सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

सावळी तू

(छायाचित्र सौजन्य: अनुजा)
.

तूच आशा
तू दिलासा
तू निराळी
वेगळी तू
सावळी तू

भावनांचा
मोक्षबिंदू
वीज जैशी
वादळी तू
सावळी तू

स्मीत माझे
गीत माझे
या मनाच्या
राऊळी तू
सावळी तू

भास नाही
तूच ती तू
पाहतो त्या
त्या स्थळी तू
सावळी तू

शब्द माझे
भाव माझे
झेलणारी
वेंधळी तू
सावळी तू

ज्योत माझी
तेवतांना
काळजीची
ओंजळी तू
सावळी तू

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

सांगू कसे तुला मी


(छायाचित्र सौजन्य: प्रतिज्ञा)
.
.
ए सावळ्या मुली गं
सांगू कसे तुला मी
माझाच मी न उरलो
झालो पुरा तुझा मी ।। ध्रु ।।

स्वप्नात मी तुझ्याशी
गोष्टी कितीक करतो
येता तुझ्या समोरी
पुन्हा मुकाच ठरतो
ही ओढ जीवघेणी
झुरतो तुझ्या विना मी ।। १ ।।

जादू तुझ्या छटांची
घायाळ रोज करते
मी टाळतो तरीही
मन आठवांत फिरते
आता तुझ्याच साठी
वेडापिसा खुळा मी ।। २ ।।

स्वप्नात पाहिलेले
सत्यातही घडावे
जगणे तुझे नि माझे
बघ एकरूप व्हावे
जगणे तुझ्या विना गं
जगणे न मानतो मी ।। ३ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
.
.

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

अनवट माया


(छायाचित्र सौजन्य: पल्लवी)
.

काळ्या सावळ्या मुलीची
आहे अनवट माया
काळ्या रेशमी केसांची
कशी घनदाट छाया ।। ध्रु ।।

शुभ्र मोगऱ्याच्या मुळे
केसामध्ये फुले,
सुगंधी उत्सव
कानामध्ये मोती डुले
किती मोहमयी,
असावे वास्तव
तिला भेटण्या आधीचा
सारा जन्म गेला वाया ।। १ ।।

स्मित हळुवार धुंद
कसा चहुकडे,
प्रकाश पसरे
चंद्रबिंदी बघताना
बघणारा भान,
सगळे विसरे
फक्त आठवाने तिच्या
माझी रोमांचित काया ।। २ ।।

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर )

.

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

ते तुझे डोळे टपोरे

(छायाचित्र सौजन्य अश्विनी, छायाचित्र - अश्विनी)
.
.
ते तुझे डोळे टपोरे स्वप्न त्यांतून सांडते
भावनांचे गाव तू शब्दात हळवे मांडते
.
सावळ्या रंगास आला गोडवा तुझिया मुळे
अश्विनी हे नाव त्या रंगास द्यावे वाटते
.
चेहऱ्यावर या तुझ्या कविता कशी करतात गं
रुप गहिरे आमच्या थेंबात कसले मावते
.
केस रेशम गाल मखमल स्मित कातिल ओठीचे
पाहिले कितीदा तरी पुन्हा पहावे वाटते
.
सादगी पाहून माझा जीव बघ नादावला
होई दृष्टी सोहळा साधी जरी तू वागते
.
.
तुषार जोशी, नागपूर
२४ ऑगस्ट २०१०, ११:००
.

शुक्रवार, ९ जुलै, २०१०

एकटक बघायला लागला

(छायाचित्र सौजन्य मेघनाद)

.

.

एकटक बघायला लागला
आज तो हसता हसता
माझा एक ठोका चुकला
त्याला बघता बघता
.
आज मला तो अचानक
वाटला नवा नवा
त्याच्या नजरेत नेम होता
बोचरा पण हवा हवा
.
आज आरशात स्वतःचे
वेगळेच रूप पाहिले
गाल हलके गुलाबी
डोळे लाज लाजलेले
.
एका नजरेत आज तो
हुरहुर लावून गेला
माझे काळीज स्वतःच्या
सोबत घेऊन गेला
.
.
तुषार जोशी, नागपूर
०९ जुलै २०१०, १०:००
.
.

बुधवार, ७ जुलै, २०१०

आणि जेव्हा ती हसली


(छायाचित्र सौजन्य: प्रणोती)
 .
.
मनातले सांगितले तेव्हा
उगाच रूसुन असलेली
जीव टांगणीला लावून ती
रागात जाऊन बसलेली
भांड्यात पडला जीव
हळून पुन्हा ती दिसली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
सुगंधले जगणे माझे
टवटवले फुलले
कसे होईल काय होईल
सगळे प्रश्न नुरले
माझी तिची एक स्थिती
माझी खात्री पटली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
तिच्यासाठी किती किती
मला करायचे होते
तिचे हसणे जपण्यासाठी
घर विणायचे होते
माझ्या जगात आली ती
माझी चिंता मिटली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
जीव जडतो तेव्हा
खुळ्यासारखे होते
तिलाही तसेच व्हावे
अशीच ईच्छा होते
माझीच छबी मला
डोळ्यात तिच्या दिसली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
स्थळ काळ सगळे
माझ्या साठी विरले
तिचा होकार आणि एक
धडधडते काळीज उरले
भावनांचे शब्द झाले
अचानक कविता सुचली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
.
तुषार जोशी, नागपूर
०७ जुलै २०१०, २३:४५
.
.

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

सुंदर कविता(छायाचित्रकार: मीच, सौजन्य: श्वेता)
.


कुण्या खुळ्या कवीची
आहेस तू सुंदर कविता

ईतके नीट नेटके रूप
कुणी कसे बनवू शकतं?
तो नक्कीच शुद्धीत नसेल
तुला बनवून त्याने स्वतःलाच
टाळी दिली असेल

निरागस कळी उमलावी
हळूच जशी पहाट होता
कुण्या खुळ्या कवीची
आहेस तू सुंदर कविता

ईतकं सहज हृदयाला
भेदून जाणारं
कुणी कसं हसू शकतं?
तुझ्यात त्याचे अंतरंग
भरभरून झालेय व्यक्त.

तुला बघून त्या कवीसाठी
नतमस्तक होई माथा
कुण्या खुळ्या कवीची
आहेस तू सुंदर कविता

तुषार जोशी, नागपूर
२५ जानेवारी २०१०

.

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

तुझे डोळे


(छायाचित्र सौजन्य मोहिनी)


तुझे डोळे
वेडावुन जाती तुझे डोळे
तुझे डोळे

मन जड झाले
भांबावुन गेले
विरहात माझे
रंग हरवले
सप्तरंगी तेव्हा
स्मरणांच्या भेटी
रंगवुनी देती तुझे डोळे

सुगंधात न्हाते
मोहरून येते
पाहताना माझे
भान हरपते
पापणीच्या आड
प्रेम साठवती
सखे माझ्या साठी तुझे डोळे

स्वप्न जगण्याचे
उंच उडण्याचे
तुझ्यामुळे सारे
क्षण स्वर्ग माझे
आशेची किनार
समृद्धिची ओटी
चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे

तुषार जोशी, नागपूर