शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

ट्रेडीशनल डे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.


ट्रेडीशनल डे ला
तू साडी नेसून आलीस
आणि मला आपण हरीण असल्याची जाणीव झाली
साधेसुधे हरीण नाही
तर कस्तुरी चे हरीण
ज्याच्याजवळ कस्तुरी असते
एक आंतरिक आत्मिक सुगंध
पण ते कळायला
त्याचा जिवच जावा लागतो
आज तर तू माझा जीव घेतलास
तुला इतर वेळा पाहतांना
तू मनात भरत होतीस
आज मनाला आरपार चिरून गेलीस
तुझ्या त्या साडीमुळे फुलून आलेल्या वसंत वळीवाच्या सरींमधे चिंब होतच होतो
की तेवढ्यात तू मला आंधळा करून टाकलेस
तो आंधळा जो देवाला एक डोळा मागतो
आणि त्याला देव दोन डोळे देतो
तुझ्याकडे कितीवेळ एकटक पाहिले तर
'ओके आहे' याचा विचार सुरू असतानाच
म्हणालीस फोटो काढ ना माझे.
तुझ्या परवानगीनेच...
तुझ्याकडे एकटक पाहण्याचा परवाना
घेऊन, सुरू झाला माझा
तुला अनिमिष डोळ्यांनी पाहण्याचा
तुला डोळ्यात साठवण्याचा सोहळा
एक कौतुक भरून आलं डोळ्यात
की ही अदा, हे साडीमधे
चित्तवेधक वावरणे
हे हिला आधीपासूनच येत होते आणि
मोराने पिसारा फुलवल्याप्रमाणे
एकदम ही आपल्या सगळ्या अदा
घेऊन अशी आली आहे
जसा अचानक पहिल्या पावसानंतर
मृदगंधाने आसमंत भरून जावा
आणि जिवाला एक भारावून टाकणारा
रोमांचक अनुभव मिळावा
आता फक्त सेटिंगच करत राहणार आहेस
की क्लीक पण करणार आहेस
तू हटकल्यावर मी भानावर आलो
मग वेगवेगळ्या ऐंगल ने फोटो
काढतांना जाणवत गेलं की तू
एक केलिडोस्कोप आहेस जणू
प्रत्येक नव्या दिशेने
नवा धक्का देणारी
तू आज तुझं हे रूप दाखवून
या दिवान्याला
जे काही दिलस ते
आणि हा ट्रेडिशनल डे
मी कधी विसरणार नाही
तू तुझे हे साडीतले रूप घेऊन
तेवत राहशील मनभर
आठवणींच्या रूपात
.
.
(देवाशिषच्या कविता / तुष्की नागपुरी)
श्रीनगर, २५ डिसेंबर २०१५, १०:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा