मंगळवार, २९ एप्रिल, २०१४

प्रेरणा

(छायाचित्र सौजन्य: ज्योती )
.
.
शब्द अपुरे पडती रूप
तुझे सांगताना
अजूनही विश्वास बसेना
तुला पाहताना
तू गोड इतकी कशी
तू कोण कुठल्या जगाची
तू मंद हासताना
धडधड वाढे हृदयाची
मला येते आहे मजा
जगण्याची

बघणे तुझे दिसणे तुझे
किती बोलके डोळे तुझे
पाहुन मन भरतेच ना
मन मागते असणे तुझे
हे स्वप्न की खरे शोधू कसे
मन नाचते कुणा सांगू कसे
हे भाग्य माझे जणु
ठेव जिवाची
साक्षात देवता तू
सौंदर्याची
मला येते आहे मजा
जगण्याची

तू वेगळी चाफेकळी
थोडीशी तू आहे खुळी
स्मरता तुला छळते मला
गालातली अल्लड खळी
तू आयुष्याची आशा नवी
तुला पाहताच मी झालो कवी
तू ओढ उत्कट किती
वेड्या मनाची
तू प्रेरणा माझ्या नव्या
कवितेची
मला येते आहे मजा
जगण्याची

 ~ तुष्की
नागपूर, २९ एप्रिल २०१४, ०८:३०

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

सुंदर

(छायाचित्र सौजन्य: सुनिता )
.
.
जितके मोहक आणि तुझे ते दिसणे सुंदर
त्याहुनही आहेस जशी ते असणे सुंदर.
.
कवितांनाही अद्वितीय येतोय सुंगंध
शब्दाशब्दातून तुझे ते ठसणे सुंदर
.
विचार देती तुझे मनाला दंश विलक्षण
तरी हवेसे किती अहा हे डसणे सुंदर
.
फसशिल सांभाळून म्हणाले लोक कितीदा
इतके झाले कधीच नव्हते फसणे सुंदर
.
'तुष्की' हसतो किती गोड म्हणतात मला ते
तुला आठवुन दिसते माझे हसणे सुंदर
.
 ~ तुष्की
वाशींग्टन, २४ एप्रिल २०१४, ०७:००

पुन्हा पुन्हा मी

(छायाचित्र सौजन्य: ज्योती
.
.
तुझ्या रुपाला स्मरत राहतो पुन्हा पुन्हा मी
जगत राहतो मरत राहतो पुन्हा पुन्हा मी

बाल्कनीत तू दिवसातुन एकदा दिसावी
येणे जाणे करत राहतो पुन्हा पुन्हा मी

कसे सावरू घोर तुझा हा रूपचंद्रमा
चकोर वेडा ठरत राहतो पुन्हा पुन्हा मी

तुला मिळावी ऐसपैस बसण्याला जागा
हृदयाला आवरत राहतो पुन्हा पुन्हा मी

ओझरती तू दिसता होई धांदल 'तुष्की'
नयन घागरी भरत राहतो पुन्हा पुन्हा मी

 ~ तुष्की
वाशींग्टन, २४ एप्रिल २०१४, २१:००

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

कायमची...

(छायाचित्र सौजन्य: मयुरी
.
.
तू दिसलीस
थांबली हृदयाची वणवण
तू हसलीस
आणि संपले एकटेपण

आभाळाहूनही
अफाट तू सावळी माया
जीव अनावर
दिसली नाहीस की बघाया

बोलतेस तेव्हा
अमृताचा पाऊस कानावर
नुसतंच बघतेस
आणि धुंद रोमांच अंगावर

आयुष्याला
अर्थ गहन देशील का
सांग कायमची
तू माझी होशील का?

 ~ तुष्की
वर्नान हिल्स, १२ एप्रिल २०१४, ०७:३०

मराठमोळी

(छायाचित्र सौजन्य: दक्षता )
.
.
तू
इतकं सुंदर
असायला नको होतंस
किमान
माझ्या नजरेत तरी
ठसायला नको होतंस

तुझ्या असण्याने
माझी सगळी गणितच बदलतात
तुझ्यापासून
सुरू होतात विचार
तुझ्याच कडे परत येऊन बसतात
तू
मला पाहून
हसायला नको होतंस
तू
इतकं सुंदर
असायला नको होतंस

तुझ्या कडे पाहून
जग किती सुंदर ते कळतं
तुझ्या असण्यानेच
गड जिंकण्याचं तानाजीबळ मिळतं
तू
इतकं मराठमोळं
दिसायला नको होतंस
तू
इतकं सुंदर
असायला नको होतंस

 ~ तुष्की
वर्नान हिल्स, १२ एप्रिल २०१४, २०:००

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

तुझा चेहरा

(छायाचित्र सौजन्य: चैताली
.
.
संध्याकाळ जेव्हा दाटून येते
झुळझुळ वारे जाणवून देते, तुझी कमतरता
तेव्हा तुझा चेहरा आठवतो मी
मंद हसणारा
जगातल्या प्रत्येक चेहऱ्याहून
अधिक सुंदर दिसणारा
कुशल कलाकाराने
मोहक चैतन्य घेऊन
मन लावून एक एक रेष कोरावा तसा
मनमोहक चेहरा
वेड लावणारा
जगातले सगळे शल्य विसरायला लावणारा
आणि गालात हसतो
स्वतःच्या डोक्यावर स्वतःच टपली देतो
हसता हसता
रोजच संध्याकाळी
संध्याकाळ जेव्हा दाटून येते

इतर वेळा
जेव्हा वैतागुन आफिसबाहेर
सिगारेट प्यायला येतो ना
तुझे सागरडोळे स्मरतात
जसे काही तू डोळ्यांनीच
प्रेमपूर्वक हलकेच चेहरा हलवून
नाही म्हणते आहेस
मला बरेचदा त्यांचे म्हणणे मोडवत नाही
सिगारेट न पिताच मी माघारी फिरतो
कदाचित सिगारेट पिण्याला बाहेर येणे
हे तुझ्या डोळ्यांचे
स्मरण पुन्हा व्हावे म्हणूनच होत असावे

अनेक क्षण असे येतात
अचानक मला भासते
तुझ्या ओठपाकळ्यांतून
तू जेव्हा 'राजू' म्हटले होतेस
तेच रोमांच
ते तेव्हाचे ओठ आणि ते ऐकू आलेले 'राजू'
हृदयाच्या आत
कोरल्या गेले होते
तेव्हापासून त्याची धडधडगतीच बदललेली

तुझ्या घनदाट रेशमी केसांच्या
मागून वळसा घेत
माझ्यापर्यंत जे वारे पोहचते
त्याचा सुगंध
श्वासा श्वासात भिनतो आणि अस्तित्वाची
कळी फूल होते
त्याच वेळेस मी साठवून ठेवतो
त्यांची स्मरणे, ती सतत
माझ्या भावनासागराला भरती आणतात
आणि मनाचे सर्व किनारे
भिजवत असतात, अचानक
फोनवर नाही भागत गं
पुन्हा राजू म्हणताना तुझ्या ओठपाकळ्यांना
पाहण्यात जो सोहळा आहे
तो डोळ्यांनीच जगायला पाहिजे
हो ना.

 ~ तुष्की
नागपूर, ०९ एप्रिल २०१४, ०४:००
वर्नान हिल्स

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

कस्तुरी

(छायाचित्र सौजन्य: मोनिका)
.
.
तू म्हणतेस
तुझा चेहरा खूपच साधा
मग मला सांग
मला का झालीय त्याची बाधा?

मला का तुझ्या डोळ्यात
दिसतो समुद्र
आणि
तुझ्या तांबुस गालावरच्या
तिळाकडे बघण्यात
माझे हरवते भान?
जरी तू म्हणतेस की
तुझं दिसणं म्हणजे ध्यान

तुझे रेशमी केस
आणि नाजुक ओठांना
आठवल्या शिवाय
माझा दिवस ढळत नाही
आता मला कळतंय
की कस्तुरीला तिचं
स्वतःच मोल कसं कळत नाही

~ तुष्की
नागपूर, ०८ एप्रिल २०१४, ०१:४०
वर्नान हिल्स