शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

सखे

(छायाचित्र सौजन्य: रिधिमा - निशिधा )
.
.
तुझ्या माझ्यातले
सख्य सांगू कसे
शब्द पडती अपुरे सखे
सुख तुला पाहुनी
पास रेंगाळते
दुःख होते मधासारखे

विश्व माझे तुझे
सागरासारखे
वाद होती कधी वादळी
फक्त डोळ्यातुनी
गूज समजायचे
बोलण्याची कला वेगळी

मीच समजायच्या
तुझ्या खाणाखुणा
खुट्ट झाले तरी जाणवे
वेदना पण कशी
वाटली जिंकली
जाणती आपली आसवे

वेगळा कोपरा
आत हृदयामधे
तुझ्यासाठी असे राखला
या इथे त्या तिथे
पोचले मी कुठे
साथ ठेवीन गं मी तुला

तुषार जोशी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा