेब्रुवारी २०१३, १२:३०

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

म्हणायचे नाही

(छायाचित्र सौजन्य: प्रज्ञा )
.
.
असे सकाळी सकाळी
न्हाऊन यायचे
वातावरण फ्रेश करून
गॅलरीत हॅंगिंग खुर्चीत बसून
ओठात मिश्किल हसायचे
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही

जुन्या आठवणींनी भरलेला
तो ड्रेस आणि
त्यावर जाकिट घालायचे
मला आठवतेय का बघत
डोळ्यात भाव आणून
मला रोखून बघायचे
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही

केसात डावा हात घालून
केसांची बट खेळायची
आपली जादू अजूनही चालते का
ती आजमावून पाहायची
मधेच बेसावध क्षणी
हातांनी आळस द्यायचा
मग
मी वेडा झालो
तर मला काही म्हणायचे नाही


~ तुष्की
नागपूर, १७ फेब्रुवारी २०१३, १०:३०

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

घायाळ

( छायाचित्र सौजन्य: श्वेता )
.
.
तुझे सौंदर्य घुसते
हृदयात जसा बाण
एक नजर पडता
मोहरतो कण कण

तुझे केस करतात
सूर्यकिरणांशी खेळ
एकटक बघण्याने
झाले आयुष्य घायाळ

ओठातले मंद हसू
मनी रूते आरपार
उनसावली वाढवी
तुझ्या रूपातली धार

किती सोसायाची कुणी
तुझ्या तारूण्याची अदा
किती कितीदा व्हायचे
तुझ्यावर आम्ही फिदा

~तुष्की
नागपूर, १५ फेब्रुवारी २०१३, २३:००

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

तारूण्य

(छायाचित्र सौजन्य: मोहिनी )
.
.
तू प्रेमाने पाहिलंस
की वाटतं
तुझ्या प्रेमाच्या शक्तीचे
कवच परसते आहे अंगावर
ही-मॅन ने आय एम दं पावर म्हणावे
तसेच ओरडून सांगावेसे वाटते जगाला
की आता मी काहीही करू शकतो.

तुझी एकच फुंकर
सर्व जखमा बऱ्या करते
तुझा स्पर्ष फुलवतो
माझ्या रोमा रोमात एक नंदनवन
मोकळे केस सोडून गोड हसतेस
तेव्हा वाटतं
बास…
हा चंद्र पाहिल्यावर
या चांदण्यात धुंद भिजल्यावर
आता कोणतेच सुख उरले नाही आयुष्यात
आयुष्य इथेच थांबले तरीही चालेल.

तू माझ्या आयुष्याला मिळालेलं
तारूण्य आहेस
आता मी कधीच म्हातारा होणार नाही.

तुष्की
नागपूर, १० फेब्रुवारी २०१३, १२:००