बुधवार, ७ जुलै, २०१०

आणि जेव्हा ती हसली


(छायाचित्र सौजन्य: प्रणोती)
 .
.
मनातले सांगितले तेव्हा
उगाच रूसुन असलेली
जीव टांगणीला लावून ती
रागात जाऊन बसलेली
भांड्यात पडला जीव
हळून पुन्हा ती दिसली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
सुगंधले जगणे माझे
टवटवले फुलले
कसे होईल काय होईल
सगळे प्रश्न नुरले
माझी तिची एक स्थिती
माझी खात्री पटली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
तिच्यासाठी किती किती
मला करायचे होते
तिचे हसणे जपण्यासाठी
घर विणायचे होते
माझ्या जगात आली ती
माझी चिंता मिटली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
जीव जडतो तेव्हा
खुळ्यासारखे होते
तिलाही तसेच व्हावे
अशीच ईच्छा होते
माझीच छबी मला
डोळ्यात तिच्या दिसली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
स्थळ काळ सगळे
माझ्या साठी विरले
तिचा होकार आणि एक
धडधडते काळीज उरले
भावनांचे शब्द झाले
अचानक कविता सुचली
मागे वळून पाहिले
आणि जेव्हा ती हसली
.
.
तुषार जोशी, नागपूर
०७ जुलै २०१०, २३:४५
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा