शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

स्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
.
तिला पाहते आरशाच्या पल्याडं
तिचे रूप आहे किती देखणे
खुले केस मोहून जाती मनाला
सुगंधी जसे की फुले वेचणे

असे रोज होते किती वेळ जातो
किती आरशाच्या पुढे नाचणे
स्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे
खुळ्यासारखे चालणे वागणे

तिच्या स्वप्निचा तो कुणी राजबिंडा
तिचे रूप आसावले पाहण्या
पहावे तयाने भुलावे तयाने
तिने बद्ध व्हाने उगा लाजण्या

कधी स्वप्न वाटे कधी लाज वाटे
किती मोहरावे मनाने असे
किती प्रेम द्यावे, स्वतःला हरावे
हसावे कळीने फुलावे जसे

बघावे स्वतःला स्मरावे कुणाला
कुठे दूर आहे सखा साजणं
जरी दूर आहे किती घोर आहे
तिला होतसे रात्रीचं जागणं

तुषार जोशी, नागपूर
१२ मे २०११, २२:५०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा