बुधवार, ९ एप्रिल, २०१४

तुझा चेहरा

(छायाचित्र सौजन्य: चैताली
.
.
संध्याकाळ जेव्हा दाटून येते
झुळझुळ वारे जाणवून देते, तुझी कमतरता
तेव्हा तुझा चेहरा आठवतो मी
मंद हसणारा
जगातल्या प्रत्येक चेहऱ्याहून
अधिक सुंदर दिसणारा
कुशल कलाकाराने
मोहक चैतन्य घेऊन
मन लावून एक एक रेष कोरावा तसा
मनमोहक चेहरा
वेड लावणारा
जगातले सगळे शल्य विसरायला लावणारा
आणि गालात हसतो
स्वतःच्या डोक्यावर स्वतःच टपली देतो
हसता हसता
रोजच संध्याकाळी
संध्याकाळ जेव्हा दाटून येते

इतर वेळा
जेव्हा वैतागुन आफिसबाहेर
सिगारेट प्यायला येतो ना
तुझे सागरडोळे स्मरतात
जसे काही तू डोळ्यांनीच
प्रेमपूर्वक हलकेच चेहरा हलवून
नाही म्हणते आहेस
मला बरेचदा त्यांचे म्हणणे मोडवत नाही
सिगारेट न पिताच मी माघारी फिरतो
कदाचित सिगारेट पिण्याला बाहेर येणे
हे तुझ्या डोळ्यांचे
स्मरण पुन्हा व्हावे म्हणूनच होत असावे

अनेक क्षण असे येतात
अचानक मला भासते
तुझ्या ओठपाकळ्यांतून
तू जेव्हा 'राजू' म्हटले होतेस
तेच रोमांच
ते तेव्हाचे ओठ आणि ते ऐकू आलेले 'राजू'
हृदयाच्या आत
कोरल्या गेले होते
तेव्हापासून त्याची धडधडगतीच बदललेली

तुझ्या घनदाट रेशमी केसांच्या
मागून वळसा घेत
माझ्यापर्यंत जे वारे पोहचते
त्याचा सुगंध
श्वासा श्वासात भिनतो आणि अस्तित्वाची
कळी फूल होते
त्याच वेळेस मी साठवून ठेवतो
त्यांची स्मरणे, ती सतत
माझ्या भावनासागराला भरती आणतात
आणि मनाचे सर्व किनारे
भिजवत असतात, अचानक
फोनवर नाही भागत गं
पुन्हा राजू म्हणताना तुझ्या ओठपाकळ्यांना
पाहण्यात जो सोहळा आहे
तो डोळ्यांनीच जगायला पाहिजे
हो ना.

 ~ तुष्की
नागपूर, ०९ एप्रिल २०१४, ०४:००
वर्नान हिल्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा